सोमवार, १५ जानेवारी, २०१८





वृत्त आणि वृत्ती
-----------------------
संत तुकाराम गाथा
एक विराणी
---------------------
आम्हां आम्ही आता
वडील धाकुटी
नाही पाठी पोटी
कोणी दुजे
फावला एकांत
एकविध भाव
हरी आम्हासंवे
सर्व भोगी
तुका म्हणे अंगसंग
एके ठायी असो
असो जेथे नाही
दुजे कोणी  

प्रा मधु जामकर
मागणे
-------
आम्हीच आम्हाला
वडील धाकुटे
एकटे दुकटे
सारे काही
कुणाचा कुणाला
नाही ताळमेळ
आमुचा तो खेळ
आम्हा पायी
उदासी उदास
किती किती व्हावे
सांत्वन करावे
आपुलेचि
जेथे जावे तेथे
स्वताःचा सांगाती
मागे पुढे जाती
पायवाटा
शोधता शोधता
कोणी ना दिसावे
अंधारून यावे
रात्रंदिनी
कुठे कुठे आता
आधार मागावा
बहिरा पहावा
आंधळ्याने
एकलकोंड्याचे
ऐकावे सांगणे
एवढे मागणे
पुन्हा पुन्हा


एखाद्या कवितेवरून कोणाला आपली कविता सुचणे हे शक्य असते. खरे तर संत तुकाराम महाराजांना मरून आता साडे चारशे वर्षे झालेली असल्याने त्यांना त्यांच्या कवितेतल्या शब्दांवर मालकी हक्क सांगता आलाही नसता. कारण कॉपीराईट कायद्याने कवीला हक्क केवळ साठ वर्षे सांगता येतो. पण तुकाराम महाराजांचे “आम्हां आम्ही आता वडील धाकुटी | नाही पाठी पोटी कोणी दुजे ||” आणि वरील कवितेतील मधु जामकरांचे “आम्हीच आम्हाला वडील धाकुटे | एकटे दुकटे सारे काही || ” हे शब्द जवळ जवळ सारखेच आहेत.
संत तुकारामांचा वरील अभंग आणि जामकरांची वरील कविता ह्या एकाच अभंग ह्या वृत्तात आहेत. संत साहित्याची बऱ्याच वेळा आपण पारायणे करतो, त्यामुळे सुरुवातीचे शब्द जशाचे तसे येणे हे ज्यांचा संत साहित्याचा खूप अभ्यास आहे त्यांच्या काव्यात तसेच येणे शक्यतेतले आहे. शिवाय इंग्रजीत असे एक प्रसिद्ध वचन आहे  की नक्कल ही प्रशंसेची खूण असते ( Imitation is the best form of flattery ). त्यामुळेही हा सारख्या शब्दांचा प्रभाव आला असावा.
विरह ज्या काव्यात आहे त्याला विरहिणी म्हटलेले असते. त्यात मीलनात जी प्रेमाची तीव्रता असते त्यापेक्षा ताटातूटीत जास्त तीव्र प्रेम कल्पिलेले असते व त्यामुळे विरहिणीत जास्त आर्तता दिसून येते. तुकाराम महाराजांच्या वरील अभंगात हरी व माझे एकत्व झाले आहे व मी हरीला भोगीत असून ते जणू काही विरहिणीच्या  अपेक्षेप्रमाणे घडलेल्या मीलनात पूर्णत्वास आले आहे अशा अर्थाने येते आहे . विरहाची परिपूर्ती तेच मीलन ह्या अर्थाने हा अभंग विरहिणी म्हणून गणला गेला आहे. पूर्वी ह्यालाच मधुरा-भक्ती म्हणत.
जामकरांची वरील कविता एकलकोंडेपणाची खंत व्यक्त करणारी आहे. पायवाटा शोधताना अंधारून यावे व काही दिसू नये, ज्याचा आधार मागावा तो बहिरा निघावा, त्याला काही ऐकू येऊ नये अशी ही खंत आहे.आणि मग कवी मागणे मागतो आहे की हे सांगणे त्याला ऐकू यावे. ह्या कवितेत भक्तीचा हाकारा आहे, भक्तीने देवाला मागणे आहे. ही केवळ भक्तीची भावना असून हीस विरहिणी म्हणता येणार नाही. म्हणजे शब्दांचे, वृत्ताचे सारखेपण असले तरी ह्यात विरहाची तीव्रता नाही. भक्ती आहे.

-------------------------------------------