गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

श्रीद्न्यानेश्वरांची नवी विराणी

‘श्रीज्ञानेश्वरांची नवी विराणी’

-------------------------कवी ग्रेस (“सांजभयाच्यासाजणी”)  

“सर्प देखणे सावज

दिव्य सर्पिणीचा फणा;

काय ज्ञानिया ऐकतो

घणू असा घुणघुणा ?

        अंध निर्मितीचा नादी

        बांध बांधितो आरूणी ;

        जे जे नेकीने सडते

        त्याची होतेच वारूणी ! ”

कवी ग्रेस ह्यांना ज्ञानेश्वरांचे खूपच अप्रूप, आकर्षण, आणि भारलेपण आहे. ज्ञानेश्वरांचे काव्य आणि तत्वविचार हा खरे तर विद्वज्जड प्रबंधाचा विषय व्हायला हवा. पण ज्ञानेश्वरांनी ज्या ‘विराण्या’ लिहिल्यात त्या विराणीतल्या विरहाचे आणि आसक्तीचे त्यांनी जे आर्ततेने चित्र रेखाटले आहे त्या आर्तपणाचा इथे कवी ग्रेस ह्यांना लोभ पडतो आहे व ते त्यावर ही नवी विराणी लिहीत आहेत.

‘विराणी’ ह्या प्रकारात विरहाची भावना तसेच आसक्तीची ओढ श्रीज्ञानेश्वरांनी त्यांच्या प्रसिद्ध अशा ‘घनु वाजे घुणघुणा | वारा वाजे रुणझुणा || भवतारुकु हा कान्हा वेगी भेटावा कां ||’ ह्या विरहिणीत व्यक्त केलेली आहे. वियोग पोटी ‘सुमनांची शेज ही पोळे, आगीसारखी’ झाल्याने ती झडकरी विझवा हो अशी आर्त विनवणी ह्यात आहे. तसेच ‘ दर्पणी रूप न दिसे आपुले’ ( तुझेच दिसते ) अशी भ्रांती आहे. ‘चंदनाची चोळी’ शीतल असूनही ‘सर्व अंग जाळी’ असा दाह आहे. तर अशाच आर्ततेची पण नवीन प्रतिमांची विराणी श्रीज्ञानेश्वरांनी कशी कल्पिली असती असा विचार कवी येथे करतो आहे.

शिकारी लोक जसे सावजाला ‘देखणे जनावर’ म्हणतात व त्यांना सारखा सावजाचाच ध्यास लागलेला असतो, तर अशा ‘देखण्या सावजा’विषयी शिकाऱ्याची जी आसक्ती आणि विरहवियोगाची अवस्था असते ती ज्ञानीयाला ( ज्ञानेश्वरांना ) ‘ घनु वाजे घुणघुणा’ धर्तीच्या वियोगाची वाटून ऐकू येते का ? किंवा सर्प आणि सर्पिणी यांचा फणा काढून जी क्रीडा चाललेली असते त्या क्रीडेतील आर्तता ज्ञानेश्वरांना भावते का ?

आंधळा दिसत नाही म्हणून तो नादाच्या साह्याने बघतो, तर त्याचे हे अंध असणे आणि नादावर अवलंबून असणे हीही विरहासक्तीच ना ! इथे आरुणी म्हणजे अंग, शरीर हेच अंधाला ऐकण्यात बांध घालते आहे. शरीराने हा ऐकण्याचा वियोग घडवून आणणे हा एक प्रकारे नव्या विरहिणीचाच विषय जणु . वारूणी म्हणजे दारू, मद्य. दारू ही फळांच्या, धान्यांच्या सडण्यापासून होते. तर दारू करण्यासाठी फळांचे, धान्याचे हे जे नेकीने सडणे आहे त्यातली हे नेकी ही विराणीच्या आर्ततेसारखीच आहे.

विरहासक्तीच्या, वियोगाच्या, आर्ततेच्या ज्या पारंपारिक बाबी ज्ञानेश्वरांना कारुण्यमय वाटल्या ( जसे : घनु-वारा ; चांद-चांदणे ; चंदनाची चोळी-अंग जाळी ; फुलांची शेज-आगीसारखी जाळी ; दर्पणात आपले रूप न दिसणे-तुझेच दिसणे ) तशाच ह्या नवीन प्रतिमातील कारुण्य ज्ञानेश्वरांना करूणामय वाटले असते असे कवीला वाटते. शिकारी आणि सावजाच्या प्रतिमेत सावजाबद्द्ल करूणा वाटावी हे तर साहजिकच आहे. पण अति हळव्या उदार कवीमनाला शिकाऱ्याबद्दलही करुणा वाटावी ह्याचे कवीला अप्रूप आहे, अगत्य आहे.

दारू होण्यासाठी जे नेकीने ‘सडणे’ लागते त्या नेकीबद्दलही करूणा वाटावी ह्यात कवीची थोडीशी विनोदबुद्धीही दिसून येते. नवीन प्रतिमा देऊन विराणीचे आधुनिकीकरण करण्यापेक्षा इथे विराणीत असलेल्या मूलतत्वाला पोचण्याची ( ग्रेस ह्यांच्याच शब्दात, ‘करुणेचा लंबक’ हेच इथे मूळ आहे ) कवीचा यत्न दिसतो. आणि म्हणून सर्प-सर्पिणीची क्रीडा, अंधाचे नादी असणे, शरीराने बंध बांधणे, मद्यासाठी सडण्याची नेकी, अशा नवीन प्रतिमामधली आर्तता व कारुण्य हेरून श्रीज्ञानेश्वरांनी नवीन विराणी अशावर लिहिली असती असे कवीला वाटते.

अरुण अनंत भालेराव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा