रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

जानवी ---कवी सुरेश भट

“जानवी ” ----कवी सुरेश भट ( “एल्गार” मधून )

------------------ 

सांगा कुणीतरी या आकाशखाजण्यांना—

“मातीच मोक्ष देई कंगाल नागव्यांना !”

        आहे जरी उभा मी निष्पर्ण माळरानी

        या स्वप्नपाखरांच्या रोखू कसा थव्यांना ?

आली नव्या जगाची आली पहाट आली

आता उन्हात आणू पाळीव काजव्यांना !

        येती जरी समोरी सारे नकोनकोसे

        मीही नकोनकोसा झालो हव्याहव्यांना

साधाच मी भिकारी, माझी रितीच झोळी

गावात मान त्यांच्या श्रीमंत जोगव्यांना !

        प्रत्येक आतड्याचा मी पीळ होत आहे

        ते मात्र गाठ देती त्यांच्याच जानव्यांना !

----------------- 

प्रसिद्ध गझलाकार कै. सुरेश भट ह्यांच्या “एल्गार” ह्या काव्यसंग्रहातली ही गझल आहे.

गझल हे मात्रावृत्त असते. म्हणजे लघु अक्षराला एक आत्रा व दीर्घ अक्षराला दोन मात्र धरल्या तर सगळ्या ओळी त्याच क्रमाने मात्रेत याव्या लागतात. उदाहरणार्थ : सां गा कु णी त री या | आ का श खा ज व्यां ना || ह्याच्या मात्रा होतात : २,२,१,२,१,२,२ | २,२,१,२,१,२,२ . आता खालच्या सगळ्या ओळी ह्याच मात्रेच्या असाव्या लागतात. गझलेच्या प्रत्येक दोन ओळींना शेर म्हणतात व प्रत्येक शेर हा स्वतंत्रपणे स्वयंपूर्ण असावा लागतो. म्हणजे ह्या दोन ओळींच्या अर्थासाठी दुसऱ्या कोणत्या ओळींची गरज नसते व ह्या दोन ओळी/शेर हे स्वतंत्र एक कविताच असते. पहिल्या शेराच्या दोन्ही ओळी अंती यमक असते तर पुढच्या शेरात फक्त दुसऱ्या ओळी अंती यमक असते. एकेका शेरात संपूर्ण विषय संगाच्या असल्याने सांगणे प्रतीकांच्या सहाय्याने असते. हे सर्व ह्यासाठी लक्षात घ्यायचे की कवितेचा हा एक नजाकत भरा फॉर्म ( साचा ) आहे.  

आकाशाला, उच्च ध्येयाला, भिडून त्याला खाजवणारे असे आदर्शवादी लोक असा ‘आकाशखाजव्यांना’ चा अर्थ होऊ शकतो किंवा इंग्रजी स्कायस्क्रेपरचे सरधोपट भाषांतर करून गगनचुंबी इमारती असा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे श्रीमंतांच्या गगनचुंबी इमारतींना कुणीतरी सांगायला हवे की जे भुके कंगाल, नागवे, गरीब लोक आहेत त्यांना आसरा, सहारा,व मोक्ष ही जमीन, मातीच देऊ शकते. इथे माती कसून कंगालांना सुटका, मोक्ष मिळू शकतो अशा अर्थछटेचीही शक्यता आहे.

निष्पर्ण माळरानावर काहीच आकर्षण नसल्याने पाखरे येणार नाहीत. पण ज्यांना स्वप्ने पाहायची आहेत अशांच्या स्वप्नपाखरांना, ते ही थव्याने येणाऱ्या, मी कसा रोखू शकेन ?

नव्या जगाची, प्रगतीची पहाट आली आहे. आता उन्हात आणूया पाळीव काजव्यांना. इथे पाळलेले काजवे अशासाठी की हुकुमाप्रमाणे हवे तिथे आपण त्यांना सोडून त्यांच्या मंद प्रकाशात वाटा धुंडाळू शकतो. इथे अर्थातच प्रगती असूनही, नव्या जगाची पहाट असूनही कुठे कुठे साचलेला अंधार आहे, तिथल्या लोकांना आपल्या वाटा शोधण्यासाठी हे काजवे आहेत.

प्रगतीच्या ह्या प्रकाशात नेमके जे नको नकोसे प्रसंग, लोक, आहेत, तेच हटकून सामोरे येतात. पण असे रोखठोक बोलण्याने माझ्या चाहत्यांनाही ( हव्याहव्यांना ) मी ‘नको नकोसा’ होतो आहे.

