रविवार, १ जून, २०१४

दोन कविता, छे, दोन बायकी भूमिका
कविता-रती अनियतकालिकात आलेल्या ह्या दोन कविता पहा :
१)      कवितेच्या कळा   ( कवयत्री: संध्या रंगारी )
--------------------------
दाटून भरून आलय आभाळ,
मी शोधत होते मला, माझ्यातच
पण सापडत नाही मी, मलाच.
मी लिहू बघते कविता
उत्तररात्रीची,
गर्भातल्या प्रकाशाची.
तुफानातल सामर्थ्य अन सौंदर्यही
उतरतय इथ कागदावर
या नीरव शांततेत.
झरताहेत बोटातून शब्द,
ऐकू येतोय माझ्या आतला आवाज
अधिकच स्पष्ट
इतका की दचकते मी,
ऐकत तर नाही ना कोणी...?
दारात फुललीय रातराणी,
उरी वादळ .
मी रचतेय नवी सृष्टी,
माझ्याजवळ पल्याडची दृष्टी.
मी वेगळ्याच धुंदीत
शब्दांच्या मस्तीत
मी अवलिया
मस्तमौला फकीर.
घर एक लकीर.
कुशीवरून वळता वळता
म्हणतोस तू सहजच—
“बंद कर लाईट,
डोळ्यावर येतोय
झोपना
कोण वाचणारेय त्या थर्डक्लास कविता.
ही घृणा
उतरते आत.
चिरवेदना होऊन
साध उलट उत्तर न देणारी मी
बनते कवितेत रणरागिणी
अन चकितही होते,
हे माझ कोणत रूप.
कल्पनेतच जगून घेते
एक आयुष्य.
जागतेपणी त्याचे डंख
मिरवताही येत नाहीत
झाकताही येत नाहीत
हे ...हे ...असच अन अजून काहीतरी
सुचल होत आधीही; पण लिहिल नाही.
कुठे मिळतो बाईला
लिहिण्यासाठी असा खास वेळ
लेकराच्या रडण्यात वाहून गेली प्रतिभा
धुन्यासोबत धुवून टाकली स्फूर्ती,
केरवाऱ्यात टाकली कल्पना.
लादलेल्या गृहिणीपणात
पीठावर मारल्या रेघोट्या,
पोळ्या लाटता लाटता
निसटून गेल्यात कितीतरी ओळी,
करपले शब्द.
भाजीच्या फोडणीत टाकल्या मी कविता
अन कळली नाही तुला चव
चरकलेल्या तिखटाची.
लिहिता येईल नंतर
म्हणत उरकत गेले हातातल काम.
मग फुरसतीन ओढला कागद
तर मेले शब्द झाले वैरी.
दिवस कामात बुडालेला अखंड
अन रात्री लिहिण्यावर तुझी बंदी.
सत्तेची केंद्र मंत्रालयातच नसतात
घरातही असतातच की विखुरलेली.
बाईने व्यक्त व्हायचं ?
कस....कुठे ....?
उपेक्षेनेच मारलय मला
अन सतावलय प्रकाशकांनी
कागदाचा खर्च निघत नाही साधा.
खळबट करून वाढवलीत लेकर,
कविता कशी जगवायची ?
तरी रक्तातून वाहते
कविता शाईसारखी !
शाईतून रक्त पाण्यासारख !
काय जपू...?
कसं जपू ...?
स्त्रीत्व येतं आड.
पडतातच चारित्र्यावर धब्बे
      ही कोण...हिच्या कवितेतला
प्रियकर की सहचर ?
कल्पनेतला वाटत नाही
अन तुलाही माहीत पक्कं
तू ही नाहीसच खास.
माझ वस्त्रहरण...
लेखणीतूनही माझ्या बाईपणावरच चर्चा
जगण्याच्या टोकाला तू
मरण्याच्या टोकाला मी.
घरातच चाललय युद्ध
माझ्या लिहिण्यावरून.
केले जाताहेत हात कलम
ठरवून दिलेल्या विषयावरच,
लिहायचं म्हणत....
शब्द माझे शस्त्र,
पण आता मीच म्यान केलेले
कविता कुरुक्षेत्र
माझा होतो अर्जुन
हताश विवश
धनुष्य खाली ठेवणारा
पण
नकोय मला कुणी कृष्ण
गीता सांगणारा.
येत नाही
तत्वज्ञान जगता
तडजोडच करावी लागते शेवटी बाईला.
घर साम्भाळून घेत नाही मला.
अन इकडे
हव ते हव तस उतरत नाही कागदावर.
वाढते बेचैनी,
घेरून टाकत अस्वस्थपण,
कोरत जात भणंगपण,
कुरतडत राहत मीपण
भांडते मी कवितेशी---
“बये, समजून घे गं मला तू जराशी ”,
पण नाही
इथेही हारते मी
अन खरच सांगते
खूप जड जातंय ही हार पचवण,
स्वतःला सोलवटून घेत
हे कविता-बिविता करण
आई म्हणते,
“नुसता येडेपणा आहे ”
असं कवितेने कुठं बदलता येतं का जग ?
२)      आणि ही दुसरी कविता :
बिनदिक्कत  ( कवयत्री : दमयंती मोहन भोईर )

तू म्हणालास, “कर इथे सही !”
तर मी केली
न वाचता, न विचारता .
नवल वगैरे कसलं त्यात,
तू ऊठ म्हटल्यावर उठतेच ना,
आणि बस म्ह्टलस की बसते
आणि हो,
हा मी दाखवलेला विश्वास तुझ्यावर
या भ्रमात राहशील !
तर तसं नक्कीच नाही.
तू करवून घेतलेल्या कवायतीमधून
कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याईतक्या
कमावलेल्या सामर्थ्यावर
मी बिनदिक्कत ठोकलीय सही !
----------------------------


































पहिला कवितेत बाईपणाची खंत आहे, कवितेत योग्य भाव न येण्याची खंत आहे, नवऱ्याच्या वरचढपणाची खंत आहे, कवितेच्या अंमल नसण्याची खंत आहे. एकूणातच ही एक खंत-कविता आहे. अर्थात कवयत्रीला आपली खंत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच व ही खंत तिने छांन व्यक्त केलेली आहे.
त्याच बरोबर दुसऱ्या कवितेत खंतीपेक्षा स्वतःवरचा विश्वास जास्त आहे. तुला तोंड देण्याचे माझे सामर्थ्य आहे व त्या जोरावर मी बिनदिक्कत सही करते आहे असे इथे कवयतरी म्हणत आहे. गंमत म्हणजे दोन्ही कवयत्री आहेत व त्यांच्या भांवना किती वेगवेगळ्या आहेत. एक भावना टिपिकल बायकी आहे तर दुसरी स्वत्वाची जाणीव असलेली आहे !

------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा