शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

कविता म्हणजे
----------------------- 
दोष कुणाचा ?
( कवी : वंदना कुलकर्णी, कविता-रती मे-जून २०१७ )
---------------
आपलंच रक्ताचं नातं
म्हणून मनात सुशोभित करत आले,
नात्याची वीण
घट्ट आहे म्हणून
सुंदर पेड घालत गेले,
पण एके दिवशी विणतानाच
एखादा टाका निसटावा
आणि भरलेली साखळी
उकलत जावी
तशी नात्याची वीण
उकलत गेली
आणि राहून गेले
नात्याच्या कलाकृतीचे स्वप्न,
फक्त शब्दच शब्दांशी
संवाद करत राहिले
मग मला जाणवले
दोष कोणाचा ?
नात्याच्या संज्ञेचा ?
की आपण लावलेल्या प्रेमाचा ?
----------------------------------------------  
लोपत चाललेली नाती व त्यातला विसंवाद ही आजची सार्वत्रिक भावना आहे व ती ह्या कवीच्या कवितेतून प्रभावीपणे यावी हे साहजिकच आहे. पण ह्या कवितेतून हे काही नुसते भावनाप्रदर्शन नाही तर ह्यात दोष आपण जे नात्यात प्रेम लावतो तोच आपला दोष आहे असे मांडलेले आहे.
कवीला कवितेत हवे ते मांडायचा अधिकार आहे. शिवाय असे म्हणतात की कवितेत मांडलेला तर्क हा तर्क विषयांच्या निकषावर घासून पुसून घ्यायचा नसतो. ती एक तात्कालिक स्फुरलेली भावना असते. पण अशाने होते काय की कवितेकडे कोणी एक प्रगल्भ विचार म्हणून पहातच नाही. केवळ र ला र व ट ला ट लावून टाकलेल्या ओळी अशी त्याची बोळवण होते.
पण इतकी चुकीची तर्कसंगती का म्हणून पसरू द्यावी ? नात्यात आपण जेव्हा प्रेम पेरतो तेव्हा त्याची परतफेड व्हावी अशी काही आपली भावना नसते. आपले प्रेम आहे म्हणून आपण ते जोपासतो. ते प्रेम जर वाढले नाही, परत लोटून आले नाही, ज्यांच्यावर प्रेम केले ते करंटे निघाले, तर त्यात आपल्या प्रेम करण्याचा दोष नसतो. निळ्या डोळ्यांच्या आईबापांची अपत्ये सगळीच गुणसूत्रे घेतील अशी शक्यता नसते. तसेच आपण ज्याच्यावर माया केली तो ती परतीने आपल्याला देईल अशी शक्यता हमखास अशी म्हणता येत नाही. त्यामुळे तो आपला दोष आहे हे म्हणणे खिन्नता दाखवत असले तरी तर्काचे होत नाही. तसेच अशाने जे खिन्न होतात त्यांना अजूनच खिन्न करणारे व दाट नकारात्मक विचाराचे  होते.
केवळ भावनेचा एक पदर अति परिणामकारक करण्याच्या मोहाने कवीने असे अतार्किक विचार समाजात पसरवणे घातक आहे. त्याऐवजी जे नात्यांची वीण उचकटतात त्यांच्या पदरी करंटेपण देत म्हणावे की भले आपण प्रेमाने कारले लावले पण ते कडूच निघणार ! व त्याला कोणत्या चिंचेच्या पाण्याने कसे सौम्य करता येते ते सांगावे !
अर्थात विचार करायला लावले हे कवितेचे यशच म्हणायला हवे !

---------------------------