रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

शब्दार्थ व कविता

शब्दार्थ व कविता
-----------------------
कित्येक शब्दांचा वापर कालांतराने खूप कमी होतो म्हणून किंवा त्या वस्तूंचाच वापर कमी होतो म्हणून काही काही शब्दांचे अर्थ पटकन समजत नाहीत. भाषा शास्त्र म्हणते की अर्थ म्हणजे शब्दांचा वापर.               
"सोलापूरला जाताना पंढरपूरची वाट लागली " ह्यात पूर्वी वेगळा अर्थ असे व "वाट लागणे" च्या आजच्या अर्थाने आज वेगळा. 
असेच काही शब्द पाहू :
पराळ : पीठ परातीत कालवतात,त्यावरून हे परात हवे. पण "रानटी" लोकात पराळ म्हणत असतील ? शब्दकोश म्हणतो, संस्कृत पलाल वरून आलेला हा शब्द म्हणजे भाताचा पेंढा,परळ.
खराळ : म्हणजे शब्दकोश म्हणतो कोयता, व हे लाल कोयत्याशी चांगले जुळते.
घळू : लाडाने म्हटलेले हे घळ असावे, कारण अंतराळ ढासळायला इथे सोपे जावे.
काथवट : जेव्हा उसाचे चरक लाकडाचे असत तेव्हा खालच्या तकदीला काथवट म्हणत असे शब्दकोशाला वाटते.
शब्दार्थाच्या मळलेल्या वाटेने कवितेला सामोरे जाणे आज जरी बाळबोध पणाचे वाटत असले तरी आजही चांगली शायरी ह्याच शब्दार्थाच्या वाटेने भेटते . सिद्धहस्त  कवीने "शब्दानो मागुते या " असे वरदान मागणे मराठी सारस्वताला परिचयाचे आहे , पण गूढतेच्या हव्यासा पायी कोशातच सापडतील असे शब्द योजले तर सोशिक रसिकाला बोध कसा व्हायचा ?  कवितेत जर आपण एखाद्या पक्षाचे गाणे शोधत असू व गूढ शब्दांनी केवळ काही कोश ( कोसला, घोसला ) विणलेले दिसले तर पक्षाचे गाणे कसे सापडणार ? कदाचित ह्या गूढतेच्या सिद्धी पायी "स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे " असे होऊन समोर फक्त घोसलाच दिसावा व गाणे हरवावे असे होते !     मेलेल्या कवींच्या  कवितांचा अर्थ जुळवणे तसे बिनधोक असते. जसे कालिदासाच्या मेघदूताचा अर्थ दहशतवादी कवीही करू शकतो, पण तो दहशतवादी कवी जिवंत असून व्हिडीओ काढणारा असेल तर जिवावरच बेतायचे !
आता वरचे अर्थ खरे का, हे कोण कोणाला विचारणार ? व पक्षाचे गाणे ऐकू येणार का केवळ गूढ कोसला दिसणार ? 

पहा बर !
-----------------/

.

पराळात की पीठ काळे
कालवते हे लाल खराळ
आ वासल्या घळूत धावे
ढासळलेले  अंतराळ
.
हिरके ओले धूपे गव्हाळ
काथवटीचा कळकट पाळा
अंगठ्याचे बेंड फुटले
कळा वाहती भळाभळा
.
येरे मेघा ये रेघेत ये
नको मघा रे नको मघा
ओले दिवस अन ओल्या राती
फाड ओसांडून  घळाघळा.

. कवी : गणेश दिघे ( फेसबुक वरून  )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा