बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

---------------------
प्रथमपुरुषी एकवचनी
( भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी )..............कवी : दासू वैद्य ( कविता-रती, दिवाळी २०१३ मधून )
-----------------------------------------------------------------
प्रथमपुरुषी
एकवचनी,
वणवण भटकला,
प्रत्येकाने हटकला,
जमेल तिथे स्पष्टीकरण
शक्य तिथे तुष्टीकरण.
राहिला चालत,
आवरेना सुसाट सुटलेलं कथानक
मानवेना रचनेची परंपरा
उपकथानकातल्या अनपेक्षित घटना
घुटमळू लागल्या पायांत,
अगम्य हेलकाव्यांनी
हिंदकळू लागलं अस्तित्वाचं पाणी,
आधार म्हणून कधी ओढ म्हणून
बिलगत गेला एकेका नात्याला.
अडकला पात्रांच्या दाट जाळीत
पसरला जलरंगासारखा भाषेमधून,
कथानकाची गाडी
शेवटच्या स्टेशनात येऊन थांबल्यावर
चाचपले त्याने स्वत:चे खिसे,
खिशात सापडलेल्या
तिकिटावरच्या गावाची अक्षरं
स्टेशनवरच्या नावाशी
किंचितही नव्हती जुळणारी.
तरीही उत्सवी लोक होतेच बाहेर
स्वागताला उत्सुक,
उद्‌घोषणांच्या गोंगाटात
लोक वाजत-गाजत घेऊन गेले
यशस्वी कथानकाला,
प्रथमपुरुषी एकवचनी
शोधू लागला स्टेशनबाहेर
टॅक्सी, रिक्षा, टांगा
इप्सित स्थळी पोचण्यासाठी.

----------------------------------------------
कवितेच्या शीर्षकाखाली कंसात "भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी" असे लिहून कविता करण्याची ही जुनी परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी श्री. दासू वैद्य ह्यांचे अभिनंदनच करायला पाहिजे. एकेकाळी कवियत्री इंदिरा संत ह्यांनी "केशराचा मळा" ह्या शीर्षकाची कविता श्री. ना.सी. फडके ह्यांच्यावर केलेली मला चांगलीच आठवते. ही जुनी पद्धत असली तरी एका कवीवर, साहित्यकावर कवितेतून केलेली ही अप्रतीम अशी समीक्षा म्हणता येईल.
नेमाडेंना ज्या गावी जायचे होते तिथे ते पोचले नाहीत आणि तरीही लोक त्यांचे स्वागत, उद्‌घोष करीत आहेत असे निष्कर्षाचे वाक्य ह्या कवितेत मोठे कळीचे आहे. नेमाडेंचे सुरुवातीचे लेखन पाहता त्यांना समीक्षेच्या गावी जायचे होते असे कोणालाही वाटते. पण त्यांनी नंतर केवळ कादंबरीची कास धरली व ते भलत्याच गावी पोचले असे कवीला वाटत असावे. किंवा पुरस्कारांच्या भाषेत बोलायचे तर नेमाडेंनी बहुदा "तिकीट" काढलेले गाव "ज्ञानपीठ"चे असावे व ते पोचले फक्त "साहित्य-अकादमी"ला, असाही सूर वरील कवितेतून जाणवू शकतो. अर्थात इथे "ज्ञानपीठ" ऐवजी नेमाडे "नोबेल"चेही तिकिट काढते तरी पोचलेल्या गावी त्यांचा सत्कारच होता. इथे दासू वैद्य समीक्षेच्या पद्धतीने हे दाखवू इच्छित आहेत की त्यांनी जी "प्रथमपुरुषी-एकवचनी" अशी कादंबरीतून शैली अवलंबिली, ( आत्मकथा व काल्पनिक कादंबरी ह्यांचे मिश्रण केले ), त्याने त्यांच्या उपकथानकातल्या पात्रांशी बरेच घोटाळे झाले, त्यांच्या अस्तित्वाचं पाणी ( पोटातलं ) हिंदकळू लागलं. तसेच दासू वैद्य नेमाडेंना त्यांच्या कादंबरीतल्या भाषासौष्ठवासाठीही दाद देत आहेत ते "पसरला जलरंगासारखा भाषेतून"  असे म्हणत. हे अप्रतीम भाष्य समीक्षेच्या प्रांतात गद्यात अशक्यच झाले असते इतके ते इथे काव्यमयरीतीने अवतरले आहे.
नेमाडे "हिंदू" ही कादंबरी, तीन भागात ( अशी त्यांची जाहीरात होती ) आणि गेली ३०/३५ वर्षे लिहीत होते ह्या सृजन-उन्हाळीवर दासू वैद्य अशी टिप्पणी करीत आहेत की "आवरेना सुसाट सुटलेलं कथानक, व मानवेना रचनेची परंपरा !". ही मोठी मार्मिक टिप्पणी असून ते नेमाडेंच्या आवाक्यावर भाष्य करणारे आहे.
जसे परंपरेने आपण घेतलेला वसा टाकत नाही तसेच कदाचित नेमाडे जी शैली ( प्रथमपुरुषी-एकवचनी ) आजही टाकत नाहीत त्यावर दासू वैद्य म्हणत आहेत की शेवटच्या स्टेशनावर पोचल्यावरही ह्या लेखकाला अजूनही टॅक्सी, रिक्षा, टांगा यासारखे एखादे वाहन इप्सित स्थळी पोचण्यासाठी शोधावे लागत आहे. हे एकप्रकारे प्रत्येक लेखकाचेच भागधेय असल्यासारखेही आहे.
कवितेतून समीक्षा करण्याचा हा अनोखा प्रकार आहे आणि त्यात श्री.दासू वैद्य यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.
-----------------------------------


मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

...सगळं अंग ठसठसून येत असतं,
तरी, छायडाबाई सुरेभान लांडगे,
तांबडं फुटायच्या आत उठते.

परसाकड जाऊनयेऊन, आंघोळपांघोळ उरकून,
धबाधब साताठ भाक-या थापटून,
डेचकीत कायतरी कालवण उकळून,
सुरेभानला 'च्या' देते, पोरीला खायला घालते.

फडक्यात दुट्टं बांधून पाटीत टाकते,
च्येपल्या पायात सरकवून, पोरीला कमरेवर घेऊन,
झपाझप वावराकडं निघते.

दिवसभर वावरातल्या उस्तवारी करून,
तिसराकपारा जळण सावडीत,
बांधाबांधाने, काट्याकुट्यातून हिंडते,
मोळी बांधते, जळण चुंबळीवर, कमरेवर पाटी,
एका हातानं जमेल तसं पोरीचा हात धरून,
त्राण त्राण गोळा करत, घराकडं.
दिवाबत्ती, सैपाकपानी, पोरीला खाऊ घालते.

सकाळी तालुक्याला कशाला कायनु गेलेला
सुरेभान सयाजी लांडगे, झाकड पडताना माघारा येतो,
झिंगलेला, कोलमडत,
उंब-याला अडखळून धबाकदिशी नाकावर आदळतो,
छायडाबाई भेदरून उठते, सुरेभानला उठवते,
हाताला धरून, कुडाला टेकून बसवते.
पाण्याचा गलास भरून आणते,
गलास हातात घेता घेता, सुरेभान,
कशासाठी कुणास ठाऊक,
एक जोरकस बुक्की
तिच्या गालाच्या आसपास ठेऊन देतो,
“आयघाल्ये..तुह्या मायचा...”
कशासाठी कुणास ठाऊक,
घंटाकभर शिव्यांची फैर चालू ठेवतो,
दमून जातो, छायडाबाई कळ सोसते,
परातीत भाकरीच्या कोरा, ठेचा, कालवण वाढते,
सुरेभानच्या पुढ्यात ठेवते,
सुरेभान अचकटविचकट बोलतो, आणि,
अद्वातद्वा खातो, खातो त्यापेक्षा जास्ती सांडतो,
छायडाबाई परात उचलते, खरकटं वारते,
सतरंजी टाकून देते सुरेभानला,
मध्ये पोरीला टाकून, पोत्यावर आपण पडते.

कधीतरी सुरेभान उठतो, जवळ येतो,
खस्स्कन छायडाबाईला जवळ ओढतो,
छाती कुस्करतो, मिनिटभर,
जमेल तेवढा आत शिरतो. कलंडतो.

छायडाबाई, उन्मळून येणारे कढ आतल्याआत दाबते,
सगळी ठसठस दाबून घेते आतल्याआत.
आढ्याकडं रखरखा बघत जन्माचा धांडोळा घेते,
जमेल तेवढा.  थकून तिचा डोळा लागतो.
...सगळं अंग ठसठसून येत असतं,
तरी, छायडाबाई सुरेभान लांडगे,
तांबडं फुटायच्या आत उठते...
------------------------------------------------------
- बालाजी सुतार, अंबाजोगाई.

-----------------------------------------
---------------------------------------------
वरील कवितेची एक भाषाशास्त्रीय दखल !
----------------------------------------
१) छायडाबाई---"स्त्री ही पुरुषाची छाया असते", असे कोणी छायडाबाईला समजेल तर ह्या नावातल्या "छा" मुळे नावाला तिरस्कार, तुच्छता येते असेही कोणाला वाटेल. ( वाटल्यास हेच नाव छा ऐवजी इतर अक्षरे बदलून ठेवा. जसे: कायडाबाई, खायडाबाई, गायडाबाई...केवळ छायडाबाईलाच तुच्छता येईल !)
२) पुनरावृत्त शब्द वापरल्याने भाषा ठसकेदार होते हे खालील शब्दांनी सिद्धच होते : ठसठसून ; जाऊनयेऊन ; आंघोळपांघोळ ; काट्याकुट्यातून ; बांधा बांधाने ; दिवाबत्ती ; सैपाकपानी ; त्राण त्राण ; कशाला कायनु ; अचकट विचकट ; अद्वातद्वा ; आतल्या आत;
३) ध्वन्यानुकारी शब्दांमुळे शब्दचित्रे उमटतात : जसे : धबाधबा ( ह्यात भाकरी करतानाचा आवाजच ऐकू यावा ) ; धबाकदिशी ; 
रखारखा बघत;
४) काही ग्रामीण शब्दांमुळे नवीन शब्द ऐकल्यासारखे वाटते : जसे : चपला ऐवजी च्येपल्या ; दुटटं बांधून ; चहा ऐवजी च्या ; तिसराकपारा ( ह्या बहुदा काडया असाव्यात ) ; झाकड पडताना ( हे झापड सारखे वाटते किंवा सायंकाळचा शब्द असावा ) ; खरकटं वारते ( वारणे म्हणजे सारणे ) ; जन्माचा धांडोळा ( लुकिंग बॅक ऑन लाइफ ) ;
५) काही शब्द त्यांच्या अर्थापेक्षा बरेच सांगून जाणारे आहेत : जसे : जमेल तेवढे आत शिरतो ; जळण चुंबळीवर ( बाई मोळी डोक्यावर घेऊन चालली आहे, चुंबळीवर असे चित्र कोणालाही दिसावे ! ); लांडगे हे आडनाव मोठे समर्पक वाटते !
६) परिणामकारकता : साधण्यासाठी सुरुवातीच्या ओळी परत शेवटी देण्याने हे रहाटगाडगे कसे फिरते आहे ते चक्क जाणवते !
------------------

रविवार, १ सप्टेंबर, २०१३



Ganesh Dighe
---------------------------
धाकाने लपले पान
ओठंगले वाकले भाराने
मनोरम रेंगाळून थेंब हसतो
पान पुन्हा पुन्हा लाजते या ओथंबल्या प्रेमाने
-
भिंगुळला तो थेंब दवाचा
आदिसमेच्या समाधिस्त सन्यस्तेने
की ? तिष्टत पाहत वाट कृपण तो खचला
कळाधीन मातीतील मोहमयी मरणाने
-
माती शुष्क मूक मग्न रुदनात
ओटीतील संप्रधार मुग्ध बाळांच्या आक्रोशाने
शुक्रसुर्य खुणवी तेजस आरस्पानी
भय आक्रंदले खोल काळजात तिच्या …. या विषण्ण थराराने .
----------------------
कवीच्या मनात डोकावता येणे हे अवघडच काम. त्याने कितीही नेकीने कवितेत ते दाखविलेले असले तरी. आता उदाहरणार्थ वरील कविता ( गणेश दिघे ह्यांची ) पाहू. काय म्हणतोय कवि ?
पान कशाने लपले आहे ? तर धाकाने. कोणाचा धाक ? तर पानावर रेंगाळणार्‍या थेंबाचा. ह्या दवबिंदूच्या पानावरच्या प्रेमाने ते पान लाजते आहे. ह्या दवबिंदूला/दवबिंदूतून भिंगासारखे कवीला दिसते आहे. हे भिंगासारखे दिसणे कशाने होते आहे, तर जगाची आदिम अशी जी समाधिस्त सम आहे त्याने. म्हणजे हे कुठल्याशा आदिम प्रेरणेने होते आहे असे कवीला वाटते आहे. त्याच वेळेस कवीला असेही वाटते आहे की रोपे मातीच्या मोहाने मातीत रुजतात, पण कालांतराने मातीच्या कृपणतेने, मरण पावतात, ह्या निरिक्षणाला संन्यस्ततेने हा थेंब पाहतो आहे.
माती अशी मूक रुदनात आहे. तिच्या ओटीत मुग्ध रोपांच्या बाळांचे आक्रोश आहेत. तेजस सूर्य उघडच ही प्रखरता खुणावीत आहे. आणि अशा क्षणी दवबिंदूच्या ह्या निर्मितीच्या कळांविषयी वाटणार्‍या प्रेमाने ती माती थरारते आहे.
कवीचे पर्यावरण, माती, दवबिंदू, सृजन, मरण हे त्याचे स्वत:चे प्रांत आहेत त्यामुळे असेच का म्हणून आपण त्यात खोड काढू शकत नाही. पण कवीला मातीचे सृजन कमी पडते आहे हे जाणवावे व त्यावर दवबिंदू मातीच्या मदतीस येत आहेत असे वाटावे हे अतिशय संवेदनशीलतेचे आहे. दिवसेंदिवस मातीची सृजनशक्ती वाढतेच आहे हे जरी शास्त्रीय अवलोकन असले तरी कवीमनाला तिचे सृजन कमी पडते आहे असे वाटू शकते, कारण तो वाटण्याचा प्रांत आहे. पर्यावरणाने एकमेका साह्य करू असे वाटत दवबिंदूने मातीच्या साह्यास धावून जावे हे कवीचे वाटणे मात्र अतीव कणवेचे आहे व त्यासाठी ह्या कवितेला दाद द्यावी तेव्हढी कमीच आहे.
-------------------------------- 

बुधवार, १३ मार्च, २०१३

कविता म्हणजे दगडावरची रेघ ?

तरी  
( कवि : दयासागर बन्ने, कविता-रती ( जुलै-ऑगस्ट २००८ ) मधून )

        घुशी वाढलेल्या फार
        किती लिंपाव्यात भिंती ;
        काट्याकुट्याच्या संगाने
        फुले, पाकळ्या फाटती ॥१॥

        वेल मांडवाशी जाता
        येते खुरप्यांना धार ;
        येते खुराड्याबाहेर
        असे टपुनिया घार ॥२॥

        कसे धावायाचे पायी
        कुणी पसरल्या काचा ;
        मुख दिसते मोहक
        पण बसलेली वाचा ॥३॥

        किती पेरणी करावी
        येते आपत्ती मागून ;
        आणि अश्रूंच्या पुरात
        जाते वावर वाहून ॥४॥

        असं विपरीत जिणं
        तरी जगावं लागतं ;
        मुळे जोवरी मातीत
        झाड सोसतं, फुलतं ! ॥५॥

    तसं तर सगळ्या वाङ्मयालाच आपण अक्षर वाङ्मय म्हणतो. पण त्यातल्या त्यात कविता हा प्रकार खरेच अक्षर असाच राहतो. न क्षरणारा, न बदलणारा ह्या अर्थी. निसर्गनियम सारखा बदल करण्याचा, होण्याचा असतो. पण परंपरेने आपण कविता ह्या न बदलणार्‍या ठेवतो. कवीच्या हयातीतच कित्येक शब्दांचे अर्थ बदलतात, त्यातल्या अर्थछटा बदलतात, पण अलिखित नियम असा आहे की एकदा जी कविता केली , बरी वाईट, ती तशीच ठेवायची. त्यात कानामात्राचा फरकही करायचा नाही. जणु कविता म्हणजे दगडावरची रेघच ! खरे तर कवीच्या आयुष्यात व्यक्तिमत्वही व जाणही कालामानाप्रमाणे बदलत जाते. कधी प्रगल्भ होत जाते तर कधी त्यात वेगळ्या जाणीवांचे, विचारांचे धुमारे फुटतात. पण त्या दैवी क्षणाला जी कविता जशी झाली ती कोणी बदलत नाही, पुन: सुधारत नाही. गद्यात असे होत नाही. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळात चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. ते आज हयात असते तर त्यात त्यांनी काही बदल केलाही असता. पण विचारांचे काळाप्रमाणे बदलणारे स्वरूप कवीला त्याच्या हयातीत हेरता येत नाही. कलत्या काळी कळले तरी कविता सुधारता येत नाही. पण अर्थाच्या दृष्टीने पाहिले तर हे न बदलणे, न सुधारणे, कवितेची परिणामकारकता निश्चितच कमी करते. वरच्या कवितेच्या उदाहरणाने हे बघू.
    शेतकर्‍याला काय काय हाल अपेष्टा भोगाव्या लागतात, त्यांच्या मार्गात जणु कोणी काचाच पसरवून ठेवतात, त्याची वाचा बसते, निसर्गही निष्ठूर होऊन पेरण्या वाहून नेतो, असं जिणं विपरीत असलं तरी जगावं लागतं. जसं जोवर झाडाची मुळं जमीनीत असतात तोवर त्याला सोसत पण मातीत रुतून राहावचं लागतं, :फुलतही राहावं लागतं असा सोपा अर्थ ह्या कवितेचा आहे. कवितेवर संपादकीय संस्कार करून शब्द बदलण्याची रीत नाहीय. ( गद्यात मात्र कोणताही विषय असला तरी संपादकाची कात्री व डागडुजी अवश्य चालतेच ! ) . पण शेवटच्या ओळीत झाडाने सोसत राहणं आणि "झाड फुलतं !" असं म्हणणं विसंवादी वाटतं. अर्थाचा अनर्थ जरुर होत नाही, पण मातीत आहे म्हणून झाडानं सोसत राहणं, हे "फुलतं" म्हणण्यानं विरुद्ध अर्थाचं होतं . कदाचित्‌ "झुरतं", किंवा "उरतं" असं एखाद्या संवेदनशील रसिकानं म्हटलं असतं. उद्या जर आपल्याच कविता परत सुधारून लिहिण्याची टूम निघाली तर हाच कवि कदाचित "फुलतं" हा शब्द बदलेलही.  पण तोवर अर्थाची गल्लत चालूच राहणार ! झाड सोसतही आहे व फुलतंही आहे, ( मग काय प्रॉब्लेम आहे ?). बरच आहे की असा निष्कारण निघणारा संभ्रम आहे. कवितेचा रोख जो विपरीतपणावर आहे, तो झाड फुलतं म्हणण्यानं पातळ होतो. कविता म्हणजे काय दगडावरची रेघ ? ती सुधारायची नाही ह्या अलिखित परंपरेमुळे "अनर्थ" मात्र उगाचच फुलत राहतात !    ( कविता : अर्थ व अनर्थ ह्या लेखामधून )

--------------------------------------------

सोमवार, ११ मार्च, २०१३

प्रगल्भतेची गिरकी !

----------------------------------------------------------------------
 प्रगल्भतेची गिरकी
-------------------
१९५० मध्ये धारानृत्य व २००८ मध्ये गिरकी ह्या कवितासंग्रहात कवि पाडगावकरांच्या ३६ काव्यसंग्रहातून निदान ३६०० तरी कविता करून झाल्या असतील. एवढ्या विपुल कवितेत एकाच विषयावरच्या  दोन कविता सापडणे सहज शक्य आहे. गिरकी ह्या शीर्षकाच्या ह्या त्या दोन कविता पहा :
गिरकी ( २३-३-१९५६, छोरी मधून):
समोरच्या हिरव्या झाडावर
मऊ पिसांचे इवलेपण गोजिरवाणे
गाते आहे गाणे:
"इथून
हिरव्या इथून
तिकडे
निळ्या पांढर्‍या तिकडे
गेलेच पाहिजे मला"
गेलेच पाहिजे मला
गेलेच पाहिजे मला
ऐकत असता
खिडकीची हट्टी चौकट
मी इथेच बसुनी उंच उडविली पतंगापरी...
या अडेल भिंतीची--मठ्ठ पहार्‍याच्या
क्षणात केली हवा:
विवस्त्र होउन
पिवळ्या पिवळ्या उन्हात न्हाणारी....
डोक्यावरचे छप्पर डफ्फर नुसते
मी पिसांसारखे दूर उडविले
घालुनि बेछूट फुंकर...
ललललला..ललललला...
गेलेच पाहिजे मला...
सोनेरी केसांच्या
खट्याळ मिस्किल डोळ्यांच्या
हातात गुंफुनि हात उन्हाच्या
घेत घेत गिरक्या
न थांबणार्‍या न संपणार्‍या
गेलेच पाहिजे मला
तिकडे
निळ्या पांढर्‍या तिकडे
त्या उंच कड्यावर
त्या उंच कड्याच्या पल्याड...गहिर्‍या पल्याड
गेलेच पाहिजे मला....
केव्हापासून आहे सर्व तयारी
एवढेच माझे ऐक जरा ग :
हे गाठोडे
माझ्या सगळ्या दु:खांचे, चिंतांचे
पोखरणार्‍या.....
आणिक ही माझी काठी
जी मला हवी आधारासाठी
( भार जगाचा उचलुनिया घेतांना
नाही तर बुडेल ना जग ! )
हे सारे
ठेवशील ना जपुनि ?
शपथ गळ्याची
आल्यावर घेइन सगळे ओझे
पुन्हा एकदा खांद्यावरती
पण आता गेलेच पाहिजे मला...
गिरक्या...
न थांबणार्‍या...
न संपणार्‍या गिरक्या
तल्लख हिरव्या गिरक्या
सोनेरी पिवळ्या गिरक्या...
गिरक्यांचे झुबके
एकीतून दुसरी....
दुसरीतुन तिसरी
गिरक्यांचे उनाड ब्रह्म....
----------------------------
गिरकी ( २००८, गिरकी मधून ) :
गिर गिर गिरकी, गिर गिर गिरकी
मीच घेतली माझ्याभवती गिर गिर गिरकी...
स्तब्ध जसेच्या तसे तरीही
भवतीचे जग फिरू लागले गिरकीसंगे;
जरा थांबलो, मेंदू मध्ये तरी राहिली
सुरूच गिरकी; गिर गिर गिरकी
पुन्हा सुरू मी केली गिरकी,
मिटले डोळे तरीही गिरकी,
उघडे डोळे तरीही गिरकी,
गिर गिर गिरकी, गिर गिर गिरकी
गती अशी ही अद‌भुत गिरकी,
गतीस बनवी नर्तन गिरकी,
गिरकीला ह्या कालही नाही, उद्याही नाही,
आजच केवळ अद्‌भुत गिरकी....
पुढे न जाई अशी गती ही,
पडे न मागे अशी गती ही,
जाणे येणे जिचे थांबले अशी गती ही !
जन्म फिरे का मरणाभवती ?
मरण फिरे का जन्माभवती ?
की फिरवी या दोघांनाही
अपुल्याभवती गिर गिर गिरकी ?
अतीत गिरकी, अतीत गिरकी,
केवळ गिरकी...गिर गिर गिरकी....
-----------------

    दोन्ही कवितेत चक्कर, वर्तुळाकार गतीचे, गिरकीचे चित्रण आहे. ५० वर्षांपूर्वीच्या गिरकीत झपाटलेपणाचे, गेलेच पाहिजे मला ह्या अनाम "साद"चे महत्व आहे. आत्ताच्या २००८ च्या गिरकीत गेयता ज्यास्त आहे. गिरकीचे अद‌भुतपण आहे. जन्माचे मरणाभवती फिरणे, पुन:र्जन्म , व मरणाचे जन्माभोवती फिरणे, प्राक्तन वगैरे प्रगल्भ अशा जीवनतत्वांचे गिरकीत दर्शन आहे. तसेच भूत भविष्यातली नाही तर केवळ वर्तमानातली ही अगतिक गिरकी आहे. असे कालसापेक्ष प्रतिपादन आहे. ८४ लक्ष योनींचा फेरा ( जाणे-येणे) चुकवणार्‍या मोक्षाची ही गती आहे असे अध्यात्मिक वर्णन आहे. कवीच्या परिपक्वतेचे एकाच विषयावरचे दोन भिन्न अर्थ असणार्‍या ह्या कविता ( ५० वर्षांनंतरच्या फरकाने ) आपल्याला पहायला मिळतात. इथे जाणवते की प्रतिभा कालांतराने कवीमनाचा विकास साधत साधत प्रगल्भ होते . पहिल्या गिरकी नंतर पाडगावकरांना कोणी "सुधारणा" सुचवल्या असत्या तर त्याची काही खैर नव्हती ! कवीचे प्रगल्भ होणे असे वयोमानाप्रमाणे एकाच शीर्षकाच्या दोन कवितांनी इथे दिसून येते.

------------------------------------------
   

सोमवार, ७ जानेवारी, २०१३

समवयस्काच्या दारासमोर ( कवी दासू वैद्य )


समवयस्काच्या दारासमोर
------------------------
कवी : दासू वैद्य ( कवितारती दिवाळी २०१२ मधून )
------------------------------
अर्थाच्या गर्द सावलीत
पहुडलेले शब्द
नसतात उत्सुक
सांत्वनाच्या अंगणात यायला
मग आपण नुसतेच स्तब्ध राहतो
दिवंगताच्या दारासमोर,
थोडी माणूसकी,
थोडा शिष्टाचार,
कधी शेजारधर्म
म्हणून आपण रेंगाळतो
मेलेल्या माणसाच्या अंगणात.
पण कोणी समवयस्क गेल्यावर
जरा ज्यास्तच रेंगाळतो आपण,
रडून थकलेल्या
समवयस्काच्या बायकोचा चेहरा
अचानक आपल्या बायकोसारखा
दिसू लागतो,
शोकाचा केंद्रबिंदू होऊन
झोपलेल्या समवयस्काची मुलं
काहीतरी हरवल्यासारखी
आतबाहेर करतायत
तेव्हा या मुलांच्या चपला-बुटात
आपल्या मुलांचे पाय
सहज बसतील याचा विचित्र अंदाज
डोक्यात चमकतो,
आपल्याही नाका-कानात
कापसाचे बोळे असल्यासारखं
वाटू लागतं,
चितेत निवांत झोपलेला
विधिवत पेटवला जातो,
चारी अंगांनी पेटलेल्या चितेत
भुरुभुरु जळू लागतो समवयस्क.

अंग मात्र आपलं गरम होतं.
------------------------------------------
    पहिलं अभिनंदन ह्याचं की ह्या कवितेला तुम्ही अभंग वा इतर वृत्त न वापरता मुक्तछंदच वापरला आहे. मरणाच्या कल्पनेला मुक्तछंदी पसरच मानवतो. कारण मरण हेच मुळी सगळ्या अनुभवांचे लयाला जाणे असल्याने, लयालाच मुक्त करणे हे अगदी चपखलपणाचे आहे. कवितेचा चेहरामोहराच असा थेट प्रत्ययाशी जुळणारा होतो व धीरगंभीरतेचे सूतोवाच होते.
    आजकालचे चित्रकार जसे भावचित्रातल्या व्यक्तीचा नेमका चेहरा न काढता ( चेहर्‍यात नाक डोळे हे थेट ओळख देववणारे अवयव न रेखाटता ) नुसता (ब्लॅंक) अनोळखी चेहरा ठेवतात त्याचप्रमाणे तुम्ही "समवयस्क" हा बिनओळखीचा चेहरा कवितेत गडद केला आहे. खरे तर हा कोणी तरी तुमचा जवळचा मित्र, शेजारी वगैरे नावानिशी असणारा आहे. पण त्याला तुम्ही एक व्यक्ती न ठेवता त्याचा एक वर्ग केला आहे. त्यामुळे हे कोणा एकाचे मरण राहिले नाही तर एका संपूर्ण वर्गाचे, समवयस्कांचे, मरण झाले आहे. ह्यामुळे वाचकालाही ते आपलेही मरण वाटण्याला सोपे जाते कारण नेमका चेहरा रेखाटलेला नसल्याने आपला चेहराही आपण पटकन्‌ त्या जागी कल्पू शकतो. इथे मला फेसबुकची आठवण येते, जेव्हा काही लोक आपला स्वत:चा फोटो न टाकता जनरल फोटोचे प्रोफाईलच राहू देतात. अशाने कोणालाही आपला चेहरा त्याजागी कल्पिता येतो. ह्या योजकतेमुळे कवितेचा प्रभाव प्रचंड वाढतो.
    सामान्यत: जवळच्या माणसांच्या मरणावर जेव्हा कविता करतात तेव्हा स्मशान-वैराग्याची भावना टाळता येणे मोठे जिकीरीचे काम असते. पण आजकाल स्मशान-वैराग्य तसे लवकर येत नाही. कदाचित आजकाल भावनाच मुळी व्यवहाराच्या धारेमुळे बोथट झालेल्या असाव्यात किंवा मरणाराच्या इतक्या जवळचे कोणी असतच नाही असेही असावे. ह्या बदललेल्या जाणीवेंचा स्वीकार करीत त्याला तुम्ही एक वेगळीच छटा दिली आहे. आपण सगळे मर्त्य आहोत हे आपल्याला माहीत असूनही कोणी स्वत: मरायला राजी नसतो किंवा क्वचितच तशी शक्यता आपल्या मनाला कधी चाटून जाते. पण मेलेल्याच्या बद्दल सहवेदना मात्र आपल्याला हलकेच जाणवते. म्हणजे लगेच भीती किंवा अश्रू आले असे न होता, आता हा आपला समवयस्क आणि तो मेला म्हणजे त्याच्या बायकोसारखी आपली बायकोही विधवा होऊ शकते ही शक्यता आपल्याला चाटून जाते. किंवा मेलेल्याची मुले जे चपला-बुट घालताहेत त्याच मापाची आपलीही मुले आहेत की व त्यांचेही असे होऊ शकते हे पटते. ह्या हळू हळू जाणवत जाणार्‍या भावनेत आपण मरणार आहोत अशा स्पष्ट जाणीवेची सुरुवात नाहीय, तर आपली बायकापोरे असेच पोरके होऊ शकतील अशी त्यांच्याबद्दलचे वाटणे आहे. हे जरा रुक्ष वाटणारे असले तरी परिस्थितीला प्रामाणिक राहणारे, व्यवहारी आहे.
    आणि समवयस्काची चिता चारी बाजूनी पेटली की क्षणात सहवेदनेचे शिखरावर जाणे होते आणि समवयस्क जळू लागतो व आपले अंग गरम होऊ लागते असे त्याचे मार्मिक वर्णन योग्य तो क्लायमॅक्स साधते. हे कवितेचे असाधरण कसब आहे. ( मी ही कविता केली असती तर कदाचित "अंग मात्र आपलं गरम होतं" ऐवजी "अंग मात्र आपलं वितळू लागतं" असं म्हटलं असतं. कदाचित त्यानं क्लायमॅक्स थोडा नाट्यमय, भडक, झाला असता, पण क्लायमॅक्सची उंचीही वाढली असती. कवीला कोणी सुधारणा सुचविण्याची आपल्याकडे पद्धत नाही, पण कवीने वाचकाला कवितेत जर इतके गुंफून ठेवले असेल तर त्याने त्याचे वाटणे सांगायचे तरी कोणाला ? ) . असो. कविता मला खूप आवडली.
------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव