सोमवार, ७ जानेवारी, २०१३

समवयस्काच्या दारासमोर ( कवी दासू वैद्य )


समवयस्काच्या दारासमोर
------------------------
कवी : दासू वैद्य ( कवितारती दिवाळी २०१२ मधून )
------------------------------
अर्थाच्या गर्द सावलीत
पहुडलेले शब्द
नसतात उत्सुक
सांत्वनाच्या अंगणात यायला
मग आपण नुसतेच स्तब्ध राहतो
दिवंगताच्या दारासमोर,
थोडी माणूसकी,
थोडा शिष्टाचार,
कधी शेजारधर्म
म्हणून आपण रेंगाळतो
मेलेल्या माणसाच्या अंगणात.
पण कोणी समवयस्क गेल्यावर
जरा ज्यास्तच रेंगाळतो आपण,
रडून थकलेल्या
समवयस्काच्या बायकोचा चेहरा
अचानक आपल्या बायकोसारखा
दिसू लागतो,
शोकाचा केंद्रबिंदू होऊन
झोपलेल्या समवयस्काची मुलं
काहीतरी हरवल्यासारखी
आतबाहेर करतायत
तेव्हा या मुलांच्या चपला-बुटात
आपल्या मुलांचे पाय
सहज बसतील याचा विचित्र अंदाज
डोक्यात चमकतो,
आपल्याही नाका-कानात
कापसाचे बोळे असल्यासारखं
वाटू लागतं,
चितेत निवांत झोपलेला
विधिवत पेटवला जातो,
चारी अंगांनी पेटलेल्या चितेत
भुरुभुरु जळू लागतो समवयस्क.

अंग मात्र आपलं गरम होतं.
------------------------------------------
    पहिलं अभिनंदन ह्याचं की ह्या कवितेला तुम्ही अभंग वा इतर वृत्त न वापरता मुक्तछंदच वापरला आहे. मरणाच्या कल्पनेला मुक्तछंदी पसरच मानवतो. कारण मरण हेच मुळी सगळ्या अनुभवांचे लयाला जाणे असल्याने, लयालाच मुक्त करणे हे अगदी चपखलपणाचे आहे. कवितेचा चेहरामोहराच असा थेट प्रत्ययाशी जुळणारा होतो व धीरगंभीरतेचे सूतोवाच होते.
    आजकालचे चित्रकार जसे भावचित्रातल्या व्यक्तीचा नेमका चेहरा न काढता ( चेहर्‍यात नाक डोळे हे थेट ओळख देववणारे अवयव न रेखाटता ) नुसता (ब्लॅंक) अनोळखी चेहरा ठेवतात त्याचप्रमाणे तुम्ही "समवयस्क" हा बिनओळखीचा चेहरा कवितेत गडद केला आहे. खरे तर हा कोणी तरी तुमचा जवळचा मित्र, शेजारी वगैरे नावानिशी असणारा आहे. पण त्याला तुम्ही एक व्यक्ती न ठेवता त्याचा एक वर्ग केला आहे. त्यामुळे हे कोणा एकाचे मरण राहिले नाही तर एका संपूर्ण वर्गाचे, समवयस्कांचे, मरण झाले आहे. ह्यामुळे वाचकालाही ते आपलेही मरण वाटण्याला सोपे जाते कारण नेमका चेहरा रेखाटलेला नसल्याने आपला चेहराही आपण पटकन्‌ त्या जागी कल्पू शकतो. इथे मला फेसबुकची आठवण येते, जेव्हा काही लोक आपला स्वत:चा फोटो न टाकता जनरल फोटोचे प्रोफाईलच राहू देतात. अशाने कोणालाही आपला चेहरा त्याजागी कल्पिता येतो. ह्या योजकतेमुळे कवितेचा प्रभाव प्रचंड वाढतो.
    सामान्यत: जवळच्या माणसांच्या मरणावर जेव्हा कविता करतात तेव्हा स्मशान-वैराग्याची भावना टाळता येणे मोठे जिकीरीचे काम असते. पण आजकाल स्मशान-वैराग्य तसे लवकर येत नाही. कदाचित आजकाल भावनाच मुळी व्यवहाराच्या धारेमुळे बोथट झालेल्या असाव्यात किंवा मरणाराच्या इतक्या जवळचे कोणी असतच नाही असेही असावे. ह्या बदललेल्या जाणीवेंचा स्वीकार करीत त्याला तुम्ही एक वेगळीच छटा दिली आहे. आपण सगळे मर्त्य आहोत हे आपल्याला माहीत असूनही कोणी स्वत: मरायला राजी नसतो किंवा क्वचितच तशी शक्यता आपल्या मनाला कधी चाटून जाते. पण मेलेल्याच्या बद्दल सहवेदना मात्र आपल्याला हलकेच जाणवते. म्हणजे लगेच भीती किंवा अश्रू आले असे न होता, आता हा आपला समवयस्क आणि तो मेला म्हणजे त्याच्या बायकोसारखी आपली बायकोही विधवा होऊ शकते ही शक्यता आपल्याला चाटून जाते. किंवा मेलेल्याची मुले जे चपला-बुट घालताहेत त्याच मापाची आपलीही मुले आहेत की व त्यांचेही असे होऊ शकते हे पटते. ह्या हळू हळू जाणवत जाणार्‍या भावनेत आपण मरणार आहोत अशा स्पष्ट जाणीवेची सुरुवात नाहीय, तर आपली बायकापोरे असेच पोरके होऊ शकतील अशी त्यांच्याबद्दलचे वाटणे आहे. हे जरा रुक्ष वाटणारे असले तरी परिस्थितीला प्रामाणिक राहणारे, व्यवहारी आहे.
    आणि समवयस्काची चिता चारी बाजूनी पेटली की क्षणात सहवेदनेचे शिखरावर जाणे होते आणि समवयस्क जळू लागतो व आपले अंग गरम होऊ लागते असे त्याचे मार्मिक वर्णन योग्य तो क्लायमॅक्स साधते. हे कवितेचे असाधरण कसब आहे. ( मी ही कविता केली असती तर कदाचित "अंग मात्र आपलं गरम होतं" ऐवजी "अंग मात्र आपलं वितळू लागतं" असं म्हटलं असतं. कदाचित त्यानं क्लायमॅक्स थोडा नाट्यमय, भडक, झाला असता, पण क्लायमॅक्सची उंचीही वाढली असती. कवीला कोणी सुधारणा सुचविण्याची आपल्याकडे पद्धत नाही, पण कवीने वाचकाला कवितेत जर इतके गुंफून ठेवले असेल तर त्याने त्याचे वाटणे सांगायचे तरी कोणाला ? ) . असो. कविता मला खूप आवडली.
------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव