रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

जानवी ---कवी सुरेश भट

“जानवी ” ----कवी सुरेश भट ( “एल्गार” मधून )

------------------ 

सांगा कुणीतरी या आकाशखाजण्यांना—

“मातीच मोक्ष देई कंगाल नागव्यांना !”

        आहे जरी उभा मी निष्पर्ण माळरानी

        या स्वप्नपाखरांच्या रोखू कसा थव्यांना ?

आली नव्या जगाची आली पहाट आली

आता उन्हात आणू पाळीव काजव्यांना !

        येती जरी समोरी सारे नकोनकोसे

        मीही नकोनकोसा झालो हव्याहव्यांना

साधाच मी भिकारी, माझी रितीच झोळी

गावात मान त्यांच्या श्रीमंत जोगव्यांना !

        प्रत्येक आतड्याचा मी पीळ होत आहे

        ते मात्र गाठ देती त्यांच्याच जानव्यांना !

----------------- 

प्रसिद्ध गझलाकार कै. सुरेश भट ह्यांच्या “एल्गार” ह्या काव्यसंग्रहातली ही गझल आहे.

गझल हे मात्रावृत्त असते. म्हणजे लघु अक्षराला एक आत्रा व दीर्घ अक्षराला दोन मात्र धरल्या तर सगळ्या ओळी त्याच क्रमाने मात्रेत याव्या लागतात. उदाहरणार्थ : सां गा कु णी त री या | आ का श खा ज व्यां ना || ह्याच्या मात्रा होतात : २,२,१,२,१,२,२ | २,२,१,२,१,२,२ . आता खालच्या सगळ्या ओळी ह्याच मात्रेच्या असाव्या लागतात. गझलेच्या प्रत्येक दोन ओळींना शेर म्हणतात व प्रत्येक शेर हा स्वतंत्रपणे स्वयंपूर्ण असावा लागतो. म्हणजे ह्या दोन ओळींच्या अर्थासाठी दुसऱ्या कोणत्या ओळींची गरज नसते व ह्या दोन ओळी/शेर हे स्वतंत्र एक कविताच असते. पहिल्या शेराच्या दोन्ही ओळी अंती यमक असते तर पुढच्या शेरात फक्त दुसऱ्या ओळी अंती यमक असते. एकेका शेरात संपूर्ण विषय संगाच्या असल्याने सांगणे प्रतीकांच्या सहाय्याने असते. हे सर्व ह्यासाठी लक्षात घ्यायचे की कवितेचा हा एक नजाकत भरा फॉर्म ( साचा ) आहे.  

आकाशाला, उच्च ध्येयाला, भिडून त्याला खाजवणारे असे आदर्शवादी लोक असा ‘आकाशखाजव्यांना’ चा अर्थ होऊ शकतो किंवा इंग्रजी स्कायस्क्रेपरचे सरधोपट भाषांतर करून गगनचुंबी इमारती असा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे श्रीमंतांच्या गगनचुंबी इमारतींना कुणीतरी सांगायला हवे की जे भुके कंगाल, नागवे, गरीब लोक आहेत त्यांना आसरा, सहारा,व मोक्ष ही जमीन, मातीच देऊ शकते. इथे माती कसून कंगालांना सुटका, मोक्ष मिळू शकतो अशा अर्थछटेचीही शक्यता आहे.

निष्पर्ण माळरानावर काहीच आकर्षण नसल्याने पाखरे येणार नाहीत. पण ज्यांना स्वप्ने पाहायची आहेत अशांच्या स्वप्नपाखरांना, ते ही थव्याने येणाऱ्या, मी कसा रोखू शकेन ?

नव्या जगाची, प्रगतीची पहाट आली आहे. आता उन्हात आणूया पाळीव काजव्यांना. इथे पाळलेले काजवे अशासाठी की हुकुमाप्रमाणे हवे तिथे आपण त्यांना सोडून त्यांच्या मंद प्रकाशात वाटा धुंडाळू शकतो. इथे अर्थातच प्रगती असूनही, नव्या जगाची पहाट असूनही कुठे कुठे साचलेला अंधार आहे, तिथल्या लोकांना आपल्या वाटा शोधण्यासाठी हे काजवे आहेत.

प्रगतीच्या ह्या प्रकाशात नेमके जे नको नकोसे प्रसंग, लोक, आहेत, तेच हटकून सामोरे येतात. पण असे रोखठोक बोलण्याने माझ्या चाहत्यांनाही ( हव्याहव्यांना ) मी ‘नको नकोसा’ होतो आहे.

साधेच मागणे मागणारा मी साधाच भिकारी आहे. आणि म्हणूनच कोणी मला भीक घालत नाही व माझी झोळी ‘रीतीच ’ राहते. ह्या उलट देवीच्या नावाने मागणारे ( जोगवा मागणारे ) ह्यांना मान मरातबाची मदत व मोठेपणा मिळतो आहे.

जिथे जिथे दु:ख आहे, आतडे पिळवटून टाकणाऱ्या यातना आहेत त्या दु:खाला नुसतेच सामोरे नाही तर सहसंवेदनेने तो आतड्यांच्या वेदनेचा पीळ जाणवून मी वेदना पाहतो आहे. पण प्रस्थापित, प्रतिष्ठित लोक स्वतःच्याच बंधनात जखडलेले आहेत. जसे काही एखाद्या ब्राह्मणाने जानव्याला खुणेची गाठ द्यावी. इथे ‘जानवे’ हे वर्णभेदाच्या प्रतीकापेक्षा बंधनाचे प्रतीक आहे. म्हणजे ‘आहे रे ’ आणि ‘नाही रे ’यांच्या सनातन संघर्षात ‘नाही रे ’च्या वेदनेबरोबर कवीने सहसंवेदना, आतड्याचा पीळ होऊन जाणवावी तर ‘आहे रे ’नी स्वतःच्याच कपोलकल्पित बंधनात ( जानवी, अनेक जानवे ) राहून उगाच खुणेची गाठ बांधावी, करू काही नये, असे कवीचे वैषम्य आहे !

अरुण अनंत भालेराव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा