शुक्रवार, ९ जून, २०१७

कविता म्हणजे
-----------------------   
कोण विचार करतोय
( कवी : सोपान हाळमकर, कविता-रती मार्च-एप्रिल २०१७ )
पान्हावल्या गायीचं
आखडावं वासरू तसं,
नवकरीच्या दावणीला बांदल
आठ बैली नांगराचं
यलक्याच शिळवाट
कवळ्या मानत अडकिलं
तवापासून ---
झाडाच्या फाट्याला
बांधून ठेवावी
दुपारची भाकरी
तशी केली चाकरी
हिरवळीच्या नादानं
मुन्गस्याची नाही
सोडली दोरी
भाकरीला चटणी पुरल
अन् चटणीला भाकरी पुरल
अशीच जिंदगी जगली !
बोडं फुटतील तशी करावी
कापसाची यचनी
तशी महिन्यावारी
घरच्यांनी लूट केली
आता रान उघडल्यावर---
पल्हाट्या अन् रिकाम्या नख्या
हसतात खदाखदा—
आम्ही रानभैरी, पर माणसात
ऱ्हावून बी कसं कळलं नाही तुला
शेळ्यावनी माणसं ओरबाडतात पाला
कोण विचार करतोय, काय वाटतं झाडाला ?
-----------------------
शेळ्यांप्रमाणे माणसेही आजकाल झाडांचा पाला ओरबाडतात. तेव्हा झाडांना काय वाटत असेल, असा कवीला प्रश्न पडलाय. आणि त्याचा कोणी विचार करीत नाहीय ही त्याची खंत आहे. खरे तर इथे कवीला अजून जरा हळवे व्हायची मुभा होती. म्हणजे झाडा ऐवजी भाजीपाल्याचा पाला ( जसे: पालक, चुका, मेथी वगैरे ) जेव्हा आपण खातो तेव्हा त्या भाजीपाल्याला काय वाटत असेल असे हळवेपण कवी बाळगू शकला असता. ( “शेळ्यावाणी” असे म्हटल्याने काटेकोरपणे पाहिले तर केवळ खुरटी झाडे, झुडपे इथे लागू होतात, पण कवीचे म्हणणे इतके काटेकोरपणे पहायचे नसते ! ).
कवीच्या मनाला भटकण्याची परवानगी घ्यावी लागत नाही व त्यामुळे तो आधी शेतकरी होता व नंतर नोकरीदार झालाय ते आपल्याला कवितेत आधी सांगतोय. पूर्वीच्या काळी अशी एक म्हण होती की “उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी ”  आजकाल परिस्थिती उफराटी झाली आहे हे सांगताना तो मोठी मार्मिक प्रतिमा वापरतो आहे. अगोदरच्या शेतीत असताना भाकरीला पुरेल एव्हढी चटणी व चटणीला पुरेल एव्हढी भाकरी अशी स्थिती होती हे तो नेमकेपणे सांगतो. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना नोकरीवाल्यांचा कसा हेवा वाटतो हे सांगतांना तो नोकरीची उपमा मोठी मार्मिक देतो. तो म्हणतो कापसाची बोंडं जशी फुटतील तशी आपण वेचणी करतो, तसे नोकरीवाले दर महिन्याला पगार घेतात म्हणजे खरे तर एक प्रकारे वेचणीच करीत असतात. आणि शिवाय हे त्याच्या घरच्यांनाही लुटीसारखेच आहे. मालकाला फायदा होवो अथवा घाटा, घरच्यांची पगारावर लूटच असते ! लठ्ठ पगार घेणाऱ्यांनी हा हेवा अवश्य नोंद करण्यासारखा आहे. इथे कवीतला शेतकरी पगारदारांविरुद्ध धोक्याची घंटा वाजवितो आहे.
कवितेत अनेक शब्द शहरी लोकांना सहजी न कळणारे आहेत खरे, पण निदान एव्हढे तरी नक्की कळण्यासारखे आहे. आणि तेही खूप ढवळून काढणारे आहे.
---------------------------------- 
अरुण अनंत भालेराव

-------------------------