गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०११

कविता म्हणजे....(१)
-------------------------------------------------------------------
विपरीत : ( कवी : कविता म्हेत्रे , कविता-रती, मार्च-जून २०११)

नांगरणी करून
एके ओळीत समंजस
दाणे पेरताना
मायेच्या हातानं पाणी
पाजलेले
सुखद भोग
वाटयाला आले असते तर--
गाळून घेतलेल्या माझ्या
रक्तबीजांना
वाढायला हरकत कशाची होती ?

जिथं उगवणार नाही काहीच
अशा वांझ मातीत
पेरायचे अट्टाहास
आणखीन ठिसूळ होत जाताना,
वाया चाललेलं एक एक हंगाम
उरल्या जगण्याचं
अवसानही
काढून घेतात--
डोळे आकाशाला लावून बसलेली
मुळासकट करपलेली
ही बेहिशोबी झाडं.

पायाखालची ओली माती तरी
त्यांनी
शाबूत ठेवायची होती !
----------------------------------------

मार्च-जून २०११ च्या कविता-रतीतली ही एक कविता आहे. म्हणजे आत्ता आत्ताचीच.
नांगरून एका ओळीत पेरलेले दाणे, हे समंजस आहेत, ही एक अप्रतीम कवी कल्पना आहे. त्यांचा समंजसपणा एका ओळीत असण्याने तर आहेच, शिवाय ते योजलेल्या क्रियांवरून ( जसे खत देणे, पाणी देणे, वारा-ऊन वगैरे ) वाढतात ह्यात ज्यास्त आहे. त्यांना पाणी देऊन वाढताना जे सुखद भोग ( जसे नवे अंकुर येणे, कोंभाची चांगली वाढ होणे, झाडाचे तरारणे, फुले फळे येणे ) आहेत तसेच भोग माझ्या वाटेला ( माझ्या रक्तबीजांच्या वाटेला ) आले असते तर ? इथे कवयित्रीची काहीशी खिन्नता दिसते. रक्तबीज म्हणजे डिएनए किंवा व्यक्तिमत्वाची सुप्त बीजे असे धरले तर नक्कीच एक खंत व्यक्त केलेली आहे . जिथे काहीच उगवणार नाही अशा निराशेने वांझ जमीनीचे अवसानही काढून घेतात. झाडंही करपलेली आहेत. त्यांनी निदान पायाखालची जमीन तरी ओली ठेवायची होती ह्या सुप्त इच्छेने कवितेचा शेवट होतो.
कवयित्री जमीनीच्या वांझपणाबद्दल खंतते आहे की त्या दृष्टांताने स्वत:चे वांझपणाचे दु:ख काढते आहे हा संभ्रम मोठा धूसरपणे इथे पेरलेला दिसतो आहे. ( संभ्रमाला अंकुरायला कशाची ओल लागत नसावी, हे वाचकांचेच संचित म्हणायला हवे ! ). झाडे वाढलेली आहेत, शिवाय करपलेली आहेत, हाच त्यांचा बेहिशोबीपणा असावा. त्यांनी ह्या सगळ्या करपण्यात निदान पायाखालची जमीन तरी ओली ठेवायला हवी होती, हा सृजनाचा भरवसा देणारा आशावाद मात्र खूपच मोहक व बोलका आहे.
कवयित्री स्वत: शेतकी कामे करणारी आहे, का तिला शेतकर्‍यांच्या विश्वाचे सह-संवेदन आहे, हा तसा गौणच प्रश्न आहे. कवितेतले वांझपणाचे दु:ख व सृजनाची सूप्त आशा ह्या मात्र अगदी खुमासदारपणे साधलेल्या आहेत. कविता मुक्तछंदात असणे हे ह्या वृत्तीला पोषकच वाटते.

------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा