गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

हात

“हात”    -----कवी वसंत बापट

----------------------------------

हे तुझे तळहात भोळे जाणती नाना कळा

अंगुलींना दिव्यचक्षू देह तो रातांधळा

         हात हे होतात मौनी हात आसू ढाळती

        हासती, हेलावती वा हेच वेळीं जाळती

हे कधी लाडात येती, बोलती, बोलावती

मुकवाण्या सांत्वनाने अंतरीं ओलावती

         या करांच्या अग्रभागी मखमलीची लेखणी

         कोरिली अंधारलेणी तू कितीदा देखणी

रुक्ष ह्या तळव्यांवरी तू बीज जेव्हा पेरले

या नसांची वेल झाली आणि रक्ताची फुले

-------------------

वसंत बापट, मंगेश पाडगावकर, व विंदा करंदीकर ही कवीत्रयी महाराष्ट्राची खूप लाडकी. त्यांच्या काव्यगायनाच्या कार्यक्रमाने खूप काळ अभिजात अभिरूची जोपासली गेली. वसंत बापटांच्या शैलीत शब्द्लाघव अपार आहे, तसेच त्यांच्या लावणीच्या बाजाने मराठीत निखळ प्रेमकविता बरीच लोकप्रिय झाली आहे.

इथे “हात ” या कवितेत कवी प्रेयसीच्या हाताची वाखाणणी करीत आहे, गोडवे गात आहे, तसेच प्रेमानुभूतीत येणाऱ्या “हाता”ची खुमारी सांगत आहे. वरकरणी मोठे भोले दिसणारे तुझे तळहात नाना क्लृप्त्या जाणतात, हातांच्या बोटांना जणुं दिव्यदृष्टी फुटली आहे, त्यांना नेमका कुठे स्पर्श करून सुख द्यावे ते दिसते आहे व तळहाताच्या मानाने मोठा असूनही “देह” हा रातान्धळ्याला जसे रात्र झाली की दिसत नाही तसा आंधळा भासत आहे. ( हा उपहासात्मक चावटपणा आहे, कारण रातान्धळ्याला रात्री दिसत नाही तर देहाला रात्री नेमके काहीबाही दिसते ! ).

प्रियकर प्रेयसीने एकमेकांचे हात हातात घेऊन, काही न बोलता, मुके राहावे व आसू ढाळावेत तसे हे हात कधी मौनी होतात. तसेच लहान मुलांना आपण गुदगुल्या करून हासवतो तेव्हा हेच हात जणुं हसतात, काळजीत असू तेव्हा हेलावतात, व राग आलेला असता हेच हात जाळतातही. प्रेमात, लाडात येता हेच हात बोलतात व बोलावतात किंवा दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करताना नुसते हात हातात घेताही अंत:करणे ओलावतात.

आपल्याकडे प्रात:काळी म्हणायचे वचन आहे, “कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविन्दम, प्रभाते करदर्शनम”. ह्यात जसे कराग्रे वसती लक्ष्मी म्हटलेय तसे कवीला वाटतेय की तुझ्या करांच्या अग्रभागी, म्हणजे बोटात, मखमलीचा मऊपणा आहे व त्यातून लेखणी जसे काव्य उमटवते तशी मऊस्पर्शाची ऊब उमटते. तसेच त्यांनी तू कितीदा तरी देखणी व कोरीव लेणी अंधारात कोरलेली आहेत.

पुरुषांचे तळवे त्यामानाने तसे रुक्ष असतात, राठ असतात, पण त्यावर तुझे तळहात फिरल्याने बीज पेरल्यासारखे होते व त्या स्पर्शाने रुक्ष पुरुषात सुद्धा नसा नसांची लडिवाळ वेल उगवल्यासारखे होते आणि देहातल्या रक्ताची सुकोमल फुले होतात.

कुठेही भडक कामुकता न आणता, नेमकेपणाने तळहात वा हात, जे स्पर्शसुगंधी सुख देऊन जातात त्यास कवी इथे पावती देत आहे, वाखाणत आहे.

--------------------------------

अरुण अनंत भालेराव    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा