शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

विराणी : कवी अनिल

विराणी --------कवी अनिल ( ‘दशपदी’ मधून )

------------------- 

आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर

गुडघा गुडघा चिखल आणि ओढ्यांनाही पूर

नुसता गडद अंधकार वीज चमकत नाही

काळी माती काळे रान मला मीही दिसत नाही

हाती दिवा होता त्याची कधीच विझून गेली वात

कशानेही उजळत नाही अशी काळीकुट्ट रात

आहे ओळखीचे पुष्कळ काही दूर जवळ काही

असून नसून सारखेच मी कुठे हे कळत नाही

हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते

अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते !

---------------

कवी अनिल ( आत्माराम रावजी देशपांडे ) यांच्या ‘दशपदी’ मधली ही पहिलीच कविता. दहा ओळींची म्हणून दशपदी. चौदा ओळींचे सुनीत असते तसेच दहा ओळींची ‘दशपदी’. दोन दोन ओळींचे शेर असतात, असे पाच, एकाच आशयाभोवती गुंफलेले. रचनेची ही दखल यासाठी की कवी अनिलांच्या खूप कविता गेय असून आता प्रसिद्ध गीते आहेत व शब्दांना योजकतेने अंतर्नाद असतो, तशीच ही रचना आशयाचे रूप दाखवते.

कवी स्वतः म्हणतात की कवितेचे असे एक बीज असते व बीजाभोवती कवितेचा नेटका ( दहा ओळीतच ) पसर वावर असतो. शीर्षक ‘विराणी’ असले तरी रूढार्थाने हे विरहिणीचे गाणे किंवा ज्ञानेश्वरांच्या विराणी सारखे विरहातल्या आसक्तीचे गाणे नसून एकाकीपणाचे विसर्जन करून विराण वैराण अवस्था यावी त्या स्थितीचे वर्णन आहे. व ‘हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते’ हे वाटणे ह्या कवितेत बीज रूपाने आहे. ह्यात हरणे व हरवणे हे स्वतःचेच आहे हे सलण्यावरून लक्षात येते.

आभाळाने चहूकडून खाली वाकणे किंवा वर आभाळ व खाली वाकलेले क्रूर काळे मेघ किंवा खाली झाकोळून वाकलेले आभाळ व त्यात काळे क्रूर मेघ अशा शक्यतांचे पदर लपेटून राहिलेला माहोल ( दशपदीत विरामचिन्हे नसल्याने ह्या शक्यता संभवतात ), गुडघाभर चिखल, त्यात ओढ्यांनाही पूर. अशा स्थितीत ज्या आडोशाला आपण आहोत त्या भोवती नुसता गडद अंधार आहे. क्षणभर तरी वीज चमकण्याने कुठे काय आहे ते दिसते. पण वीजही चमकत नाहीय. दिवाही विझलाय ( वाट संपून, म्हणजे परत पेटवण्याचीही सोय नाहीय ). अशी कशानेही न उजळणारी काळी कुट्ट रात्र आहे. आजूबाजूला ओळखीच्या पुष्कळ खुणा असतील, पण ह्या काळ्या कुट्ट अंधारात आपण नेमके कुठे आहोत ते कळत नाहीय. हे नुसतेच निसर्गवर्णन नसून जीवनातल्या एका भाम्बावलेल्या क्षणाचे अनुभवचित्रण आहे, ज्यात हरल्याची आपल्याला परिस्थितीने हरवल्याची जाणीव सलत राहते. अशा वेळी कवीला ह्या काळोखातच विरून पूर्णपणे वैराण व्हावे असे वाटते. ह्या जाणीवेची आर्तता जाणवून देणारी अशी ही विराणी आहे. इथे आसक्ती ऐवजी एकाकीपणाच्या पूर्णतेला भिडून विरून जाण्याची मनीषा आहे ! ‘दशपदी’ काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर चिरेबंद भिंतीत दहा ओळींची खिडकी जसे पल्याडचे दृश्य दाखवते तसेच ही दशपदी कवीच्या मनीचा आशय मनोहारीपणे दाखविते !

------------------------

अरुण अनंत भालेराव

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा