रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

शब्दार्थ व कविता

शब्दार्थ व कविता
-----------------------
कित्येक शब्दांचा वापर कालांतराने खूप कमी होतो म्हणून किंवा त्या वस्तूंचाच वापर कमी होतो म्हणून काही काही शब्दांचे अर्थ पटकन समजत नाहीत. भाषा शास्त्र म्हणते की अर्थ म्हणजे शब्दांचा वापर.               
"सोलापूरला जाताना पंढरपूरची वाट लागली " ह्यात पूर्वी वेगळा अर्थ असे व "वाट लागणे" च्या आजच्या अर्थाने आज वेगळा. 
असेच काही शब्द पाहू :
पराळ : पीठ परातीत कालवतात,त्यावरून हे परात हवे. पण "रानटी" लोकात पराळ म्हणत असतील ? शब्दकोश म्हणतो, संस्कृत पलाल वरून आलेला हा शब्द म्हणजे भाताचा पेंढा,परळ.
खराळ : म्हणजे शब्दकोश म्हणतो कोयता, व हे लाल कोयत्याशी चांगले जुळते.
घळू : लाडाने म्हटलेले हे घळ असावे, कारण अंतराळ ढासळायला इथे सोपे जावे.
काथवट : जेव्हा उसाचे चरक लाकडाचे असत तेव्हा खालच्या तकदीला काथवट म्हणत असे शब्दकोशाला वाटते.
शब्दार्थाच्या मळलेल्या वाटेने कवितेला सामोरे जाणे आज जरी बाळबोध पणाचे वाटत असले तरी आजही चांगली शायरी ह्याच शब्दार्थाच्या वाटेने भेटते . सिद्धहस्त  कवीने "शब्दानो मागुते या " असे वरदान मागणे मराठी सारस्वताला परिचयाचे आहे , पण गूढतेच्या हव्यासा पायी कोशातच सापडतील असे शब्द योजले तर सोशिक रसिकाला बोध कसा व्हायचा ?  कवितेत जर आपण एखाद्या पक्षाचे गाणे शोधत असू व गूढ शब्दांनी केवळ काही कोश ( कोसला, घोसला ) विणलेले दिसले तर पक्षाचे गाणे कसे सापडणार ? कदाचित ह्या गूढतेच्या सिद्धी पायी "स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे " असे होऊन समोर फक्त घोसलाच दिसावा व गाणे हरवावे असे होते !     मेलेल्या कवींच्या  कवितांचा अर्थ जुळवणे तसे बिनधोक असते. जसे कालिदासाच्या मेघदूताचा अर्थ दहशतवादी कवीही करू शकतो, पण तो दहशतवादी कवी जिवंत असून व्हिडीओ काढणारा असेल तर जिवावरच बेतायचे !
आता वरचे अर्थ खरे का, हे कोण कोणाला विचारणार ? व पक्षाचे गाणे ऐकू येणार का केवळ गूढ कोसला दिसणार ? 

पहा बर !
-----------------/

.

पराळात की पीठ काळे
कालवते हे लाल खराळ
आ वासल्या घळूत धावे
ढासळलेले  अंतराळ
.
हिरके ओले धूपे गव्हाळ
काथवटीचा कळकट पाळा
अंगठ्याचे बेंड फुटले
कळा वाहती भळाभळा
.
येरे मेघा ये रेघेत ये
नको मघा रे नको मघा
ओले दिवस अन ओल्या राती
फाड ओसांडून  घळाघळा.

. कवी : गणेश दिघे ( फेसबुक वरून  )

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

कवी गणेश दिघे

कविता म्हणजे :

 

(शीर्षक नाही): कवी गणेश दिघे ( फेसबुक वरून )

बुद्धिमान नरपशूंचा कळप दबा धरून बसलाय प्रत्येक पाठीशी…  
निर्भयपणे वाहाताहेत येथील वाटा अक्षम्य निर्लज्जपणे… 
हे प्रभो तुझ्या अस्तीवाची प्रचीती देणारी 
लिंबू मिरची दारावर लावून 
आंधळ्या  बायकोच्या मांडी लगत
बहिरेपणाने बसने किती सुरक्षित झाले आहे नाही बधीर सुप्रजा प्रसवण्यासाठी ? 
हे परमेश्वरा , आम्हा भित्र्या लोकांच्या निर्मुलनासाठी
आमच्या लिंगाभोवती घट्ट निरोध बनून बस…. 
अखेर विज्ञानाचा नियंकही  तूच आहेस भडव्या !!

-------------- 

शिव्या देण्याचा मतलबच असतो नेमकेपणाने अपमान करण्याचा. शिवी ज्याला द्यायची त्याला ती लागली पाहिजे. जितकी जिव्हारी लागेल तितके बरेच. देवाला अनेकांनी शिव्या दिलेल्या आहेत, ह्या अगोदर. त्यामुळे इथे कवी दिघे जी शिवी देत आहेत ती योग्य का अयोग्य हे जसे आपण पाहू शकतो तसेच ती काय परिणामाची आहे हेही आपण पाहू शकतो.

डास निर्मूलनाची एक शास्त्रीय पद्धत अशी आहे की त्यातले नर डास पकडून त्यांना नपुसक करायचे व त्यांना परत डास समुदायात सोडायचे म्हणजे ते प्रजनन करू शकणार नाहीत व ती प्रजातच नामशेष होईल. बॅंकॉकला असताना मी पाहिले की त्यांच्या संपूर्ण देशात पुरुषांची नपुसकता व व्यसनाधीनता हे मोठ्ठे प्रश्न झाले आहेत. त्याचाच छोटा परिणाम साधत कवी देवाला म्हणतो आहे की तू आमच्या लिंगाभोवती कंडोम सारखा बस म्हणजे आमचे पुढचे प्रजनन होणार नाही व आमच्यासारखी भित्री पिढी निर्माणच होणार नाही.

भडवा हा जसा वेश्येचा दलाल असतो तसा देव हा विज्ञानाचा दलाल आहे ही उपमा तशी चपखलच. कारण विज्ञानाची प्रगती जर पैशात मोजली तर ती शक्य करणाऱ्या देवाची ( धर्माची ) संपत्ती थोडी कमीच भरेल व ती दलाली म्हणता येईल. इथे शिवी देताना कवीला ह्याचे भान आहे की देव खरे तर विज्ञानाचा नियंत्रक पण आजकाल भडवेगिरी करीत आहे.

बळजोर नरपशू व कमजोर अशा ह्या द्वंदात कमजोरांच्या पत्नींचे जे हाल होतात त्यावर कवी इतका उद्विग्न झालेला आहे की कमजोरांची प्रजातच नष्ट झाली तरी त्याला चालेल !

कवितेत टोकाला जायची मुभा असल्याने ह्या टोकांनी विचारांचे टोकदार पल्ले इथे चांगलेच दिसून येतात.

--------------------    

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

कवितेतील प्रतिमा

य' कवितेतील प्रतिमा ' या विषयावरील चर्चा -- भाग २.
या भागात प्रत्यक्ष कवितांवर बोलू. सुरुवातीला जरा कमी प्रतिमा असलेली आणि घटनाक्रमाला सलगता असलेली अरुण कोलटकरांची ' दिवे ' ही कविता घेऊ. यानंतर प्रतिमागच्च असलेल्या आणि घटनाक्रमाची सलगता नसलेल्या कवितेवर बोलू.

दिवे
काहीतरी कुजल्याचा वास याय लागला
अन मी खिशातनं रुमाल काढणार
तोच माझी करंगळी खाली पडली
ती मी दुसऱ्या हातानं उचलून घेतली
अन रुमाल नाकावर धरणार
तर नाकच निसटून रुमालात आलं
ते रुमालात गुंडाळून मी खिशात टाकलं

काहीतरी कुजल्याचा वास येतच होता
म्हणून खिशातल्या खिशात नाक मुरडलं
अन करंगळीत आळ्या पडल्यात की काय
ते बघणार ः पण तेवढ्यात दिवेच गेले

कवी -- अरुण कोलटकर.

वरील कवितेत एकही अवघड शब्द नाही किंवा पद्यमय रचनेत जे वाक्यात अदलाबदल करावे लागतात तसेही कुठे शब्दांचे मागे पुढे केलेले नाही. तरीही पहिल्या वाचनात ही कविता का समजू नये ? किंवा जे  फार भावूक कवीमनाचे लोक आहेत त्यांना भलभलत्या प्रतिमा ह्यात का दिसाव्यात ?
प्रतिमा म्हणजे काहीतरी सादृश्य, मूर्ती किंवा नक्कल असे शब्दकोशात देतात. संपूर्ण कवितेत हे अशासारखे आहे, त्यासारखे आहे असे काहीही वर्णन नाहीय. तरीही लोकांना ह्यात “समाजाचे कुजलेपण” का जाणवावे ? ह्या कवीने त्याला जे वाटतेय ते चक्क सोप्या शब्दात लिहिलेलेच आहे. त्याला समाजाच्या कुजलेपणाबद्दल  लिहायचे असते तर तसे तो का न म्हणता ? बहुतेक ही गल्लत ह्यामुळे होत असावी की जेव्हा तो म्हणतो की माझी करंगळीच तुटली तेव्हा वाचणाऱ्याला हे अशक्य वाटत असावे. म्हणजे दर लाखात एखाद्याची करंगळी अशी तुटते का ? रुमालाने नाक झाकावे तर दर लाखात किती जणांचे नाक असे तुटून रुमालात येत असेल ?
महारोग्यांचे असे होऊ शकते असे मला का सुचावे ? तर कवी म्हणतो करंगळीत आळ्या पडल्या का ते पाहावे. असा कोणता रोग आहे ज्यात आळ्या पडतात ? एकेक अवयव गळून पडतात ?
बरे कवितेत जे मोजके शब्द आहेत ( काहीतरी कुजणे; वास येणे ; खिसा ; रुमाल; करंगळी ; खाली पडणे ; दुसरा हात ; नाक ; गुंडाळणे ; मुरडणे ; आळ्या पडणे ; दिवे जाणे ) त्यांच्या अभिधा ( वाच्यार्थ ), व्यंजना ( व्यंगार्थ : जसे “समाजातल्या सापांना ठेचा” मधले साप ), लक्ष्यार्थ ( जसे : पानावर बसा म्हणजे जेवायला बसा ) अशा अर्थानां हुडकले तर एक “मुरडणे” सोडले तर बाकीचे शब्द अगदीच बाळबोध वळणाचे आहेत. खिशातल्या खिशात नाक मुरडले ह्यात मात्र प्रतिमा वापरल्याचा संशय येईल. पण ते मुरडणे कोणावर आहे ? सगळे प्रकरण स्वगत असल्याने हे स्वतः वरचेच मुरडणे असणार. इथे मात्र कुजका वास येण्यावर हे मुरडणे असू शकते. म्हणजे जगण्याच्या आसक्तीवर हे मुरडणे असावे. आळ्या पडल्या की खेळ खलास होणार हे कळायला दिव्यात बघावे तो दिवेच गेले. म्हणजे मरण दिसणे कसे व्हावे ?
इतकी सोपी कविता असताना त्यात काही अध्यात्मिक असेल , समाजाच्या दुष्ट प्रवृत्तीवर भाष्य असेल ह्या कविता-बाह्य अपेक्षांनी आपणच ही कविता अवघड करतो. कुठे नसलेल्या प्रतिमा पाहतो !
-----------------------------------------------
अनेकार्थता
अनेकार्थता ही शब्दात असते की कविता ह्या काव्य-प्रकारातच असते ? शब्द तोच , पण तो निबंधात येत असेल तर नेमक्या अर्थाचा असतो व कवितेत असेल तर अनेकार्थाने येतो, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा लोकप्रिय मिथक निर्माण केलेले असेल की कवितेत अनेकार्थता असते व ती चांगलीच असते. मर्ढेकरांची “ह्या गंगेमधि गगन वितळले ” ही कविता भागवतासारख्या साक्षेपी संपादकांना वाटले की ती महात्मा गान्धीवरची कविता आहे व त्यानी तशी ती सत्यकथेच्या  गांधी विशेषांकात छापलीही होती. पण खात्री करावी म्हणून त्यानी जेव्हां मर्ढेकरानाच विचारले तेव्हा त्यानी ती गांधीवरची नाही म्हणून स्पष्ट केले तेव्हा हे अनेकार्थाचे प्रकरण मिटले. कोणत्याही कलाकृतीत प्रत्यक्ष काय म्हटले आहे हेच महत्वाचे असावे. मर्ढेकरांची पत्नी त्यावेळेस गर्भार होती व म्हणून “मुकी बाळे” म्हटले आहे ही काही योग्य समीक्षा होत नाही. कारण त्यातली माहिती ही कलाकृती-बाह्य माहिती होते. अनेकार्थतेचे भूत हे अशा कला-बाह्य अभिनिवेशानेच वाढीस लागते व म्हणूनच ते टाळावयास हवे.
कवीने जर एखादा नवीनच शब्द निर्मिलेला असेल ( जसे : झपूर्झा ) तर पूर्वी तळटीप देवून सांगत तेच बरे असे. आजकाल काहीच कवीने न सांगण्याने अनेकार्थाचे फावते व समीक्षकांची चांगलीच सोय होते. पण कवितेत मुळातच अनेकार्थता असते व ती चांगलीच असते ही केवळ एक आवई आहे.
-----------------------------------------------
अर्थ नेमका असतो का मोघम ?
एखादा चित्रकार स्टिल-लाईफ नावाचे फळांचे, सूरईचे, वगैरे चित्र काढतो तेव्हा जे दिसते आहे तसेच तो ते रेखाटतो. फार तर त्याच्या छाया ( शेड्स ) तो कमी-जास्त दाखवील. सूरई एखाद्या कमनीय बाईच्या मानेसारखी दिसते आहे असे होत नाही. ह्या प्रकारात अर्थाच्या शक्यता फार संभवनीय नसतात. रंग, रेखा, छाया हे सगळे प्रत्यक्षातलेच असावे लागते.  हाच चित्रकार जेव्हा Abstract चित्र काढतो तेव्हा अर्थातच नेमके कळणे विरळाच, इतकी अनेकार्थता ह्या प्रकारात असते. कारण आता रंग, रेखा, आकार ह्याना काही विषयाचे बंधन रहात नाही. पण असल्या चित्रात अनेकार्थता असते का मोघमपणा ?
मुळात अर्थ ही कल्पनाच मोघमपणाची आहे. अर्थ हे कधीच नेमके नसतात. अर्थाचा एक पसर असतो. “चांगला” पेक्षा “उत्तम” हे जास्त चांगलेपणाचे असते. अर्थाच्या ह्या पसरात अर्थाच्या नेमकेपणाच्या बऱ्याच जवळ जाणारे “शब्द” आपण योजत असतो व त्यायोगेच अर्थाचा नेमकेपणा आपण साधतो. त्याला मदत म्हणून मग उच्चारांचा टोन, पीच वगैरे आवाजाची साधने कामाला येतात ( नाटकात विशेषच.). त्यामुळेच मुळात अर्थ मोघम असले तरी भाषेच्या अभ्यासाने “शब्द” हे बरेच नेमकेपणा साधतात. जी कलाकृती शब्दांनी रचिली जाते तिला बऱ्यापैकी नेमकेपणा असू शकतो. कलाकृती जर शब्द-बद्ध असेल तर ती बऱ्यापैकी नेमकी असावी. थोडा फार मोघमपणा शक्य आहे. पण अनेकार्थता असणे हे मग त्या कल्पनेच्या मोघमपणाचेच द्योतक होईल. रचनेचे नाही. उदाहरणार्थ : ग्लोबलाईझेशन ही कल्पनाच समजा आज मोघम आहे तर ती कवितेत आली काय वा निबंधात, तिच्या आविष्कारात मोघमच राहणार. “वेटिंग” ह्या कल्पनेतच अनेकार्थाच्या शक्यता असतील तर “वेटिंग फोर गोदोत” हे नाटक  अनेकार्थी  होईलही. पण त्यासाठी अनेक अर्थांच्या छटा असलेले वेग-वेगळे शब्द, किंवा त्यांचे वेगवेगळे उच्चार अनेकार्थासाठी वापरावे लागतील.
----------------------------------------------------------
अर्थ नेमका असतो का मोघम ?
एखादा चित्रकार स्टिल-लाईफ नावाचे फळांचे, सूरईचे, वगैरे चित्र काढतो तेव्हा जे दिसते आहे तसेच तो ते रेखाटतो. फार तर त्याच्या छाया ( शेड्स ) तो कमी-जास्त दाखवील. सूरई एखाद्या कमनीय बाईच्या मानेसारखी दिसते आहे असे होत नाही. ह्या प्रकारात अर्थाच्या शक्यता फार संभवनीय नसतात. रंग, रेखा, छाया हे सगळे प्रत्यक्षातलेच असावे लागते.  हाच चित्रकार जेव्हा Abstract चित्र काढतो तेव्हा अर्थातच नेमके कळणे विरळाच, इतकी अनेकार्थता ह्या प्रकारात असते. कारण आता रंग, रेखा, आकार ह्याना काही विषयाचे बंधन रहात नाही. पण असल्या चित्रात अनेकार्थता असते का मोघमपणा ?
मुळात अर्थ ही कल्पनाच मोघमपणाची आहे. अर्थ हे कधीच नेमके नसतात. अर्थाचा एक पसर असतो. “चांगला” पेक्षा “उत्तम” हे जास्त चांगलेपणाचे असते. अर्थाच्या ह्या पसरात अर्थाच्या नेमकेपणाच्या बऱ्याच जवळ जाणारे “शब्द” आपण योजत असतो व त्यायोगेच अर्थाचा नेमकेपणा आपण साधतो. त्याला मदत म्हणून मग उच्चारांचा टोन, पीच वगैरे आवाजाची साधने कामाला येतात ( नाटकात विशेषच.). त्यामुळेच मुळात अर्थ मोघम असले तरी भाषेच्या अभ्यासाने “शब्द” हे बरेच नेमकेपणा साधतात. जी कलाकृती शब्दांनी रचिली जाते तिला बऱ्यापैकी नेमकेपणा असू शकतो. कलाकृती जर शब्द-बद्ध असेल तर ती बऱ्यापैकी नेमकी असावी. थोडा फार मोघमपणा शक्य आहे. पण अनेकार्थता असणे हे मग त्या कल्पनेच्या मोघमपणाचेच द्योतक होईल. रचनेचे नाही. उदाहरणार्थ : ग्लोबलाईझेशन ही कल्पनाच समजा आज मोघम आहे तर ती कवितेत आली काय वा निबंधात, तिच्या आविष्कारात मोघमच राहणार. “वेटिंग” ह्या कल्पनेतच अनेकार्थाच्या शक्यता असतील तर “वेटिंग फोर गोदोत” हे नाटक  अनेकार्थी  होईलही. पण त्यासाठी अनेक अर्थांच्या छटा असलेले वेग-वेगळे शब्द, किंवा त्यांचे वेगवेगळे उच्चार अनेकार्थासाठी वापरावे लागतील.
----------------------------------------------------------
वाटते तसे दिसणे, समजणे
“चक्षुर्वै सत्यं” हे आजकाल विज्ञानाने जवळ जवळ मोडीत काढले आहे व आपल्या मनात असते तेच आपल्याला दिसते अशा शक्यता निर्माण होतात. अशाच प्रकारे ऐकण्याचेही आहे. असेच जर लिहिलेले वाचताना वाचकाच्या मनात जे असेल तेच त्याला समजणे शक्यतेचे आहे.
पण मग कवीच्या मनात काय होते त्याचे काय ? भाषा ही जर नेमक्या भावना पोचवण्याची कला असेल तर अनेक अर्थ वलये निर्माण करणे हे कौतुकाचे का असमर्थतेची पावती ? एकीकडे समर्थ कवीने म्हणावे की अनेक वर्षे 
लागली तरी हरकत नाही, माझा समानधर्मा येईल तेव्हा कळेल, कारण काल अनंत आहे वगैरे. आणि मग ह्या कवीचे सामर्थ्य ते काय ? शिवाय गद्यात अशा अर्थवलयांची मातब्बरी न मानता तिथे ती कमजोरी व पद्यात त्याचे कौतुक हा रडीचा डाव होतो.
अर्थात ( MEANING ) , INTENTIONALITY & TRUTH CONDITIONS ह्या दोन महत्वाच्या बाबी असतात. आणि दोन्हीना प्रमाण मानले तर अनेकार्थता शक्य असली तरी तो भाषेचा गुण ठरत नाही.
-----------
अर्थ असावा का ?
अनेक कलांमध्ये चित्रकलेची मातब्बरी आहे. चित्रकला ही भाषेच्या आधी असल्याने ती कायम इतर कलांची म्होरकी राहिलेली आहे. अगोदर हुबेहूब काढणारे चित्रकार आता वाट्टेल तशी चित्रे काढतात व त्यांना काही अर्थ असावा अशी आजकाल कोणाची अपेक्षाही नसते. चित्रांना अर्थ असण्याची गरज आजकाल  राहिलेली नाही व त्यांचा अर्थ आजकाल कोणी विचारीतही नाही. ( आमच्या मुकंद कंपनीत द.रा.बेंद्रे ह्यांचे एक भव्य चित्र गेली दहा पंधरा वर्षे टांगलेले होते. ते एकदा साफसुफीसाठी काढले होते तेव्हा त्याचे नाव कळाले “Human Holes”. आणि हे ही कळले की ते इतकी वर्षे उलटे टांगलेले होते !).
मग कवितेला तरी अर्थ का असावा ? ग्रेस म्हणायचे तसे ती नुसतीच का असू नये ?
----------------

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

झपूर्झा

झपूर्झा

(आपल्यास जे काही नाही असे वाटते, त्यांतूनच महात्मे जगाच्या कल्याणाच्या चिजा बाहेर काढितात. त्या महात्म्यांची स्थिती लक्ष्यात वागवून पुढील गाणे वाचिल्यास, ते दुर्बोध होऊ नये असे वाटते. )

(जाति – झपूर्झा)

हर्षखेद ते मावळते,
हास्य निवालें
अश्रु पळाले;
कण्टकशल्यें बोंथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !             १

हर्षशोक हे ज्यां सगळें,
त्यां काय कळे ?
त्यां काय वळे ?
हंसतिल जरि ते आम्हांला,
भय न धरुं हें वदण्याला :-
व्यर्थीं अधिकची अर्थ वसे,
तो त्यांस दिसे,
ज्यां म्हणति पिसे,
त्या अर्थाचे बोल कसे?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !            २

ज्ञाताच्या कुंपणावरुन,
धीरत्व धरुन
उड्डाण करुन,
चिद्घनचपला ही जाते,
नाचत तेथें झगझगते
अंधुक आकृति तिस दिसती,
त्या गाताती
निगूढ गीति;
त्या गीतीचे ध्वनि निघती –
झपूर्झा ! गडे झपूर्झा !           ३

नांगरल्याविण भूई बरी
असे कितितरी
पणे शेतकरी
सनदी तेथें कोण वदा?-
हजारांतुनी एकादा !
तरी न, तेथुनि वनमाला
आणायला,
अटक तुम्हांला;
मात्र गात हा मंत्र चला –
झपूर्झा ! गडे झपूर्झा !          ४

पुरुषाशीं त्या रम्य अति
नित्य प्रकृति
क्रीडा करती;
स्वरसंगम त्या क्रीडांचा
ओळखणें, हा ज्ञानाचा
हेतू; तयाची सुन्दरता
व्हाया चित्ता –
प्रत ती ज्ञाता
वाडें कोडें गा आतां –
झपूर्झा ! गडे झपूर्झा !         ५

सूर्य चन्द्र आणिक तारे
नाचत सारे
हे प्रेमभरें
खुडित खुपुष्पें फिरति जिथें;
आहे जर जाणें तेथें
धऱा जरा, नि:संगपणा,
मारा फिरके,
मारा गिरके,
नाचत गुंगत म्हणा म्हणता –
झपूर्झा ! गडे झपूर्झा !         ६

मुंबई, २ जुलै १८९३
करमणूक, २९ जुलै १८९३, पृ. ३१६
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ९८-९९