बुधवार, ११ जानेवारी, २०१७

बेपत्ता ( कवी : दासू वैद्य कवितारती दिवाळी २०१६)


बेपत्ता 
( कवी : दासू वैद्य , कवितारती दिवाळी २०१६ मधून)
-----––----------------------

वातावरणात

कविता पसरलेली

रसिकांसमोर

कविता वाचतोय कवी

 

वेळेसोबत मैफल रंगत गेली

घरातले-मनातले

गडद होत गेले संसार

परिणामी उपस्थितांच्या मनात

वाढत गेली चुळबुळ

 

कवी मनकवडा

ओळखला रागरंग

केली घोषणा

शेवटच्या कवितेची,

लोकही सावरून बसले

ऐकायला भैरवी

 

कवी शोधू लागला भात्यात

शेवटचा बाण

उलटू लागला पानं

शोधू लागला कविता,

उपेक्षित कविता काही

लवकर सापडेना

 

“आत्ता समोरच्या अंगणात तर

होती खेळत ”

अशा भरोशावर

पुन्हा पुन्हा उलटतोय पानं

अनुक्रमणिकेच्या झरोक्यातून

पाहतोय कविता

पुढ्यातले दोन-तीन कवितासंग्रह

काढले धुंडाळून

 

लोक पाहतायत

स्वतःची कविता शोधताना

अस्वस्थ झालेला कवी

जत्रेत हरवलेल्या

लेकराच्या बापासारखा

कवीचा चेहरा,

एकदा चष्मा घालून

एकदा चष्मा काढून

उलटली पुस्तकांची पानं,

घामाघुम कवीला पाहून

रसिक विसरले क्षणभर

घरी जायला झालेला उशीर.

 

कवी उलटतोय पानं

शोधतोय कविता

कविता मात्र सापडत नाहीये.

 

तशी एरवीही

कवीला अपेक्षित कविता

बेपत्ताच असते

संग्रहातून.

 

इथे एका गंमतीदार प्रसंगावर दासू वैद्य ह्यांनी एक कविता केली आहे. एका काव्यगायनात कवीला त्याचीच एक कविता सापडत नाही व त्यावरून कवी म्हणतो की नाही तरी कवीची अपेक्षित कविता ही संग्रहातून बेपत्ताच असते. ही काही प्रासंगिक गंमत नाही, तर कवी, त्याची म्हणता येईल अशी कविता, व कवितेचे असणे अशा सखोल विषयावरचे हे न केलेले भाष्य आहे.

कवी ग्रेस म्हणत की एकदा कविता केली की ती व कवी ह्यांची नाळ तुटते व तिला तिचे स्वतंत्र अस्तित्व येते. ( पण प्रत्यक्षात ते कवीचे नाव उद्धृत करण्याबद्दल अतिशय दक्ष असत ते सोडा.). कवितेचा अर्थ समीक्षकांना एक समजतो तर वाचकांना ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे वेगवेगळा समजतो. त्यामुळे संग्रहात असलेली कविता ही त्या कवीची का वेगळीच ? आधुनिक कवितेचे जनक कवी बा.सी. मर्ढेकर ह्यांनी एकदा एक कविता, “ह्या गंगेमधि गगन वितळले ” नावाची, मौज मासिकाला पाठविलेली होती. साक्षेपी संपादक श्री. पु. भागवताना ती महात्मा गांधीवरची वाटली व तशी ती त्यांनी गांधी विशेषांकात छापली पण. पण नंतर कवींनीच त्यांना सांगितले की ती गांधींवर नव्हती. मग श्री पु ची गांधीवरची कविता कुठे गेली ?

कवितेपेक्षा उच्च कोटीची कला आहे, चित्रकला. त्यात तर इतक्या नकला होतात की एकदा प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन ह्यांची अनेक नकली चित्रे त्यांना दाखविण्यात आली व जेव्हा विचारले की ही असली आहेत का तर ते सांगू नाही शकले, इतकी ती हुबेहूब होती. खुद्द दासू वैद्य ह्यांनी नव्या तुकाराम चित्रपटात जी गाणी लिहिली आहेत ती आज स्वतः तुकाराम महाराज आले तर त्यांनाही ती त्यांची का कोणाची हा भ्रम पडेल. ( जुन्या चित्रपटातले एक गाणे “आधी बीज एकले ” हे गाणे मला तुकाराम गाथेत सापडले नाही कारण ते शांताराम आठवले ह्यांनी लिहिलेले होते. ).

कविता विषय हाच मुळी संग्रहाबाहेर असतो. कवितेची उर्मी हीसुद्धा बाहेरच वसत असते. त्यामुळे अपेक्षित कविता संगरातून बेपत्ता असते हे कवीचे म्हणणे रास्तच आहे. त्यामुळेच तर स्वतः तुकाराम महाराज म्हणतात :

करितों कवित्व ह्मणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥1॥

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥

काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥2॥

निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥3॥

तुका ह्मणे आहें पाइकचि चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥4॥

 

----------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा