शुक्रवार, २३ मार्च, २०१२



कविता म्हणजे----(३)
गाणारा पक्षी  ( कवी: पु.शि.रेगे "दुसरा पक्षी"मधून )

पक्षी गात नाही
आपल्या सीमांची कक्षा घोषित करतो.

सिंह डरकाळ्या फोडीत नाही
आपली हुकुमत कुठं कुठं आहे ते बजावून सांगतो.

हत्ती झाडांना अंग घाशीत नाही
आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवून देतो.

मी कविता करीत नाही
माझ्या मनाची आणि तुझ्या धांव घेतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

    ह्या कवितेतल्या प्रतिमांची ( कवीला दिसलेल्या चित्रांची ) जंत्री केली तर तीत अशी चित्रे दिसतात : १) गाणारा पक्षी २) डरकाळ्या फोडणारा सिंह ३) झाडांना अंग घासणारा हत्ती ४) कविता करणारा कवी ( मी ) ५) पक्षी सीमा घोषित करतो आहे ६) सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय ७) हत्ती आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवतोय ८) कवी आपल्या मनाची व प्रेयसीची धांव घेतोय. ह्यातील १) ते ४) ही चित्रे अगदी सरळ-साधी चित्रणे आहेत तर ५) ते ८) चित्रे ही पहिल्या गटातील (१ ते ४) चित्रांचा अर्थ लावणारी चित्रे आहेत. सकृदर्शनी कवीने नुसती चित्रे सादर केली आहेत असे दिसते. पण जरा काळजीपूर्वक पाहिले तर प्रत्येक चित्रावर त्याने आपला तर्क चालवलेला आहे व त्याचा अर्थ दिला आहे असे दिसेल. जसे: गाणारा पक्षी नुसते गात नाहीये तर तो आपल्या सीमा घोषित करतो आहे. डरकाळ्या फोडणारा सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय. झाडांना अंग घासणारा हत्ती आपल्या वावर-प्रदेशाच्या खुणा ठरवतोय. कवी कविता करीत नाहीय तर त्याच्या मनाची व प्रेयसीची धांव घेतो आहे.
    कोणाही जाणकार प्राणी-मित्राला विचारले तर सिंहाचे, हत्तीचे ( एव्हढेच काय कुत्र्यांचेही ) हे आपली सत्ता-प्रदेश इतरांना दाखवून देण्याचे प्रघात आहेत, असे कळेल. म्हणजे हे नैसर्गिक आहे हे ठाम झाले. इथे कवी क्रमा क्रमाने आपल्याला ह्या तर्काला बांधून शेवटाला घेऊन जातो व म्हणतो की असेच माझी कविता ही कविता नसून तुझे व माझे प्रदेश दाखवणे आहे. शिवाय हे किती नैसर्गिकही आहे, सुंदर आहे. हे रेगे ह्यांचे प्रामाणिकपणे आपल्याला दिसलेल्या चित्रांचे दाखवणे आहे की नेटाने तर्क लढवून कविता ही त्यांच्या व प्रेयसीचे प्रदेश दाखवणे आहे हे पटवणे आहे ? आता ही काही लबाडी म्हणता येणार नाही. प्रख्यात विदुषी मार्जोरी बोल्टन ह्यांच्या "ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री" ह्या पुस्तकातल्या "इंटेलेक्च्युयल फॉर्म:द टू मेन पॅटर्न्स ऑफ इमेजरी" ह्या प्रकरणातले हे वाक्य पहा  (पृ.११२ ) : "तर्कसंगती हे जागृत मनाचे लक्षण आहे व भावनेच्या विरोधी आहे. श्रेष्ठ कवितेत भावनेचा भडिमार असून त्याचबरोबर सुसंबंद्ध आंतरिक तर्कही असेल. तर्काची सुसंगती ही चांगल्या कवितेच्या रचनेचा महत्वाचा भाग असतो, व तो प्रतिमांच्या अनाकलनीय परिणामांपेक्षा जोरदार असतो. " ह्या अंगाने, प्रत्येक प्राणीमात्र आपल्या वावर-सत्तेच्या प्रदेशाच्या खुणा दाखवीत असतो, हे ह्या कवितेतल्या तर्कामागचे मूलसूत्र होते.
    प्रत्येक संबंधात (रिलेशन) त्यातल्या घटकांना आपला स्वतंत्र प्रदेश ( स्पेस ) लागतो हे आता जवळ जवळ मान्यच झाले आहे. ह्या स्वतंत्र वावराला वाव मिळाला नाही तर संबंध विकोपाला जातात हे कोणत्याही कौटुंबिक कोर्टात न जाताही आपण मान्य करू इतके ते पटण्याजोगे आहे. असे असताना कवीने असे जर म्हटले असते की माझ्या कवितेत तुझे प्रदेश व माझे प्रदेश असे मी दाखवतोय तर ते ह्या तर्क-संगतीची पुढची कडी झाले असते. रेगे ह्यांच्या वैयक्तिक चरित्रातही ते रास्त ठरते. जसे : बायको सरिताबाईंचा एक प्रदेश, जर्मन प्रेयसी केठ ह्यांचा एक प्रदेश, मुलाबाळांचा एक प्रदेश, मित्रांचा एक वगैरे. पण ते जेव्हा शेवटच्या ओळीत म्हणतात की माझ्या कवितेत मी माझ्या मनाची व तुझ्या ( मनाची ) धांव ( ओढ ) घेतोय तर ते ह्या प्रादेशिक रचना करण्याच्या तर्काविरुद्ध जाते. प्रियकर प्रेयसी ह्यांचे मनोमीलन हे रोमॅंटिक व आदर्श खासच असते पण मग त्यासाठी सिंह, हत्ती हे आपले वेगळे प्रदेश करतात ( इतरांपासून ) ही तर्काची दोरी रास्त ठरत नाही.
    कवी भले म्हणो की मी माझ्या मनाची व तुझ्या मनाची धांव घेतोय पण वाचकरूपी तिसर्‍या अंपायरला विचारलेत तर तो धांव-चित ( रन-आऊट)  झालाय असाच निर्णय द्यावा लागेल. कारण ह्या कवितेत केवळ प्रतिमांचा खेळ असता, नुसती पक्षी, सिंह, हत्ती ह्यांची चित्रे असती,  तर कसल्याही निर्णयाचे कवीचे म्हणणे चालले असते. त्याला समीक्षकांप्रमाणे वाचकही अप्रतीम म्हणते झाले असते. पण ह्या कवितेत तर्क हीच मोठी प्रतिमा आहे व शेवटचे चित्र हे तर्क-विसंगत ठरते !
    कै.पु.शि.रेगे ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताच्या अंकात ( कविता-रती मार्च-जून २०११ ) प्रा.गंगाधर पाटील ह्यांचा एक "गाणारं झाड" नावाचा रेगे यांच्या आठवणींवरचा लेख आहे. त्या लेखात त्यांनी रेगे ह्यांना कशा काही कविता "दिसत" असत व ते लगेच त्या टिपून घेण्यासाठी रात्री उशाशी कागद-लेखणी ठेवीत असत असे सांगितले आहे. चक्क दिसलेली कविता व जोडून मोडून केलेली कविता ह्या संबंधी आपल्याला नेहमीच कुतुहूल असते. काही प्रमाण असो वा नसो, एक असे वाटत असते की जी कविता अशी "दिसते" ती दैवीच  म्हणावी लागेल. ( मराठीतल्या विदुषी दुर्गा भागवत ह्या ग्रेस ह्यांच्या कवितांना असेच विशेषण लावीत. ). अशा दैवी कवितात कोलेरिज ह्यांच्या "कुबला-खान" ह्या शंभर ओळींच्या कवितेला सर्वात उच्च स्थान असावे, कारण ती म्हणे त्यांना शीर्षकासह दिसली होती. ह्यावर लगेच इस्लामवादी म्हणतील की मोहमंद पैगंबराला अपरिचित अशा भाषेत ज्या कविता दिसल्या ( म्हणजे आजचे कुराण ) त्यांनाच हे स्थान द्यावे, कारण त्या नुस्त्याच टिकल्या नाहीत तर त्यामागे आज एव्हडी प्रचंड संस्कृती उभारलेली आहे .
    महाराष्ट्र काव्यभूषण श्री.मंगेश पाडगावकर सांगतात की त्यांना अकस्मात कवितेची एक ओळ सुचते व ती बरेच दिवस त्यांचा पिच्छा पुरवते व मग ते त्या ओळीतल्या भावनेनुसार त्याची चारोळी, वात्रटिका, गजल, सुनीत, भावगीत, गीत किंवा कविता अशी कलाकृती करतात. त्यांना प्रसंग, चित्र, देखावा दिसतो असे ते म्हणत नाहीत. कवी ग्रेस ह्यांना मात्र रात्री अपरात्री देखावे, दृश्ये दिसतात व त्यांच्या ते कविता करतात. असेच पु.शि.रेगे ह्यांना प्रसंग, देखावे दिसले व त्यावर त्यांनी कविता रेखल्या असे प्रा.गंगाधर पाटील ह्यांनी मांडले आहे. शास्त्रीय ( मेंदू बाबत ) दृष्टीने माग काढला तर असे आढळते की आपल्या मेंदूत विचार करण्याची काही कळच नाही.आपण एक तर साठवलेल्या आठवणी माघारी काढू शकतो किंवा येत असलेले अनुभव अगोदर असलेल्या अनुभवांशी पडताळून त्यांना योग्य कप्प्यात साठवू शकतो. पण आपल्याला स्वप्ने पडतात, चित्रे दिसतात हे तर नाकारता येतच नाही. स्वप्ने वा चित्रे दिसणे हे आपल्या मेंदूला खूपच सोयीचे आहे. कारण चित्रांऐवजी येणारे विचार जर शब्दात आले असते तर एखादे स्वप्न वाचायला आपल्याला कैक दिवस लागले असते. ( आपला लिहिण्याचा वेग असतो ४०/५० शब्द दर मिनिटाला, तर वाचण्याचा वेग असतो ८०/९० शब्द दर मिनिटाला. मनात वाचण्याचा वेग असतो १५०/१६० शब्द दर मिनिटाला. ) त्या मानाने अनेक शब्द लागणार्‍या वर्णनाचे एक चित्र ( फ्रेम ) धरले तर आपल्या पाहण्याचा वेगच असतो २४ फ्रेम्स दर सेकंदाला. म्हणजे क्षणात आपण कित्येक शब्दांचे चित्र ( फ्रेम ) वाचू शकतो, पण चित्राच्या भाषेत. आता ही चित्रेच म्हणजे प्रतिमा, असे धरले तर, ज्या कवींना कविता दिसतात असे मानले तर कवितेतल्या प्रतिमा ह्याच त्यांना दिसलेल्या प्रतिमा असे होईल. त्या प्रतिमा आपणही त्यांच्या कवितेतून पाहू शकतो.



-----------------------------------------------------

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०११

------------------------------------------------------------------------------------------------

कविता म्हणजे.....(२)

एकपण ( कवी: ग्रेस , "सांजभयाच्या साजणी"-पॉप्युलर प्रकाशन, पृ.१५ )

माझ्या गात्रांत फुटले
उन्ह-कळ्यांचे तरंग
चार डोळ्यांनी झाकिले
तुझे माझे सारे अंग !
एका शब्दाने नभाला
नको करूस पोकळी
झाड तोडून घावांनी
केली सावली मोकळी....

---------------------------

कवी ग्रेस हे मराठी सारस्वतातले फार दबदबा असलेले कवी आहेत. गूढतेचे वलय ल्यालेले, तितकीच अप्रतीम शब्दकळा वृत्तातून प्रकट करणारे. ह्यांना कविता साक्षात "होतात", असा बोलबाला आहे.
झाड आणि झाडाची सावली ह्यांचे जसे "एकपण" असते व ते झाड तोडल्यावरच, झाड व सावली असे वेगळे होते, तसेच माझी गात्रे व त्यात नित्य उठणारे उन्हाचे, उत्साहाचे तरंग ह्यांचे "एकपण" आहे. तुझे दोन व माझे दोन अशा चार डोळ्यांनी आपण एकमेकांना पाहतो तेव्हा तुझे व माझे सारे अंग झाकून जाते, इतके आपले "एकपण" आहे. झाड जसे घावांनी तोडल्या जाते ( कुर्‍हाडीच्या घावांनी ) तसे आपल्यातले आभाळ ( आसमंत, नभ ) एखाद्या दुखावणार्‍या शब्दाने पोकळ करू नकोस, भेदू नकोस. आपले "एकपण" असेच असू दे. असा सरळ सोपा अर्थ असणारी ही छोटेखानी कविता आहे.
ग्रेस कवितेतली शब्दयोजना फार मोजून मापून करतात. साधारणपणे "तरंग" हे पाण्यावर "उठतात". कदाचित उमटलेले दिसतात. म्हणून वाक्‌प्रचार "तरंग उठतात" असा रूढ झाला असेल. पण गात्रात, इंद्रियात हे तरंग "फुटले" आहेत असे कवी म्हणतो. फुटण्याची क्रिया उस्फुर्त किंवा दैवीच म्हणायची. ह्या उलट "उठणे" हे कशाची तरी प्रतिक्रिया म्हणून होणारी क्रिया आहे. म्हणूनच भाव-भावनांचे स्फुरणे ह्याला कवी "माझ्या गात्रात फुटले, उन्ह-कळ्यांचे तरंग" असे म्हणून ते कुठल्यातरी अज्ञात संकेताने, उस्फूर्तपणे फुटलेले आहेत असे सांगतो. खरे तर हा कवी "संध्याकाळ"चा सदैव आगळेपणा मिरवणारा कवी आहे. पण इथे तो हे "तरंग", उन्ह-कळ्यांचे आहेत असे म्हणतो. "कळ्यांचे" हा शब्द योजून ही नुकतीच उमलणारी उन्हे आहेत असे कवी दाखवीत आहे. संध्याकाळच्या उदासीनतेचे हे कढ नसून नुकत्याच उमलणार्‍या उन्हासारखे, उत्साहाचे, हे तरंग भाव-भावनांचे, माझ्या गात्रात फुटत आहेत असे हे वर्णन होते.
पाहणार्‍याच्या डोळ्यात सौंदर्य असते ( "ब्यूटी इज इन द आय ऑफ बिहोल्डर ") असे म्हणतात. तसेच पाहण्याने म्हणजे डोळ्याने एखाद्या वस्तूचे सौंदर्य "उकलते", उलगडते. पण इथे कवी म्हणतो "झाकिले". तर ह्याचा अर्थ असा काढावा लागतो की मी तुला पाहतो तेव्हा माझे "मी-पण" मी झाकतो, तसेच तू मला पाहतेस तेव्हा तुझे "मी-पण" झाकल्या जाते. तर असे चार डोळ्यांनी आपण एकमेकांना पाहतो तेव्हा आपली अंगे झाकल्या जातात कारण ती इतकी एकमेकात एकपणाने आहेत. ह्याच बाबत आरती प्रभु एके ठिकाणी म्हणतात : "चार डोळे : दोन काचा दोन खाचा ". किंवा कुठल्या कुठल्या भूमिकेचा आपण चष्मा चढवलेला असेल तर मग जसे स्वत:चे अंग झाकल्यासारखे दिसत नाही, ज्या भूमिकेचा चष्मा असेल तसेच दिसते, असाही अर्थ "झाकिले"चा निघू शकतो.
कवीला आर्तपणाचे, उत्कटतेचे खूपच अप्रूप आहे. त्यामुळे हे "एकपण" असेच राहो, न दुभंगो, असे चिंतताना त्याला प्रतिमा सुचते ती झाड घावांनी तोडल्याने त्याची सावली झाडापासून तुटल्याची. झाड आणि सावली ह्यांचे "एकपण" जसे आहे तसे तुझे नि माझे नभ एकपणात आहे असेही कवी सुचवतो. व हे नभ एखाद्या घाव करणार्‍या शब्दाने पोकळ करू नकोस ( नभ तोडता येत नाही, ते पोकळ होऊ शकते ) अशी कवी इच्छा व्यक्त करतो. रासलीलेत जसे कृष्ण आणि गोपी ह्यांचे "एकपण" आपण कल्पितो तसे कवी इथे झाड सावली, गात्रे-भावभावना, तू-मी ह्यांचे "एकपण" चितारत आहे. ते छान जमून आले आहे.


--------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०११

कविता म्हणजे....(१)
-------------------------------------------------------------------
विपरीत : ( कवी : कविता म्हेत्रे , कविता-रती, मार्च-जून २०११)

नांगरणी करून
एके ओळीत समंजस
दाणे पेरताना
मायेच्या हातानं पाणी
पाजलेले
सुखद भोग
वाटयाला आले असते तर--
गाळून घेतलेल्या माझ्या
रक्तबीजांना
वाढायला हरकत कशाची होती ?

जिथं उगवणार नाही काहीच
अशा वांझ मातीत
पेरायचे अट्टाहास
आणखीन ठिसूळ होत जाताना,
वाया चाललेलं एक एक हंगाम
उरल्या जगण्याचं
अवसानही
काढून घेतात--
डोळे आकाशाला लावून बसलेली
मुळासकट करपलेली
ही बेहिशोबी झाडं.

पायाखालची ओली माती तरी
त्यांनी
शाबूत ठेवायची होती !
----------------------------------------

मार्च-जून २०११ च्या कविता-रतीतली ही एक कविता आहे. म्हणजे आत्ता आत्ताचीच.
नांगरून एका ओळीत पेरलेले दाणे, हे समंजस आहेत, ही एक अप्रतीम कवी कल्पना आहे. त्यांचा समंजसपणा एका ओळीत असण्याने तर आहेच, शिवाय ते योजलेल्या क्रियांवरून ( जसे खत देणे, पाणी देणे, वारा-ऊन वगैरे ) वाढतात ह्यात ज्यास्त आहे. त्यांना पाणी देऊन वाढताना जे सुखद भोग ( जसे नवे अंकुर येणे, कोंभाची चांगली वाढ होणे, झाडाचे तरारणे, फुले फळे येणे ) आहेत तसेच भोग माझ्या वाटेला ( माझ्या रक्तबीजांच्या वाटेला ) आले असते तर ? इथे कवयित्रीची काहीशी खिन्नता दिसते. रक्तबीज म्हणजे डिएनए किंवा व्यक्तिमत्वाची सुप्त बीजे असे धरले तर नक्कीच एक खंत व्यक्त केलेली आहे . जिथे काहीच उगवणार नाही अशा निराशेने वांझ जमीनीचे अवसानही काढून घेतात. झाडंही करपलेली आहेत. त्यांनी निदान पायाखालची जमीन तरी ओली ठेवायची होती ह्या सुप्त इच्छेने कवितेचा शेवट होतो.
कवयित्री जमीनीच्या वांझपणाबद्दल खंतते आहे की त्या दृष्टांताने स्वत:चे वांझपणाचे दु:ख काढते आहे हा संभ्रम मोठा धूसरपणे इथे पेरलेला दिसतो आहे. ( संभ्रमाला अंकुरायला कशाची ओल लागत नसावी, हे वाचकांचेच संचित म्हणायला हवे ! ). झाडे वाढलेली आहेत, शिवाय करपलेली आहेत, हाच त्यांचा बेहिशोबीपणा असावा. त्यांनी ह्या सगळ्या करपण्यात निदान पायाखालची जमीन तरी ओली ठेवायला हवी होती, हा सृजनाचा भरवसा देणारा आशावाद मात्र खूपच मोहक व बोलका आहे.
कवयित्री स्वत: शेतकी कामे करणारी आहे, का तिला शेतकर्‍यांच्या विश्वाचे सह-संवेदन आहे, हा तसा गौणच प्रश्न आहे. कवितेतले वांझपणाचे दु:ख व सृजनाची सूप्त आशा ह्या मात्र अगदी खुमासदारपणे साधलेल्या आहेत. कविता मुक्तछंदात असणे हे ह्या वृत्तीला पोषकच वाटते.

------------------------------------------------------------------------------------------------