साधेच मागणे मागणारा मी साधाच भिकारी आहे. आणि म्हणूनच कोणी मला भीक घालत नाही व माझी झोळी ‘रीतीच ’ राहते. ह्या उलट देवीच्या नावाने मागणारे ( जोगवा मागणारे ) ह्यांना मान मरातबाची मदत व मोठेपणा मिळतो आहे.

जिथे जिथे दु:ख आहे, आतडे पिळवटून टाकणाऱ्या यातना आहेत त्या दु:खाला नुसतेच सामोरे नाही तर सहसंवेदनेने तो आतड्यांच्या वेदनेचा पीळ जाणवून मी वेदना पाहतो आहे. पण प्रस्थापित, प्रतिष्ठित लोक स्वतःच्याच बंधनात जखडलेले आहेत. जसे काही एखाद्या ब्राह्मणाने जानव्याला खुणेची गाठ द्यावी. इथे ‘जानवे’ हे वर्णभेदाच्या प्रतीकापेक्षा बंधनाचे प्रतीक आहे. म्हणजे ‘आहे रे ’ आणि ‘नाही रे ’यांच्या सनातन संघर्षात ‘नाही रे ’च्या वेदनेबरोबर कवीने सहसंवेदना, आतड्याचा पीळ होऊन जाणवावी तर ‘आहे रे ’नी स्वतःच्याच कपोलकल्पित बंधनात ( जानवी, अनेक जानवे ) राहून उगाच खुणेची गाठ बांधावी, करू काही नये, असे कवीचे वैषम्य आहे !

अरुण अनंत भालेराव

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

हि   कविता  . अगदी  पाठ झाली तर स्वर्ग दोन अंगुळे ,आणि नाही पाठ झाली तरी श्रीमंती कमी होणार नाही . आयच्यान !!

कोकण्या माणसाला गाता गळा लागत नाही . नुसते नाक असले तरी आमचे भागते .

<<<<<<<<<<<<<<<<<<<
त्या दिसा वडाकडेन
<<<<<<<<<<<<<<<<<<<

त्या दिसा वडाकडेन गडद तिनसाना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा

मौन पडले सगल्या राना
शिरशिरुन थांबली पाना
कवळी जाग आयली तणा झेमता झेमताना

पैसूल्यान वाजली घाट
दाटलो न्हयचो कंठ काठ
सावळ्यानी घमघमाट सुटलो त्याखीणा

फुलल्यो वैर चंद्र ज्योती
रंगध्रानी लागल्यो वाती
नवलांची जावक लागली शकुन लक्षणा

गळ्या सुखा, दोळ्या दुखा
लकलकली जावन थीका
नकळतान एक जाली आमी दोगाय जणा

वड फळांच्या अक्षदांत
कितलो वेळ न्हायत न्हायत
हुकलो कितलो चंद्रलोक इंद्रनंदना

तांतले काय नुल्ले आज
सगल्या जिणे आयल्या सांज
तरीय अकस्मात तुजी वाजती पैंजणा

कानसूलानी भोवतां भोवर
आंगर दाट फुलता चवर
पट्टी केन्ना सपना तीच घट्ती जागरना

त्या दिसा वडाकडेन गडद तिनसना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा
         __________ बा . भ . बोरकर

विराणी : कवी अनिल

विराणी --------कवी अनिल ( ‘दशपदी’ मधून )

------------------- 

आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर

गुडघा गुडघा चिखल आणि ओढ्यांनाही पूर

नुसता गडद अंधकार वीज चमकत नाही

काळी माती काळे रान मला मीही दिसत नाही

हाती दिवा होता त्याची कधीच विझून गेली वात

कशानेही उजळत नाही अशी काळीकुट्ट रात

आहे ओळखीचे पुष्कळ काही दूर जवळ काही

असून नसून सारखेच मी कुठे हे कळत नाही

हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते

अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते !

---------------

कवी अनिल ( आत्माराम रावजी देशपांडे ) यांच्या ‘दशपदी’ मधली ही पहिलीच कविता. दहा ओळींची म्हणून दशपदी. चौदा ओळींचे सुनीत असते तसेच दहा ओळींची ‘दशपदी’. दोन दोन ओळींचे शेर असतात, असे पाच, एकाच आशयाभोवती गुंफलेले. रचनेची ही दखल यासाठी की कवी अनिलांच्या खूप कविता गेय असून आता प्रसिद्ध गीते आहेत व शब्दांना योजकतेने अंतर्नाद असतो, तशीच ही रचना आशयाचे रूप दाखवते.

कवी स्वतः म्हणतात की कवितेचे असे एक बीज असते व बीजाभोवती कवितेचा नेटका ( दहा ओळीतच ) पसर वावर असतो. शीर्षक ‘विराणी’ असले तरी रूढार्थाने हे विरहिणीचे गाणे किंवा ज्ञानेश्वरांच्या विराणी सारखे विरहातल्या आसक्तीचे गाणे नसून एकाकीपणाचे विसर्जन करून विराण वैराण अवस्था यावी त्या स्थितीचे वर्णन आहे. व ‘हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते’ हे वाटणे ह्या कवितेत बीज रूपाने आहे. ह्यात हरणे व हरवणे हे स्वतःचेच आहे हे सलण्यावरून लक्षात येते.

आभाळाने चहूकडून खाली वाकणे किंवा वर आभाळ व खाली वाकलेले क्रूर काळे मेघ किंवा खाली झाकोळून वाकलेले आभाळ व त्यात काळे क्रूर मेघ अशा शक्यतांचे पदर लपेटून राहिलेला माहोल ( दशपदीत विरामचिन्हे नसल्याने ह्या शक्यता संभवतात ), गुडघाभर चिखल, त्यात ओढ्यांनाही पूर. अशा स्थितीत ज्या आडोशाला आपण आहोत त्या भोवती नुसता गडद अंधार आहे. क्षणभर तरी वीज चमकण्याने कुठे काय आहे ते दिसते. पण वीजही चमकत नाहीय. दिवाही विझलाय ( वाट संपून, म्हणजे परत पेटवण्याचीही सोय नाहीय ). अशी कशानेही न उजळणारी काळी कुट्ट रात्र आहे. आजूबाजूला ओळखीच्या पुष्कळ खुणा असतील, पण ह्या काळ्या कुट्ट अंधारात आपण नेमके कुठे आहोत ते कळत नाहीय. हे नुसतेच निसर्गवर्णन नसून जीवनातल्या एका भाम्बावलेल्या क्षणाचे अनुभवचित्रण आहे, ज्यात हरल्याची आपल्याला परिस्थितीने हरवल्याची जाणीव सलत राहते. अशा वेळी कवीला ह्या काळोखातच विरून पूर्णपणे वैराण व्हावे असे वाटते. ह्या जाणीवेची आर्तता जाणवून देणारी अशी ही विराणी आहे. इथे आसक्ती ऐवजी एकाकीपणाच्या पूर्णतेला भिडून विरून जाण्याची मनीषा आहे ! ‘दशपदी’ काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर चिरेबंद भिंतीत दहा ओळींची खिडकी जसे पल्याडचे दृश्य दाखवते तसेच ही दशपदी कवीच्या मनीचा आशय मनोहारीपणे दाखविते !

------------------------

अरुण अनंत भालेराव

    

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

हात

“हात”    -----कवी वसंत बापट

----------------------------------

हे तुझे तळहात भोळे जाणती नाना कळा

अंगुलींना दिव्यचक्षू देह तो रातांधळा

         हात हे होतात मौनी हात आसू ढाळती

        हासती, हेलावती वा हेच वेळीं जाळती

हे कधी लाडात येती, बोलती, बोलावती

मुकवाण्या सांत्वनाने अंतरीं ओलावती

         या करांच्या अग्रभागी मखमलीची लेखणी

         कोरिली अंधारलेणी तू कितीदा देखणी

रुक्ष ह्या तळव्यांवरी तू बीज जेव्हा पेरले

या नसांची वेल झाली आणि रक्ताची फुले

-------------------

वसंत बापट, मंगेश पाडगावकर, व विंदा करंदीकर ही कवीत्रयी महाराष्ट्राची खूप लाडकी. त्यांच्या काव्यगायनाच्या कार्यक्रमाने खूप काळ अभिजात अभिरूची जोपासली गेली. वसंत बापटांच्या शैलीत शब्द्लाघव अपार आहे, तसेच त्यांच्या लावणीच्या बाजाने मराठीत निखळ प्रेमकविता बरीच लोकप्रिय झाली आहे.

इथे “हात ” या कवितेत कवी प्रेयसीच्या हाताची वाखाणणी करीत आहे, गोडवे गात आहे, तसेच प्रेमानुभूतीत येणाऱ्या “हाता”ची खुमारी सांगत आहे. वरकरणी मोठे भोले दिसणारे तुझे तळहात नाना क्लृप्त्या जाणतात, हातांच्या बोटांना जणुं दिव्यदृष्टी फुटली आहे, त्यांना नेमका कुठे स्पर्श करून सुख द्यावे ते दिसते आहे व तळहाताच्या मानाने मोठा असूनही “देह” हा रातान्धळ्याला जसे रात्र झाली की दिसत नाही तसा आंधळा भासत आहे. ( हा उपहासात्मक चावटपणा आहे, कारण रातान्धळ्याला रात्री दिसत नाही तर देहाला रात्री नेमके काहीबाही दिसते ! ).

प्रियकर प्रेयसीने एकमेकांचे हात हातात घेऊन, काही न बोलता, मुके राहावे व आसू ढाळावेत तसे हे हात कधी मौनी होतात. तसेच लहान मुलांना आपण गुदगुल्या करून हासवतो तेव्हा हेच हात जणुं हसतात, काळजीत असू तेव्हा हेलावतात, व राग आलेला असता हेच हात जाळतातही. प्रेमात, लाडात येता हेच हात बोलतात व बोलावतात किंवा दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करताना नुसते हात हातात घेताही अंत:करणे ओलावतात.

आपल्याकडे प्रात:काळी म्हणायचे वचन आहे, “कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविन्दम, प्रभाते करदर्शनम”. ह्यात जसे कराग्रे वसती लक्ष्मी म्हटलेय तसे कवीला वाटतेय की तुझ्या करांच्या अग्रभागी, म्हणजे बोटात, मखमलीचा मऊपणा आहे व त्यातून लेखणी जसे काव्य उमटवते तशी मऊस्पर्शाची ऊब उमटते. तसेच त्यांनी तू कितीदा तरी देखणी व कोरीव लेणी अंधारात कोरलेली आहेत.

पुरुषांचे तळवे त्यामानाने तसे रुक्ष असतात, राठ असतात, पण त्यावर तुझे तळहात फिरल्याने बीज पेरल्यासारखे होते व त्या स्पर्शाने रुक्ष पुरुषात सुद्धा नसा नसांची लडिवाळ वेल उगवल्यासारखे होते आणि देहातल्या रक्ताची सुकोमल फुले होतात.

कुठेही भडक कामुकता न आणता, नेमकेपणाने तळहात वा हात, जे स्पर्शसुगंधी सुख देऊन जातात त्यास कवी इथे पावती देत आहे, वाखाणत आहे.

--------------------------------

अरुण अनंत भालेराव    

श्रीद्न्यानेश्वरांची नवी विराणी

‘श्रीज्ञानेश्वरांची नवी विराणी’

-------------------------कवी ग्रेस (“सांजभयाच्यासाजणी”)  

“सर्प देखणे सावज

दिव्य सर्पिणीचा फणा;

काय ज्ञानिया ऐकतो

घणू असा घुणघुणा ?

        अंध निर्मितीचा नादी

        बांध बांधितो आरूणी ;

        जे जे नेकीने सडते

        त्याची होतेच वारूणी ! ”

कवी ग्रेस ह्यांना ज्ञानेश्वरांचे खूपच अप्रूप, आकर्षण, आणि भारलेपण आहे. ज्ञानेश्वरांचे काव्य आणि तत्वविचार हा खरे तर विद्वज्जड प्रबंधाचा विषय व्हायला हवा. पण ज्ञानेश्वरांनी ज्या ‘विराण्या’ लिहिल्यात त्या विराणीतल्या विरहाचे आणि आसक्तीचे त्यांनी जे आर्ततेने चित्र रेखाटले आहे त्या आर्तपणाचा इथे कवी ग्रेस ह्यांना लोभ पडतो आहे व ते त्यावर ही नवी विराणी लिहीत आहेत.

‘विराणी’ ह्या प्रकारात विरहाची भावना तसेच आसक्तीची ओढ श्रीज्ञानेश्वरांनी त्यांच्या प्रसिद्ध अशा ‘घनु वाजे घुणघुणा | वारा वाजे रुणझुणा || भवतारुकु हा कान्हा वेगी भेटावा कां ||’ ह्या विरहिणीत व्यक्त केलेली आहे. वियोग पोटी ‘सुमनांची शेज ही पोळे, आगीसारखी’ झाल्याने ती झडकरी विझवा हो अशी आर्त विनवणी ह्यात आहे. तसेच ‘ दर्पणी रूप न दिसे आपुले’ ( तुझेच दिसते ) अशी भ्रांती आहे. ‘चंदनाची चोळी’ शीतल असूनही ‘सर्व अंग जाळी’ असा दाह आहे. तर अशाच आर्ततेची पण नवीन प्रतिमांची विराणी श्रीज्ञानेश्वरांनी कशी कल्पिली असती असा विचार कवी येथे करतो आहे.

शिकारी लोक जसे सावजाला ‘देखणे जनावर’ म्हणतात व त्यांना सारखा सावजाचाच ध्यास लागलेला असतो, तर अशा ‘देखण्या सावजा’विषयी शिकाऱ्याची जी आसक्ती आणि विरहवियोगाची अवस्था असते ती ज्ञानीयाला ( ज्ञानेश्वरांना ) ‘ घनु वाजे घुणघुणा’ धर्तीच्या वियोगाची वाटून ऐकू येते का ? किंवा सर्प आणि सर्पिणी यांचा फणा काढून जी क्रीडा चाललेली असते त्या क्रीडेतील आर्तता ज्ञानेश्वरांना भावते का ?

आंधळा दिसत नाही म्हणून तो नादाच्या साह्याने बघतो, तर त्याचे हे अंध असणे आणि नादावर अवलंबून असणे हीही विरहासक्तीच ना ! इथे आरुणी म्हणजे अंग, शरीर हेच अंधाला ऐकण्यात बांध घालते आहे. शरीराने हा ऐकण्याचा वियोग घडवून आणणे हा एक प्रकारे नव्या विरहिणीचाच विषय जणु . वारूणी म्हणजे दारू, मद्य. दारू ही फळांच्या, धान्यांच्या सडण्यापासून होते. तर दारू करण्यासाठी फळांचे, धान्याचे हे जे नेकीने सडणे आहे त्यातली हे नेकी ही विराणीच्या आर्ततेसारखीच आहे.

विरहासक्तीच्या, वियोगाच्या, आर्ततेच्या ज्या पारंपारिक बाबी ज्ञानेश्वरांना कारुण्यमय वाटल्या ( जसे : घनु-वारा ; चांद-चांदणे ; चंदनाची चोळी-अंग जाळी ; फुलांची शेज-आगीसारखी जाळी ; दर्पणात आपले रूप न दिसणे-तुझेच दिसणे ) तशाच ह्या नवीन प्रतिमातील कारुण्य ज्ञानेश्वरांना करूणामय वाटले असते असे कवीला वाटते. शिकारी आणि सावजाच्या प्रतिमेत सावजाबद्द्ल करूणा वाटावी हे तर साहजिकच आहे. पण अति हळव्या उदार कवीमनाला शिकाऱ्याबद्दलही करुणा वाटावी ह्याचे कवीला अप्रूप आहे, अगत्य आहे.

दारू होण्यासाठी जे नेकीने ‘सडणे’ लागते त्या नेकीबद्दलही करूणा वाटावी ह्यात कवीची थोडीशी विनोदबुद्धीही दिसून येते. नवीन प्रतिमा देऊन विराणीचे आधुनिकीकरण करण्यापेक्षा इथे विराणीत असलेल्या मूलतत्वाला पोचण्याची ( ग्रेस ह्यांच्याच शब्दात, ‘करुणेचा लंबक’ हेच इथे मूळ आहे ) कवीचा यत्न दिसतो. आणि म्हणून सर्प-सर्पिणीची क्रीडा, अंधाचे नादी असणे, शरीराने बंध बांधणे, मद्यासाठी सडण्याची नेकी, अशा नवीन प्रतिमामधली आर्तता व कारुण्य हेरून श्रीज्ञानेश्वरांनी नवीन विराणी अशावर लिहिली असती असे कवीला वाटते.

अरुण अनंत भालेराव

विरह आहे म्हणून विरहिणी

विरह आहे म्हणून विरहिणी

---------------------------- 

विज्ञानात जसे कार्यकारण हे जसे महत्वाचे ( जसे पाण्याची वाफ होऊन ढग झाले, ते थंड झाले, त्याचा पाऊस आला ! ) तसेच ह्या विरहिणीत चांगल्या सगुणांची “लावणी” केल्याने सर्व चांगले होते, माझा “बापरखुमादेविवरु” सुद्धा हा माझ्या मानसीचा आहे म्हणून मला त्याची सय येते व मी जागी राहते, असे कार्यकारणभावाने सांगितले आहे. संपूर्ण विरहिणी अशी :

सुख शेजारी असतां कळी जाली वो पहातां | देठु फेडुनि सेवतां अरळ केले ||१|| अंगणीं कमळणी जळधरू वोले वरी | वाफा सिम्पल्यावरी वाळून जाये ||२|| मोतियाचे पाणी वाहे निळिये सारणी | सगुणाची लावणी लाउनि गेला ||३|| अंगणीं वोळला मोतें वरुषला | धन्य दिवसु जाला सोनियाचा ||४|| चोरट्या मधुकरा कमळीं घेतलासे थारा | मोत्यांचा चारा राजहंसा ||५|| अंगणीं बापया तूं परसरे चांपया | असुवीं माचया भिनलया ||६|| वाट पाहे मी एकली मज मदन जाकळी | अवस्था धाकुली म्हणो नये ||७|| आता येईल म्हूण गेला वेळु कां लाविला | सेला जो भिनला मुक्ताफळा ||८|| बावन चंदनु मर्दिला अंगी वो चर्चिला | कोणे सदैवे वरपडा जाला वो माये ||९|| बापरखुमादेविवरु माझे मानसींचा होये | तयालागी सये मी जागी सुती ||१०|| 

एखाद्या वस्तूचे नाव मागे राहते व वस्तू गायब होते, तसे ह्या “सारणी” शब्दाचे आहे. पूर्वी आठ आण्यात मध्य रेल्वेचे टाईम टेबल मिळायचे. त्याला हिंदीत सारणी असे लिहिलेले असे . आता जशा गाण्याच्या भेंड्या ( अंताक्षरी ) खेळतात तशा तेव्हा गावांच्या नावाच्या भेंड्या खेळत असत व त्यात ही सारणी खूप कामी येई. आजकाल ही सारणी कुठे पहायला मिळत नाही . मोतियाचे पाणी वाहे निळिये सारणी || तर काय आहे ही “सारणी” ? पूर्वी शेतातल्या विहिरीवर मोटी असत. मोट म्हणजे चामड्याची एक मोठ्ठी पिशवी असे. ही विहिरीत खाली सोडत, त्याचे तोंड बंद करीत व बैलांच्या सहाय्याने ती वर ओढीत व पाणी सोडत कालव्या कालव्याने. बैलांना ओढायला सोपे जावे म्हणून एक उतार केलेला असे, विहिरीजवळ चढ व विहिरीपासून दूर उतार. ह्या उतरणीला “सारणी” म्हणत. मोटेचे तोंड उघडून जे पाणी पाटात पडे ते फेसाळे व मोत्यासारखे दिसे. म्हणून“मोतियाचे पाणी ”. आता सगळीकडे विहिरींना पंप आले आहेत त्यामुळे मोट, बैल, सारणी हे कसे कळावे व मोतियाचे पाणीही ? म्हणजे विरहिणीत अर्थ होतो की बैलांना ओढण्यासाठी जो उतार ( सारणी ) केला त्या सगुणाने मोटेचे पाणी मोत्यासारखे होऊन वाहते आहे.

असेच शेजारी सुख आहे म्हणून कळी होते आहे. देठ तसा जाड असतो पण तो मृदू ( अरळ ) करून सुखाने त्याची कळी होते आहे. अंगणातल्या पाण्यावर कमळ येते आहे पण तेच ते वाफा शिंपून लावले तर वाळून जाईल. पाऊस आला तो दिवस सोनियाचा होतो आहे. फुलांचा मध चोरणारा मधुकर ( मधमाशी/भृंग ) कमळाचा आसरा घेतो आहे. राजहंसाला मोत्याचा चारा मिळतो आहे. मी एकटी वाट पाहते आहे व मला ह्या पौगंडावस्थेत मदन जाळतो आहे. ह्या अवस्थेला कमी महत्वाचे ( धाकुली ) समजू नका. शेला हा मोत्यांनी भरला तेव्हाच सुंदर झाला. चंदन अंगाला चोळून कायमसाठी सुवासिक ( चंदनाने ग्रासलेला, वरपडा ) झालेला हा कोण झालाय माय ? हा बापरखुमादेविवरु माझ्या मनातला ( मानसींचा ) आहे म्हणून त्याच्या सयेने मी जागी राहते आहे.

विरह आहे म्हणून विरहिणी आहे !

----------------------    

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

आजकाल वाचतो कोण (३)

आजकाल वाचतो कोण ?

---------------------------------

कवी ग्रेस हे फार मायेने शब्द निवडीत व एक शब्द-पिसे पण बाळगत.

पण आजकाल वाचतो कोण ?

आता खालील कविता पहा. शीर्षक आहे कांच.

मराठीत का वर अनुस्वार देवून कांच असे लिहिले असेल तर त्याचा अर्थ होतो जाचणे, त्रास होणे. जसे “धोतर कांचते आहे” म्हणजे ते रुतते आहे. धोतराचा कांच ( पुल्लिंगी) हा त्रासच. अनुस्वार न देता काच असेल, तर ती काच म्हणजे भिंग किंवा खिडकीची असते ती काच ( स्त्रीलिंगी ).

“अंगात रुते कीं कांच

तुझ्या दुखणारी”  एकतर ह्या ओळीत ही स्त्रीलिंगी व दुखणारी “काच” असायला हवी होती वा तो दुखणारा “कांच” असायला हवा होता . आणि समजा ही खिडकीची काच असती तर ती फुटली आणि रुतली असे काही तरी घडलेले हवे होते.

पण आजकाल वाचतो कोण ?

----------------------------

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

आजकाल वाचतो कोण ? (२)

आजकाल वाचतो कोण ? (२)
---------------------------------------------
ही कविता एकेक शब्द करून वाचा .
वाचल्यावर काय लक्षात येईल ?
कवीला आयुष्य ओढतेय, का कवी आयुष्याला ओढतोय असा संभ्रम पडलेला आहे. ऑप्टीमिस्ट, पेसिमिस्ट असे जगण्याचे दोन प्रकार पाहिले तर आयुष्य ओढायला होकारवादी रहायला लागते पण आयुष्यात इतक्या कमतरता असतात की ते आयुष्यच  जणू नकाराला हाका देतेय असे वाटते आहे. पण जगताना अभिजात सौंदर्याची उर्मी साठवून घ्यावी असे कवीला वाटते तर त्याला प्रश्न पडतो की या सुंदर जगताचे कसे उतराई व्हावे ? त्यासाठी फुलपाखराच्या पंखावर अलगदपणे मरण यावे अथवा फुलाच्या तलम पातळीवर ?
कवी मनाला कोणतीही उपमा कशालाही देण्याची मुभा असते खरी पण फुलपाखराच्या पंखाइतकी  मऊ,  इथे कवी कोणती "फुलाची तलम पातळी " दाखवीत आहे ? फूल  तलम असते जरूर, पण त्याची पातळी म्हणजे लेव्हल किंवा तलमपणा अगदी वरच्या प्रकारचा आहे म्हणजे नेमके काय हो ? आणि हे कवितेचे शीर्षक असल्याने ह्यावरच जोर कवीला द्यायचा असावा. असली कुठली तलम पातळी जाणवते ? का इथे "पाकळी" ऐवजी चुकून पातळी पडले आहे ?
कविता अनेकार्थी असू शकते असे समीक्षकी समर्थन क्षणभर बाजूला ठेवून "पाकळी " वाचून बघा बर ! बर वाटतय ?
पण आजकाल वाचतो कोण ?
------------------------------------------------

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

शब्दार्थ व कविता

शब्दार्थ व कविता
-----------------------
कित्येक शब्दांचा वापर कालांतराने खूप कमी होतो म्हणून किंवा त्या वस्तूंचाच वापर कमी होतो म्हणून काही काही शब्दांचे अर्थ पटकन समजत नाहीत. भाषा शास्त्र म्हणते की अर्थ म्हणजे शब्दांचा वापर.               
"सोलापूरला जाताना पंढरपूरची वाट लागली " ह्यात पूर्वी वेगळा अर्थ असे व "वाट लागणे" च्या आजच्या अर्थाने आज वेगळा. 
असेच काही शब्द पाहू :
पराळ : पीठ परातीत कालवतात,त्यावरून हे परात हवे. पण "रानटी" लोकात पराळ म्हणत असतील ? शब्दकोश म्हणतो, संस्कृत पलाल वरून आलेला हा शब्द म्हणजे भाताचा पेंढा,परळ.
खराळ : म्हणजे शब्दकोश म्हणतो कोयता, व हे लाल कोयत्याशी चांगले जुळते.
घळू : लाडाने म्हटलेले हे घळ असावे, कारण अंतराळ ढासळायला इथे सोपे जावे.
काथवट : जेव्हा उसाचे चरक लाकडाचे असत तेव्हा खालच्या तकदीला काथवट म्हणत असे शब्दकोशाला वाटते.
शब्दार्थाच्या मळलेल्या वाटेने कवितेला सामोरे जाणे आज जरी बाळबोध पणाचे वाटत असले तरी आजही चांगली शायरी ह्याच शब्दार्थाच्या वाटेने भेटते . सिद्धहस्त  कवीने "शब्दानो मागुते या " असे वरदान मागणे मराठी सारस्वताला परिचयाचे आहे , पण गूढतेच्या हव्यासा पायी कोशातच सापडतील असे शब्द योजले तर सोशिक रसिकाला बोध कसा व्हायचा ?  कवितेत जर आपण एखाद्या पक्षाचे गाणे शोधत असू व गूढ शब्दांनी केवळ काही कोश ( कोसला, घोसला ) विणलेले दिसले तर पक्षाचे गाणे कसे सापडणार ? कदाचित ह्या गूढतेच्या सिद्धी पायी "स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे " असे होऊन समोर फक्त घोसलाच दिसावा व गाणे हरवावे असे होते !     मेलेल्या कवींच्या  कवितांचा अर्थ जुळवणे तसे बिनधोक असते. जसे कालिदासाच्या मेघदूताचा अर्थ दहशतवादी कवीही करू शकतो, पण तो दहशतवादी कवी जिवंत असून व्हिडीओ काढणारा असेल तर जिवावरच बेतायचे !
आता वरचे अर्थ खरे का, हे कोण कोणाला विचारणार ? व पक्षाचे गाणे ऐकू येणार का केवळ गूढ कोसला दिसणार ? 

पहा बर !
-----------------/

.

पराळात की पीठ काळे
कालवते हे लाल खराळ
आ वासल्या घळूत धावे
ढासळलेले  अंतराळ
.
हिरके ओले धूपे गव्हाळ
काथवटीचा कळकट पाळा
अंगठ्याचे बेंड फुटले
कळा वाहती भळाभळा
.
येरे मेघा ये रेघेत ये
नको मघा रे नको मघा
ओले दिवस अन ओल्या राती
फाड ओसांडून  घळाघळा.

. कवी : गणेश दिघे ( फेसबुक वरून  )

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

कवी गणेश दिघे

कविता म्हणजे :

 

(शीर्षक नाही): कवी गणेश दिघे ( फेसबुक वरून )

बुद्धिमान नरपशूंचा कळप दबा धरून बसलाय प्रत्येक पाठीशी…  
निर्भयपणे वाहाताहेत येथील वाटा अक्षम्य निर्लज्जपणे… 
हे प्रभो तुझ्या अस्तीवाची प्रचीती देणारी 
लिंबू मिरची दारावर लावून 
आंधळ्या  बायकोच्या मांडी लगत
बहिरेपणाने बसने किती सुरक्षित झाले आहे नाही बधीर सुप्रजा प्रसवण्यासाठी ? 
हे परमेश्वरा , आम्हा भित्र्या लोकांच्या निर्मुलनासाठी
आमच्या लिंगाभोवती घट्ट निरोध बनून बस…. 
अखेर विज्ञानाचा नियंकही  तूच आहेस भडव्या !!

-------------- 

शिव्या देण्याचा मतलबच असतो नेमकेपणाने अपमान करण्याचा. शिवी ज्याला द्यायची त्याला ती लागली पाहिजे. जितकी जिव्हारी लागेल तितके बरेच. देवाला अनेकांनी शिव्या दिलेल्या आहेत, ह्या अगोदर. त्यामुळे इथे कवी दिघे जी शिवी देत आहेत ती योग्य का अयोग्य हे जसे आपण पाहू शकतो तसेच ती काय परिणामाची आहे हेही आपण पाहू शकतो.

डास निर्मूलनाची एक शास्त्रीय पद्धत अशी आहे की त्यातले नर डास पकडून त्यांना नपुसक करायचे व त्यांना परत डास समुदायात सोडायचे म्हणजे ते प्रजनन करू शकणार नाहीत व ती प्रजातच नामशेष होईल. बॅंकॉकला असताना मी पाहिले की त्यांच्या संपूर्ण देशात पुरुषांची नपुसकता व व्यसनाधीनता हे मोठ्ठे प्रश्न झाले आहेत. त्याचाच छोटा परिणाम साधत कवी देवाला म्हणतो आहे की तू आमच्या लिंगाभोवती कंडोम सारखा बस म्हणजे आमचे पुढचे प्रजनन होणार नाही व आमच्यासारखी भित्री पिढी निर्माणच होणार नाही.

भडवा हा जसा वेश्येचा दलाल असतो तसा देव हा विज्ञानाचा दलाल आहे ही उपमा तशी चपखलच. कारण विज्ञानाची प्रगती जर पैशात मोजली तर ती शक्य करणाऱ्या देवाची ( धर्माची ) संपत्ती थोडी कमीच भरेल व ती दलाली म्हणता येईल. इथे शिवी देताना कवीला ह्याचे भान आहे की देव खरे तर विज्ञानाचा नियंत्रक पण आजकाल भडवेगिरी करीत आहे.

बळजोर नरपशू व कमजोर अशा ह्या द्वंदात कमजोरांच्या पत्नींचे जे हाल होतात त्यावर कवी इतका उद्विग्न झालेला आहे की कमजोरांची प्रजातच नष्ट झाली तरी त्याला चालेल !

कवितेत टोकाला जायची मुभा असल्याने ह्या टोकांनी विचारांचे टोकदार पल्ले इथे चांगलेच दिसून येतात.

--------------------