बुधवार, १३ मार्च, २०१३

कविता म्हणजे दगडावरची रेघ ?

तरी  
( कवि : दयासागर बन्ने, कविता-रती ( जुलै-ऑगस्ट २००८ ) मधून )

        घुशी वाढलेल्या फार
        किती लिंपाव्यात भिंती ;
        काट्याकुट्याच्या संगाने
        फुले, पाकळ्या फाटती ॥१॥

        वेल मांडवाशी जाता
        येते खुरप्यांना धार ;
        येते खुराड्याबाहेर
        असे टपुनिया घार ॥२॥

        कसे धावायाचे पायी
        कुणी पसरल्या काचा ;
        मुख दिसते मोहक
        पण बसलेली वाचा ॥३॥

        किती पेरणी करावी
        येते आपत्ती मागून ;
        आणि अश्रूंच्या पुरात
        जाते वावर वाहून ॥४॥

        असं विपरीत जिणं
        तरी जगावं लागतं ;
        मुळे जोवरी मातीत
        झाड सोसतं, फुलतं ! ॥५॥

    तसं तर सगळ्या वाङ्मयालाच आपण अक्षर वाङ्मय म्हणतो. पण त्यातल्या त्यात कविता हा प्रकार खरेच अक्षर असाच राहतो. न क्षरणारा, न बदलणारा ह्या अर्थी. निसर्गनियम सारखा बदल करण्याचा, होण्याचा असतो. पण परंपरेने आपण कविता ह्या न बदलणार्‍या ठेवतो. कवीच्या हयातीतच कित्येक शब्दांचे अर्थ बदलतात, त्यातल्या अर्थछटा बदलतात, पण अलिखित नियम असा आहे की एकदा जी कविता केली , बरी वाईट, ती तशीच ठेवायची. त्यात कानामात्राचा फरकही करायचा नाही. जणु कविता म्हणजे दगडावरची रेघच ! खरे तर कवीच्या आयुष्यात व्यक्तिमत्वही व जाणही कालामानाप्रमाणे बदलत जाते. कधी प्रगल्भ होत जाते तर कधी त्यात वेगळ्या जाणीवांचे, विचारांचे धुमारे फुटतात. पण त्या दैवी क्षणाला जी कविता जशी झाली ती कोणी बदलत नाही, पुन: सुधारत नाही. गद्यात असे होत नाही. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळात चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. ते आज हयात असते तर त्यात त्यांनी काही बदल केलाही असता. पण विचारांचे काळाप्रमाणे बदलणारे स्वरूप कवीला त्याच्या हयातीत हेरता येत नाही. कलत्या काळी कळले तरी कविता सुधारता येत नाही. पण अर्थाच्या दृष्टीने पाहिले तर हे न बदलणे, न सुधारणे, कवितेची परिणामकारकता निश्चितच कमी करते. वरच्या कवितेच्या उदाहरणाने हे बघू.
    शेतकर्‍याला काय काय हाल अपेष्टा भोगाव्या लागतात, त्यांच्या मार्गात जणु कोणी काचाच पसरवून ठेवतात, त्याची वाचा बसते, निसर्गही निष्ठूर होऊन पेरण्या वाहून नेतो, असं जिणं विपरीत असलं तरी जगावं लागतं. जसं जोवर झाडाची मुळं जमीनीत असतात तोवर त्याला सोसत पण मातीत रुतून राहावचं लागतं, :फुलतही राहावं लागतं असा सोपा अर्थ ह्या कवितेचा आहे. कवितेवर संपादकीय संस्कार करून शब्द बदलण्याची रीत नाहीय. ( गद्यात मात्र कोणताही विषय असला तरी संपादकाची कात्री व डागडुजी अवश्य चालतेच ! ) . पण शेवटच्या ओळीत झाडाने सोसत राहणं आणि "झाड फुलतं !" असं म्हणणं विसंवादी वाटतं. अर्थाचा अनर्थ जरुर होत नाही, पण मातीत आहे म्हणून झाडानं सोसत राहणं, हे "फुलतं" म्हणण्यानं विरुद्ध अर्थाचं होतं . कदाचित्‌ "झुरतं", किंवा "उरतं" असं एखाद्या संवेदनशील रसिकानं म्हटलं असतं. उद्या जर आपल्याच कविता परत सुधारून लिहिण्याची टूम निघाली तर हाच कवि कदाचित "फुलतं" हा शब्द बदलेलही.  पण तोवर अर्थाची गल्लत चालूच राहणार ! झाड सोसतही आहे व फुलतंही आहे, ( मग काय प्रॉब्लेम आहे ?). बरच आहे की असा निष्कारण निघणारा संभ्रम आहे. कवितेचा रोख जो विपरीतपणावर आहे, तो झाड फुलतं म्हणण्यानं पातळ होतो. कविता म्हणजे काय दगडावरची रेघ ? ती सुधारायची नाही ह्या अलिखित परंपरेमुळे "अनर्थ" मात्र उगाचच फुलत राहतात !    ( कविता : अर्थ व अनर्थ ह्या लेखामधून )

--------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा