बुधवार, १६ जून, २०२१

 ।। सद्गुणलाही शत्रू असतात ।।


चळू नकोस ढळू नकोस

सद्गुणलाही शत्रू असतात


तुझ्या कोवळ्या मांसावर

कावळे सदैव टपलेले

तुझी शिंगं मोडायला

निरागस लेकरंही शिकलेले


कुणाचं घोडं मारलं नाहीस

तरी तुला मारलं जाईल

काळ त्याला खाणार असला

तरी तो तुला आज खाईल


मारता येत नसेल शिंग

तर शँखात दडायला शिक

अनावर होतील अश्रू

तेंव्हा एकांतात रडायला शिक


पोटात पाय घेऊन आपले

तुरु तुरु चालत रहा

भविष्याचा अंदाज घेऊन

वेळेवरती निघत जा


राजरस्त्यावरून चालू नकोस

तो त्यांच्या मालकीचा आहे

पायतळीच्या जीवाकडं

जे ढुंकूनही पहात नसतात


फार हसू नकोस इथं

हसणाराचेही शत्रू आहेत

गुणवत्ता मिळवलीस गुणांवर

तरी गुणवंत म्हणवला जाणार नाहीस


सहन होणार नाही ज्याला

तुझं बहरलेलं शिवार

एक दिवस संधी साधून

तो नक्की काडी लावणार


हे वैश्विक सत्य आहे

आदीपासून अंतापर्यंत

हे कुणालाच टळलं नाही

तुझ्यापासून माझ्यापर्यंत


इंद्रजित भालेराव

———

वरील कविता फेसबुकवर नुकतीच वाचण्यात आली. आणि कवितेतले विचार आपण तर्काच्या कसोटीवर तपासू शकतो का हे कोडे पुन्हा उभे ठाकले. 

प्रत्येकाला आपापले सामाजिक, राजकीय तत्वज्ञान बाळगण्याचे स्वातंत्र्य असते व ते ठामपणे वाचकांसमोर ठेवण्याचा अधिकार असतो. ते जर कोणी गद्य प्रकारात केले तर आपण त्याचा परामर्ष तर्काच्या आधारे करू शकतो. पण एखाद्याने कवितेत जर असा विचार प्रतिपादला असेल तर मोठी पंचाइत होते. कारण काही समिक्षेत असे मानतात की कवितेतल्या विचारांना आपण तर्काचा निकष लावून त्याची भलामण वा विरोध करू शकत नाही. कारण त्या कवीच्या केवळ भावना असतात. रूपकात्मक असतात. 

उदाहरणार्थ एका कवितेत अरुण कांबळे असे मांडतात की ह्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात माॅल मध्ये गरीब बिचाऱ्या मोळीविक्याला जागा का मिळू नये ? आता हे संवेदनशील कवीची मोळीविक्याबद्दलची कणव आहे हे वाचकाला सहजी जाणवेल. पण आर्थिक निकष जर विचारात घेतले तर मोळीविक्याला माॅलमध्ये जागा देणे हे रसिक व सहानुभूती, सद्भावना बाळगणाऱ्या समीक्षकालाही शक्य होणारे नाहीय.

अशीच अडचण ह्या कवितेत आहे. गोगलगाईची प्रतिमाच मुळी गरीब गाईची. त्यात भर घालीत इथे कवी तिचे शत्रू कसे सगळीकडे आहेत, क्रूर आहेत वगैरे चितारीत तिची कणव अजून वाढवतो आहे. हे कवीमनाला सगळी मुभा आहे ह्या मताने आपण एकवेळ मानू यात. पण त्या कणवेला ताणून , सद्गुणाला शत्रू असतात हे वचन वा प्रमेय सिद्ध झाले हे तर्काला धरून न होता एक प्रकारची बतावणीच होते. तसेच समजा एखाद्या शेतात गोगलगाईंचा उपद्रव झाला तर शेतकऱ्याला त्यावर कारवाई करावीच लागेल व त्यात त्याने शिवार पेटवले तर ते काही शत्रुत्व होऊ शकणार नाही. 

पण कवींना विचारांना तर्कावर न तोलता भावनेच्या कढावर चढवण्याची मुभा असते, असे म्हणत सोडून द्यायचे झाले.

————