मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

...सगळं अंग ठसठसून येत असतं,
तरी, छायडाबाई सुरेभान लांडगे,
तांबडं फुटायच्या आत उठते.

परसाकड जाऊनयेऊन, आंघोळपांघोळ उरकून,
धबाधब साताठ भाक-या थापटून,
डेचकीत कायतरी कालवण उकळून,
सुरेभानला 'च्या' देते, पोरीला खायला घालते.

फडक्यात दुट्टं बांधून पाटीत टाकते,
च्येपल्या पायात सरकवून, पोरीला कमरेवर घेऊन,
झपाझप वावराकडं निघते.

दिवसभर वावरातल्या उस्तवारी करून,
तिसराकपारा जळण सावडीत,
बांधाबांधाने, काट्याकुट्यातून हिंडते,
मोळी बांधते, जळण चुंबळीवर, कमरेवर पाटी,
एका हातानं जमेल तसं पोरीचा हात धरून,
त्राण त्राण गोळा करत, घराकडं.
दिवाबत्ती, सैपाकपानी, पोरीला खाऊ घालते.

सकाळी तालुक्याला कशाला कायनु गेलेला
सुरेभान सयाजी लांडगे, झाकड पडताना माघारा येतो,
झिंगलेला, कोलमडत,
उंब-याला अडखळून धबाकदिशी नाकावर आदळतो,
छायडाबाई भेदरून उठते, सुरेभानला उठवते,
हाताला धरून, कुडाला टेकून बसवते.
पाण्याचा गलास भरून आणते,
गलास हातात घेता घेता, सुरेभान,
कशासाठी कुणास ठाऊक,
एक जोरकस बुक्की
तिच्या गालाच्या आसपास ठेऊन देतो,
“आयघाल्ये..तुह्या मायचा...”
कशासाठी कुणास ठाऊक,
घंटाकभर शिव्यांची फैर चालू ठेवतो,
दमून जातो, छायडाबाई कळ सोसते,
परातीत भाकरीच्या कोरा, ठेचा, कालवण वाढते,
सुरेभानच्या पुढ्यात ठेवते,
सुरेभान अचकटविचकट बोलतो, आणि,
अद्वातद्वा खातो, खातो त्यापेक्षा जास्ती सांडतो,
छायडाबाई परात उचलते, खरकटं वारते,
सतरंजी टाकून देते सुरेभानला,
मध्ये पोरीला टाकून, पोत्यावर आपण पडते.

कधीतरी सुरेभान उठतो, जवळ येतो,
खस्स्कन छायडाबाईला जवळ ओढतो,
छाती कुस्करतो, मिनिटभर,
जमेल तेवढा आत शिरतो. कलंडतो.

छायडाबाई, उन्मळून येणारे कढ आतल्याआत दाबते,
सगळी ठसठस दाबून घेते आतल्याआत.
आढ्याकडं रखरखा बघत जन्माचा धांडोळा घेते,
जमेल तेवढा.  थकून तिचा डोळा लागतो.
...सगळं अंग ठसठसून येत असतं,
तरी, छायडाबाई सुरेभान लांडगे,
तांबडं फुटायच्या आत उठते...
------------------------------------------------------
- बालाजी सुतार, अंबाजोगाई.

-----------------------------------------
---------------------------------------------
वरील कवितेची एक भाषाशास्त्रीय दखल !
----------------------------------------
१) छायडाबाई---"स्त्री ही पुरुषाची छाया असते", असे कोणी छायडाबाईला समजेल तर ह्या नावातल्या "छा" मुळे नावाला तिरस्कार, तुच्छता येते असेही कोणाला वाटेल. ( वाटल्यास हेच नाव छा ऐवजी इतर अक्षरे बदलून ठेवा. जसे: कायडाबाई, खायडाबाई, गायडाबाई...केवळ छायडाबाईलाच तुच्छता येईल !)
२) पुनरावृत्त शब्द वापरल्याने भाषा ठसकेदार होते हे खालील शब्दांनी सिद्धच होते : ठसठसून ; जाऊनयेऊन ; आंघोळपांघोळ ; काट्याकुट्यातून ; बांधा बांधाने ; दिवाबत्ती ; सैपाकपानी ; त्राण त्राण ; कशाला कायनु ; अचकट विचकट ; अद्वातद्वा ; आतल्या आत;
३) ध्वन्यानुकारी शब्दांमुळे शब्दचित्रे उमटतात : जसे : धबाधबा ( ह्यात भाकरी करतानाचा आवाजच ऐकू यावा ) ; धबाकदिशी ; 
रखारखा बघत;
४) काही ग्रामीण शब्दांमुळे नवीन शब्द ऐकल्यासारखे वाटते : जसे : चपला ऐवजी च्येपल्या ; दुटटं बांधून ; चहा ऐवजी च्या ; तिसराकपारा ( ह्या बहुदा काडया असाव्यात ) ; झाकड पडताना ( हे झापड सारखे वाटते किंवा सायंकाळचा शब्द असावा ) ; खरकटं वारते ( वारणे म्हणजे सारणे ) ; जन्माचा धांडोळा ( लुकिंग बॅक ऑन लाइफ ) ;
५) काही शब्द त्यांच्या अर्थापेक्षा बरेच सांगून जाणारे आहेत : जसे : जमेल तेवढे आत शिरतो ; जळण चुंबळीवर ( बाई मोळी डोक्यावर घेऊन चालली आहे, चुंबळीवर असे चित्र कोणालाही दिसावे ! ); लांडगे हे आडनाव मोठे समर्पक वाटते !
६) परिणामकारकता : साधण्यासाठी सुरुवातीच्या ओळी परत शेवटी देण्याने हे रहाटगाडगे कसे फिरते आहे ते चक्क जाणवते !
------------------

२ टिप्पण्या:

  1. सर, मनापासून आभार. माझ्या कवितेतल्या भाषिक घडामोडींकडे एवढ्या जाणीवपूर्वक मीही कधी पाहिलेलं नव्हतं. तुम्ही कवितेकडे पाहण्याचा हा नवा दृष्टीकोन मला दिलात. (एक खुलासा- 'तिसराकपारा' या शब्दाचा अर्थ तिस-या प्रहरी किंवा तिस-या प्रहरानंतर असा आहे. यातल्या 'क'चा पाय मोडलेला असतो. इथं युनिकोडमध्ये 'क्' असं लिहून नंतर 'पा' लिहलं असतं तर ते 'क्पा' असं झालं असतं, त्यामुळे 'तिसरा'क'पारा' असं ते लिहून झालं..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सुरेभान लांडगे या शब्द योजनेतही जाळणारी चिरणारी हिन्स्रता व्यक्त होते

      हटवा