मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

मरणप्रेरणा

मरणप्रेरणा --------- कवितेत कवि मरणाची याचना करतो आहे, जे प्रथमदर्शनी निराशावादी वाटू शकते. त्याला जगण्याचे प्रयोजन सापडत नाही, मरण केव्हा येणार ते ही कळत नाही. देवावर त्याची श्रद्धा नाहीय, आणि जगाशी त्याचे फार सख्य नाहीय. तळहातावरच्या फोडाची प्रतिमा देत त्याला जगण् असह्य वात आहे. आजुबाजूला मरणारी माणसे पाहून त्याला स्वत:चा जीव का जात नाही त्याचे वैषम्य वाटत आहे. आणि हे सर्व लवकर थांबावे अशी त्याची इच्छा आहे. मेणबत्तीचे रूपक देत ती लवकर संपो असे त्याचे मागणे आहे. हे जीवन अनेकांना दु:सह्य होत आहे असे म्हणत तो ही वैश्विक भावना आहे असेच सांगतो आहे. कवितेतले विचार हे बुद्धिगत तर्काने तपासायचे नाहीत तर तो एक भावनाविलास म्हणून पाहायचे असे काही समीक्षक म्हणतात ( उदा: मार्जोरी बोल्टन, ॲनॉटॉमी ऑफ पोएम्स ). पण इथे कविताच मुळी लोकांच्या सामुहिक मरणप्रेरणेवर असल्याने त्याची दखल घ्यावीच लागते आहे. केवळ कवीच मरण मागत आहे की ही एक सामूहिक प्रेरणा आहे ? इथे आपण प्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉ सिग्मंड फ्रॉईड ह्यांच्या डेथ इंन्स्टिंक्टची साक्ष काढू शकतो. आपण एरव्ही संसारात पाहतो की जोवर जीवनेच्छा असते तोवर आपण निकराने जगत असतो आणि जेव्हा give up करतो तेव्हा मरण इच्छू लागतो. हेच ती डेथ इन्स्टिंक्ट, मरणप्रेरणा. तेव्हा ही कवितेतली मरणप्रेरणा तर्कसंगत आहे असेच मानावे लागेल. तशीच ती सरळ साध्या सोप्या शब्दात सांगितल्याने वाचकाच्या मनाला थेट भिडते. तसेच दु:खाचे नेमके कारण ( जसे कॅंसर वगैरे ) न सांगितल्याने सहानुभूती संयमित झाली आहे. तसेच ह्यातील मरण हे नकारात्मक न राहता त्याला आध्यात्मिक परिमाण , मोक्ष, असे मिळू शकते. परिणामकारकता कशी साधावी ह्याची ही कविता एक वस्तुपाठच झाला आहे. ---------