सोमवार, १६ जून, २०१४

कविता म्हणजे

कविता म्हणजे
चंद्र आणि खेचर    ( कवी : दिलीप चित्रे )
चरतात एका फाळलेल्या माळावर
अंधार समजून गवत प्राणिमात्र ...
रात्रीत विरघळते माझे ढेकूळ
आसमन्त गढूळ करीत. पण मग स्वच्छ
होतात माझे डोळे पाहून उजळ
चंद्र आणि एक मुग्ध झालेले खेचर
स्वतःच्या सावलीवर ...
पाण्यात चांदण्याने रडलेलं अक्षर
मासोळीची लाटभर ओळ होऊन
पोह्तंय माझ्या गळक्या ढेकळाच्या
गढूळ आसमंतात ....अशी वेळ .
आणि गवत समजून स्वतःच्या सावलीचं
खेचर चांदणं चरतय ...
माझी माती बसते जाऊन रात्रीच्या तळाला
मासोळीच्या सुळकांडीची लाट पकडतो
प्रत्यक्ष अवकाशाचा गळ

चंद्र समजून मी पाहिलं
त्या मुग्ध खेचराचं चरणारं चांदणं.
------------------------------------------------------
लीम्बोणीच्या झाडामागचा चंद्र परिचित आहे पण खेचर ही काय भानगड आहे ? गाढव आणि घोडा ह्या प्रजातीतून निर्मिलेले  हे हायब्रीड जनावर . लष्करात ओझी वाहण्यासाठी वापरीत. माझ्या लहानपणी मी पाहिलेली खेचरं घोड्यापेक्षा दणकट असत आणि त्यांच्या पायावर केस असत. त्यांची शेपूट घोड्यापेक्षा जास्त झुपकेदार असे.  पण जे लोक घोड्यांची पैदास करतात ( रेसचे घोडे ) ते ह्या प्रजातीला खूप कमी लेखतात. त्याचा उल्लेख तिरस्काराने करतात.
तर अशा खेचरापैकी एक स्वतःच्या सावलीवरून स्वतःत मुग्ध झालेले आहे. स्वतःच्याच प्रतिमेत गुंग झालेले आहे. स्वतः कमजात असूनही स्वतःत मश्गुल झालेले आहे. हे म्हणजे आपलेच प्रतीक समजा. आपण आहोत गद्धेमजुरी करणारे पण आपण स्वतःलाच थोर समजतो आहोत.
तसे तर सगळेच प्राणीमात्र चरितार्थासाठी चरत असतात. दिवस आणि रात्र. अज्ञानाचा अंधार गवतासारखा चरात असतात. ह्या वैषम्यात कवीला अजूनही खालची जाणीव होते ती एक मातीचे ढेकूळ असल्याची. व हे ढेकूळ आजूबाजूचा आसमंतही प्रदुशित करते .
ह्या डीप्रेशन मध्ये जरा सुखाची बाब अशी की स्वतःत मश्गुल असलेले प्राणी ( जसे खेचर ) हे प्रणयी चांदणे चरत असतात.
स्वतःचे अस्तित्व अगदी ढेकळासारखे नगण्य असतानाही त्याच पाण्यातून वर उसळी घेणारी मासोळी ही जणू काही वरच्या अवकाशाने गळ टाकून वर खेचली आहे असे दिसते आहे. म्हणजे जे सुटकेच्या आशेने वर सुळकांडी घेतात तेही गळालाच लागलेले असतात.
तर अशा वेळी, मी काय पाहतो तर, स्वतःत मश्गुल झालेल्या माझे ( खेचराचे ) प्रणयात चरणे, चांदणं चरणे.

--------------------------------- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा