शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

कविता म्हणजे
----------------------- 
दोष कुणाचा ?
( कवी : वंदना कुलकर्णी, कविता-रती मे-जून २०१७ )
---------------
आपलंच रक्ताचं नातं
म्हणून मनात सुशोभित करत आले,
नात्याची वीण
घट्ट आहे म्हणून
सुंदर पेड घालत गेले,
पण एके दिवशी विणतानाच
एखादा टाका निसटावा
आणि भरलेली साखळी
उकलत जावी
तशी नात्याची वीण
उकलत गेली
आणि राहून गेले
नात्याच्या कलाकृतीचे स्वप्न,
फक्त शब्दच शब्दांशी
संवाद करत राहिले
मग मला जाणवले
दोष कोणाचा ?
नात्याच्या संज्ञेचा ?
की आपण लावलेल्या प्रेमाचा ?
----------------------------------------------  
लोपत चाललेली नाती व त्यातला विसंवाद ही आजची सार्वत्रिक भावना आहे व ती ह्या कवीच्या कवितेतून प्रभावीपणे यावी हे साहजिकच आहे. पण ह्या कवितेतून हे काही नुसते भावनाप्रदर्शन नाही तर ह्यात दोष आपण जे नात्यात प्रेम लावतो तोच आपला दोष आहे असे मांडलेले आहे.
कवीला कवितेत हवे ते मांडायचा अधिकार आहे. शिवाय असे म्हणतात की कवितेत मांडलेला तर्क हा तर्क विषयांच्या निकषावर घासून पुसून घ्यायचा नसतो. ती एक तात्कालिक स्फुरलेली भावना असते. पण अशाने होते काय की कवितेकडे कोणी एक प्रगल्भ विचार म्हणून पहातच नाही. केवळ र ला र व ट ला ट लावून टाकलेल्या ओळी अशी त्याची बोळवण होते.
पण इतकी चुकीची तर्कसंगती का म्हणून पसरू द्यावी ? नात्यात आपण जेव्हा प्रेम पेरतो तेव्हा त्याची परतफेड व्हावी अशी काही आपली भावना नसते. आपले प्रेम आहे म्हणून आपण ते जोपासतो. ते प्रेम जर वाढले नाही, परत लोटून आले नाही, ज्यांच्यावर प्रेम केले ते करंटे निघाले, तर त्यात आपल्या प्रेम करण्याचा दोष नसतो. निळ्या डोळ्यांच्या आईबापांची अपत्ये सगळीच गुणसूत्रे घेतील अशी शक्यता नसते. तसेच आपण ज्याच्यावर माया केली तो ती परतीने आपल्याला देईल अशी शक्यता हमखास अशी म्हणता येत नाही. त्यामुळे तो आपला दोष आहे हे म्हणणे खिन्नता दाखवत असले तरी तर्काचे होत नाही. तसेच अशाने जे खिन्न होतात त्यांना अजूनच खिन्न करणारे व दाट नकारात्मक विचाराचे  होते.
केवळ भावनेचा एक पदर अति परिणामकारक करण्याच्या मोहाने कवीने असे अतार्किक विचार समाजात पसरवणे घातक आहे. त्याऐवजी जे नात्यांची वीण उचकटतात त्यांच्या पदरी करंटेपण देत म्हणावे की भले आपण प्रेमाने कारले लावले पण ते कडूच निघणार ! व त्याला कोणत्या चिंचेच्या पाण्याने कसे सौम्य करता येते ते सांगावे !
अर्थात विचार करायला लावले हे कवितेचे यशच म्हणायला हवे !

---------------------------

शनिवार, ८ जुलै, २०१७

श्रीज्ञानेश्वरसमाधिवर्णन    ( कवी : अरुण कोलटकर )
--------------------------------
स्वच्छ निळसर रिकामे अंबर
नारद तुंबर अभ्र विरे
कधी केले होते गंधर्वांनी खळे
स्वतःशीच खेळे चंद्रबिंब
पांगले अवघ्या वैष्णवांचे भार
ओसरला ज्वर मृदंगाचा
मंदावली वीणा विसावले टाळ
परतून गोपाळ घरी गेले
स्थिरावला हार वाळली पाकळी
गुंतली फासळी निर्माल्यात
-------------------- 
कोणाची सय येणे, आई मिस यू होणे, विरह होणे ह्या विरह भावनेच्या पहिल्या पायऱ्या धरल्या तर प्रियकर आता कधीच भेटणार नाहीय ( किंवा तो मेलाय ) असे असेल तर विरहाचे टोक क्षोभाकडे अथवा शोकाकडे जाते.
गणपतीचे विसर्जन करताना “पुढच्या वर्षी लवकर या” अशी हमी तरी असते. पण समाधी घेताना सगळे आटोपतेच त्याचे इथे मोठे मनोहारी वर्णन आहे. ज्याच्या ओढीने आपण दर्शनाला जावे त्याची हुरहूर जशी वारकऱ्यांना वारीहून परतताना लागते त्याच्याच पुढची अवस्था इथे दिसत आहे.
स्वच्छ निळसर आभाळ आहे, ढग विरलेले असल्याने नारद, तुंबर असे सप्तर्षी दिसत आहेत. चंद्रबिंब आपल्याशीच खेळत आहे ( ज्ञानेश्वरांचे असे विश्वाचे वर्णन आहे की ही प्रकृती “आपणच खेळे आपणाशी”, त्याची आठवण इथे कोलटकर करून देत आहेत) आणि अशी शंका आहे की कोणा गंधर्वाने चंद्राभोवती खळे केले आहे की काय ? ( त्याचा अर्थ आता कोणाचा तरी मृत्यू होणार आहे.). वैष्णवांचे जे जथ्थे आले होते ते आता पांगले आहेत. टिपेला जाण्याचा मृदुंगाचा ज्वर आता ओसरला आहे. विना मंदावली व टाळ विसावले आहेत व शिष्य/वारकरी घरी परतून गेले आहेत. गळ्यातला हलणारा हार आता स्थिरावला असून पाकळी वाळली आहे. ज्ञानेश्वरांच्या छातीची व हारातल्या देठाची “फासळी” ज्या हारात गुंतलेली आहे त्याचे आता निर्माल्य झाले आहे.
भक्तांसाठी फासळीचे निर्माल्य होणे ही विरहाच्या जरा पुढची पायरी इथे छान वर्णिली आहे !

------------------------    

शुक्रवार, ९ जून, २०१७

कविता म्हणजे
-----------------------   
कोण विचार करतोय
( कवी : सोपान हाळमकर, कविता-रती मार्च-एप्रिल २०१७ )
पान्हावल्या गायीचं
आखडावं वासरू तसं,
नवकरीच्या दावणीला बांदल
आठ बैली नांगराचं
यलक्याच शिळवाट
कवळ्या मानत अडकिलं
तवापासून ---
झाडाच्या फाट्याला
बांधून ठेवावी
दुपारची भाकरी
तशी केली चाकरी
हिरवळीच्या नादानं
मुन्गस्याची नाही
सोडली दोरी
भाकरीला चटणी पुरल
अन् चटणीला भाकरी पुरल
अशीच जिंदगी जगली !
बोडं फुटतील तशी करावी
कापसाची यचनी
तशी महिन्यावारी
घरच्यांनी लूट केली
आता रान उघडल्यावर---
पल्हाट्या अन् रिकाम्या नख्या
हसतात खदाखदा—
आम्ही रानभैरी, पर माणसात
ऱ्हावून बी कसं कळलं नाही तुला
शेळ्यावनी माणसं ओरबाडतात पाला
कोण विचार करतोय, काय वाटतं झाडाला ?
-----------------------
शेळ्यांप्रमाणे माणसेही आजकाल झाडांचा पाला ओरबाडतात. तेव्हा झाडांना काय वाटत असेल, असा कवीला प्रश्न पडलाय. आणि त्याचा कोणी विचार करीत नाहीय ही त्याची खंत आहे. खरे तर इथे कवीला अजून जरा हळवे व्हायची मुभा होती. म्हणजे झाडा ऐवजी भाजीपाल्याचा पाला ( जसे: पालक, चुका, मेथी वगैरे ) जेव्हा आपण खातो तेव्हा त्या भाजीपाल्याला काय वाटत असेल असे हळवेपण कवी बाळगू शकला असता. ( “शेळ्यावाणी” असे म्हटल्याने काटेकोरपणे पाहिले तर केवळ खुरटी झाडे, झुडपे इथे लागू होतात, पण कवीचे म्हणणे इतके काटेकोरपणे पहायचे नसते ! ).
कवीच्या मनाला भटकण्याची परवानगी घ्यावी लागत नाही व त्यामुळे तो आधी शेतकरी होता व नंतर नोकरीदार झालाय ते आपल्याला कवितेत आधी सांगतोय. पूर्वीच्या काळी अशी एक म्हण होती की “उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी ”  आजकाल परिस्थिती उफराटी झाली आहे हे सांगताना तो मोठी मार्मिक प्रतिमा वापरतो आहे. अगोदरच्या शेतीत असताना भाकरीला पुरेल एव्हढी चटणी व चटणीला पुरेल एव्हढी भाकरी अशी स्थिती होती हे तो नेमकेपणे सांगतो. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना नोकरीवाल्यांचा कसा हेवा वाटतो हे सांगतांना तो नोकरीची उपमा मोठी मार्मिक देतो. तो म्हणतो कापसाची बोंडं जशी फुटतील तशी आपण वेचणी करतो, तसे नोकरीवाले दर महिन्याला पगार घेतात म्हणजे खरे तर एक प्रकारे वेचणीच करीत असतात. आणि शिवाय हे त्याच्या घरच्यांनाही लुटीसारखेच आहे. मालकाला फायदा होवो अथवा घाटा, घरच्यांची पगारावर लूटच असते ! लठ्ठ पगार घेणाऱ्यांनी हा हेवा अवश्य नोंद करण्यासारखा आहे. इथे कवीतला शेतकरी पगारदारांविरुद्ध धोक्याची घंटा वाजवितो आहे.
कवितेत अनेक शब्द शहरी लोकांना सहजी न कळणारे आहेत खरे, पण निदान एव्हढे तरी नक्की कळण्यासारखे आहे. आणि तेही खूप ढवळून काढणारे आहे.
---------------------------------- 
अरुण अनंत भालेराव

-------------------------  

गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

ग्रेसांची इंग्रजी दुर्बोधता !
कवी ग्रेस ह्यांचे इंग्रजीही मराठीच्याच उंचीचे होते व अगदी सम-भावाने त्यांनी इंग्रजी कवितातही दुर्बोधता पेरून ठेवली असावी. ही काही समीक्षा नसून समजण्याच्या वाटेला आलेले भागधेय म्हणावे लागेल. उदाहरणार्थ ही कविता पहा:
( सांध्यपर्वातील वैष्णवी मधून पृ : १९६)
अवकाश, अरबी मुली आणि तुर्की मुले 


Physical form
of your troeling
and divine
hysteria of rhetoric
in your soul
is now sleeping like an
exhausted, motherless child.
Do you remember the
hunted death of that
trecherous, crimson, wise
bird ? Whose body was
never brought to it’s grave;
retriever had only a saffron
feather…
मोठ्या साहित्यिकाला त्याच्या लिखाणातल्या स्पेल्लीन्गच्या चुका काढल्या तर स्वाभाविकच राग येतो. पण एकवेळ स्पेलिंग चुकले तर आपण ते अंदाजाने सुधारून घेवून तसे वाचून अर्थाजवळ जाऊ शकतो. पण छापलेला शब्द जर कुठे नसलाच तर त्याचा अर्थ तरी कसा निघायचा ?
Troeling असा काही शब्दच इंग्रजीत नाहीय तेव्हा त्याचा अर्थ तरी कसा असणार ? जर जुन्या परंपरेने पद्याची फोड केली तर Physical form of your troeling and divine hysteria of rhetoric in your soul is now sleeping like an exhausted, motherless child ह्या वाक्याचा अर्थ troeling ऐवजी being ठेवले तर बरोबर निघतो तो असा: Physical form of your being and divine hysteria of rhetoric in your soul is now sleeping like an exhausted, motherless child. खरे तर भाषाशास्त्रात अर्थ हा वाक्याने येतो, पण इथे हा आडमुठा शब्द जाम अर्थाला जवळ फटकू देत नाही !
----------------------------------

बुधवार, १८ जानेवारी, २०१७


एक लोणकढी

कवी ग्रेस हे फार चोखंदळ कवी. सहसा त्यांचे शब्द चूक नसतात. अजब असतात व ते शोधावे लागतात. पण कधी कधी त्यांचे चुकते की छापणाऱ्यांचे हे कळायला मार्ग नसला तरी कळण्याची गोची होते.


आता हे कडवे ( सांध्यपर्वातील वैष्णवी, बकुळा, पृ: १२७)पहा :

प्रत्येक गढीवर कढी

ही पद्मकळ्यांची चित्रे

पाताळघरातुन हिजला

येतात कुणाची पत्रे

-----------------

गढीवर कुठे कुठे चहा पिणारी मंडळी दिसतात पण ते कढी पीत असतील फारच असंभव. खालच्या ओळीत पद्मकळ्यांची चित्रे आहे, तेव्हा ती ही प्रत्येक गढीवर चित्रे काढी हे समजायला सहज जावे. पण कढी ?

--------------------

आता ही कवीची लोणकढी की आपल्या समजुतीच्या कढीला आलेला ऊत की अर्थ काढताना समीक्षकाला ज्या कळा येतात त्याने पातळ होणारी कढी ?

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

एका वास्तवाचा दंश !
कविता-रती, दिवाळी २०१६ मधून
शेषांग   ( कवी : दत्तप्रसाद दाभोळकर )
मनापासून
“या”
म्हणत नाहीत.
उघडपणे
“जा”
म्हणत नाहीत.
खरंच
मुले आता मोठी झालीत !

एका अतिशय छोट्या कवितेत एका वास्तवाचा प्रचंड दंश करणारी ही कविता आहे. ह्यात आजकाल मुले मोठी झाली की आई-बापांबरोबर कशी वागतात, मनापासून या म्हणत नाहीत व लाजे काजे जा म्हणत नाहीत हे वास्तव मांडलेले आहे.
सगळ्यात बहार म्हणजे ह्या कवितेचे शीर्षक, जे आहे शेषांग ! शेष म्हणजे सर्पांचा राजा व त्याचे अंग म्हणजे मुले. साध्या भाषेत म्हणता येईल, सापाची अवलाद ! इथे केवळ मुलांनाच नावे नाहीत तर आईबापांनाही ! व्वा ! व्वा !
------------------------


  

बेपत्ता ( कवी : दासू वैद्य कवितारती दिवाळी २०१६)


बेपत्ता 
( कवी : दासू वैद्य , कवितारती दिवाळी २०१६ मधून)
-----––----------------------

वातावरणात

कविता पसरलेली

रसिकांसमोर

कविता वाचतोय कवी

 

वेळेसोबत मैफल रंगत गेली

घरातले-मनातले

गडद होत गेले संसार

परिणामी उपस्थितांच्या मनात

वाढत गेली चुळबुळ

 

कवी मनकवडा

ओळखला रागरंग

केली घोषणा

शेवटच्या कवितेची,

लोकही सावरून बसले

ऐकायला भैरवी

 

कवी शोधू लागला भात्यात

शेवटचा बाण

उलटू लागला पानं

शोधू लागला कविता,

उपेक्षित कविता काही

लवकर सापडेना

 

“आत्ता समोरच्या अंगणात तर

होती खेळत ”

अशा भरोशावर

पुन्हा पुन्हा उलटतोय पानं

अनुक्रमणिकेच्या झरोक्यातून

पाहतोय कविता

पुढ्यातले दोन-तीन कवितासंग्रह

काढले धुंडाळून

 

लोक पाहतायत

स्वतःची कविता शोधताना

अस्वस्थ झालेला कवी

जत्रेत हरवलेल्या

लेकराच्या बापासारखा

कवीचा चेहरा,

एकदा चष्मा घालून

एकदा चष्मा काढून

उलटली पुस्तकांची पानं,

घामाघुम कवीला पाहून

रसिक विसरले क्षणभर

घरी जायला झालेला उशीर.

 

कवी उलटतोय पानं

शोधतोय कविता

कविता मात्र सापडत नाहीये.

 

तशी एरवीही

कवीला अपेक्षित कविता

बेपत्ताच असते

संग्रहातून.

 

इथे एका गंमतीदार प्रसंगावर दासू वैद्य ह्यांनी एक कविता केली आहे. एका काव्यगायनात कवीला त्याचीच एक कविता सापडत नाही व त्यावरून कवी म्हणतो की नाही तरी कवीची अपेक्षित कविता ही संग्रहातून बेपत्ताच असते. ही काही प्रासंगिक गंमत नाही, तर कवी, त्याची म्हणता येईल अशी कविता, व कवितेचे असणे अशा सखोल विषयावरचे हे न केलेले भाष्य आहे.

कवी ग्रेस म्हणत की एकदा कविता केली की ती व कवी ह्यांची नाळ तुटते व तिला तिचे स्वतंत्र अस्तित्व येते. ( पण प्रत्यक्षात ते कवीचे नाव उद्धृत करण्याबद्दल अतिशय दक्ष असत ते सोडा.). कवितेचा अर्थ समीक्षकांना एक समजतो तर वाचकांना ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे वेगवेगळा समजतो. त्यामुळे संग्रहात असलेली कविता ही त्या कवीची का वेगळीच ? आधुनिक कवितेचे जनक कवी बा.सी. मर्ढेकर ह्यांनी एकदा एक कविता, “ह्या गंगेमधि गगन वितळले ” नावाची, मौज मासिकाला पाठविलेली होती. साक्षेपी संपादक श्री. पु. भागवताना ती महात्मा गांधीवरची वाटली व तशी ती त्यांनी गांधी विशेषांकात छापली पण. पण नंतर कवींनीच त्यांना सांगितले की ती गांधींवर नव्हती. मग श्री पु ची गांधीवरची कविता कुठे गेली ?

कवितेपेक्षा उच्च कोटीची कला आहे, चित्रकला. त्यात तर इतक्या नकला होतात की एकदा प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन ह्यांची अनेक नकली चित्रे त्यांना दाखविण्यात आली व जेव्हा विचारले की ही असली आहेत का तर ते सांगू नाही शकले, इतकी ती हुबेहूब होती. खुद्द दासू वैद्य ह्यांनी नव्या तुकाराम चित्रपटात जी गाणी लिहिली आहेत ती आज स्वतः तुकाराम महाराज आले तर त्यांनाही ती त्यांची का कोणाची हा भ्रम पडेल. ( जुन्या चित्रपटातले एक गाणे “आधी बीज एकले ” हे गाणे मला तुकाराम गाथेत सापडले नाही कारण ते शांताराम आठवले ह्यांनी लिहिलेले होते. ).

कविता विषय हाच मुळी संग्रहाबाहेर असतो. कवितेची उर्मी हीसुद्धा बाहेरच वसत असते. त्यामुळे अपेक्षित कविता संगरातून बेपत्ता असते हे कवीचे म्हणणे रास्तच आहे. त्यामुळेच तर स्वतः तुकाराम महाराज म्हणतात :

करितों कवित्व ह्मणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥1॥

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥

काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥2॥

निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥3॥

तुका ह्मणे आहें पाइकचि चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥4॥

 

----------------------------

मंगळवार, १० जानेवारी, २०१७

गोठवावे पाणी ( कवी : मधु जामकर )

गोठवावे पाणी

( कवी : मधु जामकर, कविता-रती दिवाळी २०१६ )
--------------------------------------

दारी पानझड

उडतो पसारा

मिटले आकाश

तेवढा सहारा

वळणावरचे

गळे आवसान

मागे पुढे श्वास

सुटते अवधान

मोजतो आकडे

उलटे सुलटे

घोकतो जगणे

बोचताना काटे

डोळ्याची अंधारी

पुढचे दिसेना

आणखी उसासे

पाऊल सजेना

आता आहे घाई

दिवस यामिनी

ढवळून सारे

गोठवावे पाणी.
-----------

कवितेच्या पहिल्या ओळीतच “दारी पानझड”, म्हणून कवीने कविताभर येणाऱ्या, खिन्न करणाऱ्या, म्हतारपणीच्या, “एकेक पान गळाया...” ह्या मूडची चुणूक दाखविली आहे. आता कवीने कोणता मूड बाळगावा हा त्याचा प्रश्न असला तरी त्याने आपल्या कण्हण्याने माहोल कलुषित करावा ही काही चांगली नीती म्हणता यायची नाही. आता “पानझड” म्हणजे मरणच, असे निसर्गाचा दाखला देत म्हणावे हे विज्ञानाचे जितके अज्ञान, तितकेच ते अतिरंजित होते. पानझडीत पाने गळतात ती येणाऱ्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष होणार आहे, तेव्हा अती पाणी शोषणारे अवयव, पाने, स्वखुशीने त्यागणे ह्या निसर्गाच्या धोरणाने असते. तो काही मरणाचा धाक नसतो. आता कवींना हे प्राथमिक विज्ञान भले माहीत नसले तरी नशीबाने तो पहिल्या कडव्यात आशावादी आहे तो आकाशामुळे. पाने गळतात, त्यांचा पसारा साचतो, पण तो आटोक्यात ठेवण्यासाठी मिटलेले आकाश आहे व त्याचा कवीला सहारा वाटतो. ह्या एव्हढ्याशा आशेवरून कविता पुढे धकते आहे.

खरे तर एकदा म्हातारपण आले की कसली येताहेत वळणे ? पण समजा एखाद्या कवीच्या जीवनात आली असतील वळणे, तर त्याला सामोरे न जाता, मागे पुढे श्वास होत, कवीचे अवधान गळते आहे. अवसान गळते आहे. परिस्थितीचे काटे बोचताना, तो जगणे घोकतो आहे. इथे ह्याच्या घोकण्याने त्याची जगण्याची लालसा आहे हे किंचित दिसते आहे. पण त्याला पुढचे दिसत नाहीये, अंधारी आली आहे ही द्विधा अवस्था इथे कवीने छान टिपली आहे.

आता कवीला घाई आहे. दिवस रात्र. ( यामिनी म्हणजे रात्र ). कसली ? तर आता पावेतो जे ढवळून काढले आहे ते पाणी गोठवण्याची.

इथे कवी निरवानिरव करतो आहे. पण कशी, तर गोठवण्याने. काय गोठवणे ? तर धडपडीचे, उसन्या बळाचे, पाऊल सजवण्याचे. ढवळण्याचे. म्हातारपणी सगळ्या उर्मी कशा नष्ट करू नयेत, तर गोठवून त्या सुप्त कराव्यात असा कवीचा होरा आहे. ह्या स्थितप्रज्ञ होण्याच्या युगतीने इथे कविता निराशात्मक न होता, उर्मी लपवण्याची ( गोठवून ) युगत सांगणारी होते.      

अति सोप्या सरळ शब्दात मांडणे असले, तरी काही ठिकाणी कवीने अप्रतीम अशी काव्यमय शब्दयोजना केली आहे, जीमुळे कविता खूपच उंची गाठते. पाउल धजणे, ऐवजी कवी इथे “पाऊल सजणे” वापरतो तेव्हा नाहीतरी आपण धीर धरताना आपल्या जीवाला आपण सजवतच असतो, नाही का ? असेच यामिनी . दिवस ह्या वसकन अंगावर येणाऱ्या शब्दाच्या बरोबर खरे तर आपण रात्र ( दिवस-रात्र ) हा शब्द बहुतेक करून वापरतो. पण इथे रात्र हा शब्द कवीला काव्यमय वाटला नसावा. याम म्हणजे प्रहर ( यामिक म्हणजे यांत्रिक/मेकॅनिक पणे , दिवसबरोबर रात्र न वापरता ) कवीने “यामिनी”योजावा हे कवीचे अप्रतीम शब्द्लाघव व काव्यमयता दर्शवते !

--------------------