बुधवार, १६ जून, २०२१

 ।। सद्गुणलाही शत्रू असतात ।।


चळू नकोस ढळू नकोस

सद्गुणलाही शत्रू असतात


तुझ्या कोवळ्या मांसावर

कावळे सदैव टपलेले

तुझी शिंगं मोडायला

निरागस लेकरंही शिकलेले


कुणाचं घोडं मारलं नाहीस

तरी तुला मारलं जाईल

काळ त्याला खाणार असला

तरी तो तुला आज खाईल


मारता येत नसेल शिंग

तर शँखात दडायला शिक

अनावर होतील अश्रू

तेंव्हा एकांतात रडायला शिक


पोटात पाय घेऊन आपले

तुरु तुरु चालत रहा

भविष्याचा अंदाज घेऊन

वेळेवरती निघत जा


राजरस्त्यावरून चालू नकोस

तो त्यांच्या मालकीचा आहे

पायतळीच्या जीवाकडं

जे ढुंकूनही पहात नसतात


फार हसू नकोस इथं

हसणाराचेही शत्रू आहेत

गुणवत्ता मिळवलीस गुणांवर

तरी गुणवंत म्हणवला जाणार नाहीस


सहन होणार नाही ज्याला

तुझं बहरलेलं शिवार

एक दिवस संधी साधून

तो नक्की काडी लावणार


हे वैश्विक सत्य आहे

आदीपासून अंतापर्यंत

हे कुणालाच टळलं नाही

तुझ्यापासून माझ्यापर्यंत


इंद्रजित भालेराव

———

वरील कविता फेसबुकवर नुकतीच वाचण्यात आली. आणि कवितेतले विचार आपण तर्काच्या कसोटीवर तपासू शकतो का हे कोडे पुन्हा उभे ठाकले. 

प्रत्येकाला आपापले सामाजिक, राजकीय तत्वज्ञान बाळगण्याचे स्वातंत्र्य असते व ते ठामपणे वाचकांसमोर ठेवण्याचा अधिकार असतो. ते जर कोणी गद्य प्रकारात केले तर आपण त्याचा परामर्ष तर्काच्या आधारे करू शकतो. पण एखाद्याने कवितेत जर असा विचार प्रतिपादला असेल तर मोठी पंचाइत होते. कारण काही समिक्षेत असे मानतात की कवितेतल्या विचारांना आपण तर्काचा निकष लावून त्याची भलामण वा विरोध करू शकत नाही. कारण त्या कवीच्या केवळ भावना असतात. रूपकात्मक असतात. 

उदाहरणार्थ एका कवितेत अरुण कांबळे असे मांडतात की ह्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात माॅल मध्ये गरीब बिचाऱ्या मोळीविक्याला जागा का मिळू नये ? आता हे संवेदनशील कवीची मोळीविक्याबद्दलची कणव आहे हे वाचकाला सहजी जाणवेल. पण आर्थिक निकष जर विचारात घेतले तर मोळीविक्याला माॅलमध्ये जागा देणे हे रसिक व सहानुभूती, सद्भावना बाळगणाऱ्या समीक्षकालाही शक्य होणारे नाहीय.

अशीच अडचण ह्या कवितेत आहे. गोगलगाईची प्रतिमाच मुळी गरीब गाईची. त्यात भर घालीत इथे कवी तिचे शत्रू कसे सगळीकडे आहेत, क्रूर आहेत वगैरे चितारीत तिची कणव अजून वाढवतो आहे. हे कवीमनाला सगळी मुभा आहे ह्या मताने आपण एकवेळ मानू यात. पण त्या कणवेला ताणून , सद्गुणाला शत्रू असतात हे वचन वा प्रमेय सिद्ध झाले हे तर्काला धरून न होता एक प्रकारची बतावणीच होते. तसेच समजा एखाद्या शेतात गोगलगाईंचा उपद्रव झाला तर शेतकऱ्याला त्यावर कारवाई करावीच लागेल व त्यात त्याने शिवार पेटवले तर ते काही शत्रुत्व होऊ शकणार नाही. 

पण कवींना विचारांना तर्कावर न तोलता भावनेच्या कढावर चढवण्याची मुभा असते, असे म्हणत सोडून द्यायचे झाले.

————


मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

 श्रीज्ञानेश्वरसमाधिवर्णन ( कवी : अरुण कोलटकर )

-------------------------------- 

स्वच्छ निळसर रिकामे अंबर 

नारद तुंबर अभ्र विरे 

कधी केले होते गंधर्वांनी खळे 

स्वतःशीच खेळे चंद्रबिंब 

पांगले अवघ्या वैष्णवांचे भार 

ओसरला ज्वर मृदंगाचा 

मंदावली वीणा विसावले टाळ 

परतून गोपाळ घरी गेले 

स्थिरावला हार वाळली पाकळी 

गुंतली फासळी निर्माल्यात 

-------------------- 

कोणाची सय येणे, आई मिस यू होणे, विरह होणे ह्या विरह भावनेच्या पहिल्या पायऱ्या धरल्या तर प्रियकर आता कधीच भेटणार नाहीय ( किंवा तो मेलाय ) असे असेल तर विरहाचे टोक क्षोभाकडे अथवा शोकाकडे जाते.

गणपतीचे विसर्जन करताना “पुढच्या वर्षी लवकर या” अशी हमी तरी असते. पण समाधी घेताना सगळे आटोपतेच त्याचे इथे मोठे मनोहारी वर्णन आहे. ज्याच्या ओढीने आपण दर्शनाला जावे त्याची हुरहूर जशी वारकऱ्यांना वारीहून परतताना लागते त्याच्याच पुढची अवस्था इथे दिसत आहे.

स्वच्छ निळसर आभाळ आहे, ढग विरलेले असल्याने नारद, तुंबर असे सप्तर्षी दिसत आहेत. चंद्रबिंब आपल्याशीच खेळत आहे ( ज्ञानेश्वरांचे असे विश्वाचे वर्णन आहे की ही प्रकृती “आपणच खेळे आपणाशी”, त्याची आठवण इथे कोलटकर करून देत आहेत) आणि अशी शंका आहे की कोणा गंधर्वाने चंद्राभोवती खळे केले आहे की काय ? ( त्याचा अर्थ आता कोणाचा तरी मृत्यू होणार आहे.). वैष्णवांचे जे जथ्थे आले होते ते आता पांगले आहेत. टिपेला जाण्याचा मृदुंगाचा ज्वर आता ओसरला आहे. वीणा मंदावली व टाळ विसावले आहेत व शिष्य/वारकरी घरी परतून गेले आहेत. गळ्यातला हलणारा हार आता स्थिरावला असून पाकळी वाळली आहे. ज्ञानेश्वरांच्या छातीची व हारातल्या देठाची “फासळी” ज्या हारात गुंतलेली आहे त्याचे आता निर्माल्य झाले आहे. 

भक्तांसाठी फासळीचे निर्माल्य होणे ही विरहाच्या जरा पुढची पायरी इथे छान वर्णिली आहे !

------------------------


KAVITAMHANAJE.BLOGSPOT.COM

                                 https://kavitamhanaje.blogspot.in/

 ज्ञानेश्वरांची एक विरहिणी : मनाला बुद्धीचा विरह 

सुख शेजारी असता कळी जाली वो पहाता |

देठु फेडुनि सेवता अरळ केले ||१||

अंगणीं कमळणी जळधरू वोले वरी |

वाफा सिम्पल्यावरी वाळून जाये ||२||

मोतियाचे पाणी वाहे निळिये सारणी |

सगुणाची लावणी लाऊनि गेला ||३||

अंगणीं वोळला मोतें वरुषला |

धन्य दिवसु जाला सोनियाचा ||४||

चोरट्या मधुकरा कमळीं घेतलासे थारा |

मोतियांचा चारा राजहंसा ||५||

अंगणीं बापया तू परसरे चांपया |

असुवी माचया भीनलया ||६||

वाट पाहे मी एकली मज मदन जाकळी |

अवस्था धाकुली म्हणो नये ||७||

आता येईल म्हूण गेला वेळु का लाविला |

सेला जो भिनला मुक्ताफळीं ||८||

बावन चंदनु मर्दिला अंगीं वो चर्चिला |

कोणे सदैवे वरपडा जाला वो माये ||९||

बापरखुमादेविवरू माझे मानसींचा होये |

तयालागीं सये मी जागी सुती ||१०||

-------------------  

प्रेयसीला प्रियकराचा विरह ( आय मिस यू, नो !) व्हावा, त्यात तिला त्याची सारखी आस लागावी, ह्या ढोबळ भावनेला ज्ञानेश्वरांनी “विरहिणी” ह्या प्रकारात असे उंच नेवून ठेवले आहे की तिथे “भक्ताला देवाची आस लागणे” त्यांना आपल्याला दाखवून द्यायचे आहे. तसेच ह्या विरहिणीत त्यांना “मनाला बुद्धीची आस” लागलेली दाखवून द्यायचे आहे.

पाण्याचे सुख जवळच असल्याने, जरा दाट असलेले कमलिनीचे देठ मृदू ( अरळ ) होउन त्याची कळी झाली आहे. अंगणी कमळीणीवर पाणी ( जळधरू मधले ) पडून ते तिला भले ओले करते आहे ( जसे भावना “मना”ला चिंब करत असते ), पण तेच पाणी शिंपल्यावर पडल्याने तो त्यात मोती तयार करतो. ( जसे शिंपल्यात “बुद्धी”रूपी मोती  पाण्यातून तयार होतात ). निळी सारणी ( उताराकडे पाणी वाहते/सरते, त्यावरून तयार होते सारणी. मोटेचे पाणी कसे उताराकडे येते व त्यात फेसाने मोतीच आहेत असे दिसते.) हे निर्गुण रूपी मोती वाहून आणते आणि सगुणांची पेरणी/लावणी करून जाते. अशा मोत्यांचा अंगणात वर्षाव झाल्याने आज “सोनियाचा दिनु” वाटत आहे. चोरट्या भृन्गांना कमलिनीरूपी मनाचा थारा जरूर असतो, पण जे राजहंस आहेत त्यांना बुद्धिरूपी मोत्यांचा चारा मिळतो. अंगणी पसरलेल्या हे चांफ्या, मी विरहिणीअसून  माझ्या आसवांनी माझा पलंग भिजला आहे. मी ह्या मदनरूपी प्रियकराच्या विरहाने जळत आहे व ही अवस्था काही कमी लेख्ण्यासारखी नाहीय. आत्ता येतो म्हणून गेलेला प्रियकर वेळ लावतो आहे व त्याने माझा शेला आसवांनी भिजून गेला आहे. हा दाह कमी व्हावा म्हणून अगदी बावनकशी चंदनाचा लेप लावला पण हा प्रियकर दुसरीलाच तर प्राप्त झाला की काय ? नाही, नाही, हा बापरखुमादेवीवरू हा माझाच स्वामी आहे, कमळरूपी माझ्या मनाला मोतीरूपी बुद्धीचा विरह जडावा म्हणून मी जागी राहते आहे !

मनाचे भावण्याचे जे देखणेपण आहे, ते इथे ज्ञानेश्वरांनी बुद्धीच्या विरहाला जोडून उदात्त केलेले आहे. 

----------------------------

 शंका फिटणे


--------------------


संत श्री ज्ञानेश्वरांची एक विराणी ( विरहिणी ) :


माझी शंका फिटले |  लाजा सांडिले | आवघे घातले |


मज निरसुनिया ||१||  अठरा भार वनस्पती | सुरवर वोळंगती || देवोदेवि आदिपती | कृष्ण काळा गे माये ||२||ऐसा कृपानिधी सांवळा| कीं बापरखुमादेवीवरु गोंवळा || त्याचा मज चाळा | बहु काळ गे माये ||३||


माझी शंका फिटली, माझी लाज लुप्त झाली, आणि मला सर्व काही अगदी निवडून निरसून दिल्यासारखे दिल्या गेले आहे. हे सुरवर धारण करीत आहेत अठरा भार वनस्पती. तसेच ती धारण करीत आहेत देवोदेवी, आदिपती, व कृष्ण जो काळा आहे. ही कृपा करणारा सांवळा असा आहे की विठ्ठलही त्यात गोवला गेला आहे. त्या कृष्णाचा मला चाळा लागला आहे व तो खूप काळापासून.


ही कृष्णाची हुरहूर आहे तशीच ती अठरा भार वनस्पतीचीही हुरहूर आहे. काय असेल अठरा भार ? भार व धारण करणे ह्यावरून “अठरा भार” हे वनस्पतीचे खूप असण्याचे मोजमाप असावे. जगात वनस्पती किती, जलचर किती, पशू किती, किडे किती, माणसे किती हे मोजण्याचे शास्त्र आहे टॅक्सॉनॉमी नावाचे. ह्यात एक २० मैल बाय २० मैल आकाराचे क्षेत्र घेवून त्यातले स्पीसीज मोजतात. हे मोजणे कैक लक्ष डॉलर खर्चून अजून चालूच आहे.


ज्ञानेश्वरानंतर झालेल्या तुकारामाने त्याला ज्ञात असलेले हे आकडे एका अभंगात असे दिलेत (८४ लक्ष योनी )  : वीस लक्ष योनी वृक्षामाजी घ्याव्या | जलचरी भोगाव्या नव लक्ष || अकरा लक्ष योनी किड्यामाजी घ्याव्या | दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये || तीस लक्ष योनी पशूंचिये घरीं | मानवाभीतरी चार लक्ष || एकएक योनी कोटी कोटी फेरा | मनुष्यदेहवारा मग लागे || तुका म्हणे तेव्हा नरदेह नरा | तयाचा मातेरा केला मूढें ||


तुकारामाच्या काळात २० लक्ष योनी असलेल्या वनस्पती कदाचीत ज्ञानेश्वरांच्या काळात १८ लक्ष असतील तर मग “अठरा भार” हे वनस्पतीचे त्या काळातले मोजमाप असावे.


---------------------

 विराणी --------कवी अनिल ( ‘दशपदी’ मधून )


------------------- 


आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर


गुडघा गुडघा चिखल आणि ओढ्यांनाही पूर


नुसता गडद अंधकार वीज चमकत नाही


काळी माती काळे रान मला मीही दिसत नाही


हाती दिवा होता त्याची कधीच विझून गेली वात


कशानेही उजळत नाही अशी काळीकुट्ट रात


आहे ओळखीचे पुष्कळ काही दूर जवळ काही


असून नसून सारखेच मी कुठे हे कळत नाही


हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते


अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते !


---------------


कवी अनिल ( आत्माराम रावजी देशपांडे ) यांच्या ‘दशपदी’ मधली ही पहिलीच कविता. दहा ओळींची म्हणून दशपदी. चौदा ओळींचे सुनीत असते तसेच दहा ओळींची ‘दशपदी’. दोन दोन ओळींचे शेर असतात, असे पाच, एकाच आशयाभोवती गुंफलेले. रचनेची ही दखल यासाठी की कवी अनिलांच्या खूप कविता गेय असून आता प्रसिद्ध गीते आहेत व शब्दांना योजकतेने अंतर्नाद असतो, तशीच ही रचना आशयाचे रूप दाखवते.


कवी स्वतः म्हणतात की कवितेचे असे एक बीज असते व बीजाभोवती कवितेचा नेटका ( दहा ओळीतच ) पसर वावर असतो. शीर्षक ‘विराणी’ असले तरी रूढार्थाने हे विरहिणीचे गाणे किंवा ज्ञानेश्वरांच्या विराणी सारखे विरहातल्या आसक्तीचे गाणे नसून एकाकीपणाचे विसर्जन करून विराण वैराण अवस्था यावी त्या स्थितीचे वर्णन आहे. व ‘हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते’ हे वाटणे ह्या कवितेत बीज रूपाने आहे. ह्यात हरणे व हरवणे हे स्वतःचेच आहे हे सलण्यावरून लक्षात येते.


आभाळाने चहूकडून खाली वाकणे किंवा वर आभाळ व खाली वाकलेले क्रूर काळे मेघ किंवा खाली झाकोळून वाकलेले आभाळ व त्यात काळे क्रूर मेघ अशा शक्यतांचे पदर लपेटून राहिलेला माहोल ( दशपदीत विरामचिन्हे नसल्याने ह्या शक्यता संभवतात ), गुडघाभर चिखल, त्यात ओढ्यांनाही पूर. अशा स्थितीत ज्या आडोशाला आपण आहोत त्या भोवती नुसता गडद अंधार आहे. क्षणभर तरी वीज चमकण्याने कुठे काय आहे ते दिसते. पण वीजही चमकत नाहीय. दिवाही विझलाय ( वाट संपून, म्हणजे परत पेटवण्याचीही सोय नाहीय ). अशी कशानेही न उजळणारी काळी कुट्ट रात्र आहे. आजूबाजूला ओळखीच्या पुष्कळ खुणा असतील, पण ह्या काळ्या कुट्ट अंधारात आपण नेमके कुठे आहोत ते कळत नाहीय. हे नुसतेच निसर्गवर्णन नसून जीवनातल्या एका भाम्बावलेल्या क्षणाचे अनुभवचित्रण आहे, ज्यात हरल्याची आपल्याला परिस्थितीने हरवल्याची जाणीव सलत राहते. अशा वेळी कवीला ह्या काळोखातच विरून पूर्णपणे वैराण व्हावे असे वाटते. ह्या जाणीवेची आर्तता जाणवून देणारी अशी ही विराणी आहे. इथे आसक्ती ऐवजी एकाकीपणाच्या पूर्णतेला भिडून विरून जाण्याची मनीषा आहे ! ‘दशपदी’ काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर चिरेबंद भिंतीत दहा ओळींची खिडकी जसे पल्याडचे दृश्य दाखवते तसेच ही दशपदी कवीच्या मनीचा आशय मनोहारीपणे दाखविते !


------------------------


अरुण अनंत भालेराव