शनिवार, २९ ऑक्टोबर, २०११

------------------------------------------------------------------------------------------------

कविता म्हणजे.....(२)

एकपण ( कवी: ग्रेस , "सांजभयाच्या साजणी"-पॉप्युलर प्रकाशन, पृ.१५ )

माझ्या गात्रांत फुटले
उन्ह-कळ्यांचे तरंग
चार डोळ्यांनी झाकिले
तुझे माझे सारे अंग !
एका शब्दाने नभाला
नको करूस पोकळी
झाड तोडून घावांनी
केली सावली मोकळी....

---------------------------

कवी ग्रेस हे मराठी सारस्वतातले फार दबदबा असलेले कवी आहेत. गूढतेचे वलय ल्यालेले, तितकीच अप्रतीम शब्दकळा वृत्तातून प्रकट करणारे. ह्यांना कविता साक्षात "होतात", असा बोलबाला आहे.
झाड आणि झाडाची सावली ह्यांचे जसे "एकपण" असते व ते झाड तोडल्यावरच, झाड व सावली असे वेगळे होते, तसेच माझी गात्रे व त्यात नित्य उठणारे उन्हाचे, उत्साहाचे तरंग ह्यांचे "एकपण" आहे. तुझे दोन व माझे दोन अशा चार डोळ्यांनी आपण एकमेकांना पाहतो तेव्हा तुझे व माझे सारे अंग झाकून जाते, इतके आपले "एकपण" आहे. झाड जसे घावांनी तोडल्या जाते ( कुर्‍हाडीच्या घावांनी ) तसे आपल्यातले आभाळ ( आसमंत, नभ ) एखाद्या दुखावणार्‍या शब्दाने पोकळ करू नकोस, भेदू नकोस. आपले "एकपण" असेच असू दे. असा सरळ सोपा अर्थ असणारी ही छोटेखानी कविता आहे.
ग्रेस कवितेतली शब्दयोजना फार मोजून मापून करतात. साधारणपणे "तरंग" हे पाण्यावर "उठतात". कदाचित उमटलेले दिसतात. म्हणून वाक्‌प्रचार "तरंग उठतात" असा रूढ झाला असेल. पण गात्रात, इंद्रियात हे तरंग "फुटले" आहेत असे कवी म्हणतो. फुटण्याची क्रिया उस्फुर्त किंवा दैवीच म्हणायची. ह्या उलट "उठणे" हे कशाची तरी प्रतिक्रिया म्हणून होणारी क्रिया आहे. म्हणूनच भाव-भावनांचे स्फुरणे ह्याला कवी "माझ्या गात्रात फुटले, उन्ह-कळ्यांचे तरंग" असे म्हणून ते कुठल्यातरी अज्ञात संकेताने, उस्फूर्तपणे फुटलेले आहेत असे सांगतो. खरे तर हा कवी "संध्याकाळ"चा सदैव आगळेपणा मिरवणारा कवी आहे. पण इथे तो हे "तरंग", उन्ह-कळ्यांचे आहेत असे म्हणतो. "कळ्यांचे" हा शब्द योजून ही नुकतीच उमलणारी उन्हे आहेत असे कवी दाखवीत आहे. संध्याकाळच्या उदासीनतेचे हे कढ नसून नुकत्याच उमलणार्‍या उन्हासारखे, उत्साहाचे, हे तरंग भाव-भावनांचे, माझ्या गात्रात फुटत आहेत असे हे वर्णन होते.
पाहणार्‍याच्या डोळ्यात सौंदर्य असते ( "ब्यूटी इज इन द आय ऑफ बिहोल्डर ") असे म्हणतात. तसेच पाहण्याने म्हणजे डोळ्याने एखाद्या वस्तूचे सौंदर्य "उकलते", उलगडते. पण इथे कवी म्हणतो "झाकिले". तर ह्याचा अर्थ असा काढावा लागतो की मी तुला पाहतो तेव्हा माझे "मी-पण" मी झाकतो, तसेच तू मला पाहतेस तेव्हा तुझे "मी-पण" झाकल्या जाते. तर असे चार डोळ्यांनी आपण एकमेकांना पाहतो तेव्हा आपली अंगे झाकल्या जातात कारण ती इतकी एकमेकात एकपणाने आहेत. ह्याच बाबत आरती प्रभु एके ठिकाणी म्हणतात : "चार डोळे : दोन काचा दोन खाचा ". किंवा कुठल्या कुठल्या भूमिकेचा आपण चष्मा चढवलेला असेल तर मग जसे स्वत:चे अंग झाकल्यासारखे दिसत नाही, ज्या भूमिकेचा चष्मा असेल तसेच दिसते, असाही अर्थ "झाकिले"चा निघू शकतो.
कवीला आर्तपणाचे, उत्कटतेचे खूपच अप्रूप आहे. त्यामुळे हे "एकपण" असेच राहो, न दुभंगो, असे चिंतताना त्याला प्रतिमा सुचते ती झाड घावांनी तोडल्याने त्याची सावली झाडापासून तुटल्याची. झाड आणि सावली ह्यांचे "एकपण" जसे आहे तसे तुझे नि माझे नभ एकपणात आहे असेही कवी सुचवतो. व हे नभ एखाद्या घाव करणार्‍या शब्दाने पोकळ करू नकोस ( नभ तोडता येत नाही, ते पोकळ होऊ शकते ) अशी कवी इच्छा व्यक्त करतो. रासलीलेत जसे कृष्ण आणि गोपी ह्यांचे "एकपण" आपण कल्पितो तसे कवी इथे झाड सावली, गात्रे-भावभावना, तू-मी ह्यांचे "एकपण" चितारत आहे. ते छान जमून आले आहे.


--------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा