शनिवार, १४ जून, २०१४



कविता म्हणजे
दिवे
काहीतरी कुजल्याचा वास याय लागला
अन मी खिशातनं रुमाल काढणार
तोच माझी करंगळी खाली पडली
ती मी दुसऱ्या हातानं उचलून घेतली
अन रुमाल नाकावर धरणार
तर नाकच निसटून रुमालात आलं
ते रुमालात गुंडाळून मी खिशात टाकलं

काहीतरी कुजल्याचा वास येतच होता
म्हणून खिशातल्या खिशात नाक मुरडलं
अन करंगळीत आळ्या पडल्यात की काय
ते बघणार ः पण तेवढ्यात दिवेच गेले

कवी -- अरुण कोलटकर.
कवीची पार्श्वभूमी, त्याच्या इतरत्र असलेल्या प्रतिमा वगैरे गोष्टींची आवश्यकता न मानता ह्या कवितेचा अर्थ लागणारा नाही का ? जे काही कवितेत लिहिलेय त्याचा काय होतो अर्थ ?
ज्यांनी महारोग्यांना जवळून पाहिलेय ( आजकाल हा रोग कमी झालाय पण जेव्हा ह्याचा प्रादुर्भाव होता तेव्हा प्रथम तोंडावर कानावर चट्टे येत असत. मग एकेक अवयव सडत जाई. विशेषतः बोटे आधी झडत असत. मग हात पाय असे अवयव जात. गॅन्गरीन झाल्यावर जशी बोटे, पाय कापावा लागतो तसेच महारोगात होते. बाबा आमटे ह्यांच्या आश्रमात तुम्ही काय काय वस्तू दान म्हणून घेता अशी विचारणा केली तर लोक सांगतात अहो एक चप्पल पण आम्ही घेतो, कारण आमच्या इथे बऱ्याच जणांना एकाच पाय असतो. असा हा भयंकर रोग आहे/होता. शिवाय हा संसर्गाने होतो अशा समजुतीने लोक अशा रोग्यांना शिवतही नाहीत. त्यामुळे महारोग झालेले रोगी एकाकी असणे अगदी संभवनीय.
तर अशा एका रोग्याने काही तरी कुजतेय त्याचा वास येतोय म्हटले तर त्याची परिस्थिती बरीच बिकट झालेली आहे हे कोणालाही कळावे. बोटे झडणे तर अगदी साहजिकच. त्यामुळे ह्याची करंगळी पडली तर त्यात काही असंभव वाटू नये. ह्या रोगात कशाचे वैषम्य वाटावे ? बोटे झडण्याचे का अवयव कुजून त्यांच्या वास येण्याचे इतकी ह्या रोगात परमावधी होते. त्यामुळे दुसऱ्या हाताने करंगळी उचलणाऱ्याला वास सहन न होऊन त्याने नाकाला रुमाल लावावा ह्यात केवढे कारुण्य ! शेक्सपियर जसे शेवटच्या अवस्थेचे वर्णन करताना “सॅन्स आईज, सॅन्स टीथ....” अशा एकेक अवयवाचे जाणे चितारतो तसे इथे ज्या नाकाला वास सहन होत नाहीय त्या नाकाचे जाणेही जवळ येतेच. आणि हे सगळे निर्विकार नजरेने त्याला पाहावे लागतेय. फार तर तो खिशातल्या खिशात त्यावर नाक मुरडू शकतो व मुरडतोही. महारोग्यांच्या शेवटल्या अवस्थेत जाखमात आळ्या पडतात व नंतर खेळच खलास होतो. त्यामुळे आसक्तीने आळ्या  पडल्या आहेत का ते पाहणे महारोग्याला भागच पडते . आणि ह्या आळ्या पाहण्यावर दिवे जाण्याने एक प्रकारे मेहेरबानीच होते. म्हणजे दिवे गेले ते बरेच ! मरणासन्न परिस्थितीतही आसक्तीचे हे असणे आणि त्यावर अनपेक्षित उतारा सापडणे हे मोठे काव्यमय वर्णन आहे. आसक्तीचा हा मरातब आहे का मरण्याचा हा महोत्सव आहे हे अनाकाल्नीयच राहते ते दिवे जाण्याने. असे दिवे गेले तर !

---------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा