बुधवार, १३ जुलै, २०१६

श्रीशिल्लक

कविता म्हणजे

श्रीशिल्लक -----कवि : माया पंडित

------------  

पांघरली घडीघडी काया

पायघडी म्हणून त्यांच्यापुढे

अपेक्षांची मानमर्यादा राखली,

गहाण टाकायला जिणे मागितले

त्यांच्या अडत्यापाशी तरी

कुठलीच पळवाट नाही काढली.

सोलून काढले काळीज सरारा

भर केली साऱ्या कमतायांची

मिटवले त्यांचे काळीजकहर

गाडून घेतले चिखलमातीत

छाटत राहिलो स्वतःला

फुटणारे अंकुर वरच्यावर.

अद्वैताचे रूप म्हणत

चूकभुलींचे काटे घेतले ओढून

अंगावरती गोधडे म्हणून

नाही मानले कधी ओझे

कसल्याच कोसळण्याचे

नाही घेतले भार कुथूनकण्हून.

आता म्हणते थकले मन

निपटारा करून टाक

साऱ्या साकीबाकीचा

लिहून टाक ऐवज

त्यांच्या नावाने

उरल्यासुरल्या जिंदगानीचा.

श्रीशिल्लक काय राहील

ती राहील अपयशाची

आपल्या मातीच्या तळहाती

मातीचेच होते जगणे आपले

मिळून जावे त्यातले मीपण,

मातीच्या अंतरंगाशी.

------------------  

धुळ्याहून निघणाऱ्या “कविता-रती” नावाच्या दर्जेदार नियतकालिकात आलेली ही एक कविता आहे. कवितेचा अर्थ तसा सोपा आहे. अपयश, काटे, माती, निपटारा, कोसळणे, ओझे, चूकभूल, कमतरता, काळीज सोलणे, पायघडी, गहाण टाकणे वगैरे नुसते शब्दच पाहिले तर अतिशय खिन्न करणारी ही कविता आहे हे लक्षात यावे. देवाच्या नावाने आयुष्यात जी शिल्लक ( श्रीशिल्लक ) राहिलेली आहे, त्यातले मीपण मातीच्या अंतरंगाशी मिळून जावे अशी इथे कवीने याचना केली आहे.

काही समीक्षक म्हणतात की कवितेतला कवीचा तर्क हा व्यवहारातल्या तर्कासारखा तपासून पाहू नये. तो एक प्रतिमा निर्माण करण्याचाच प्रयत्न असतो. असे समजले तर कवितेविषयी बोलणेच खुंटते. कवितेतले व्याकरण आधीच तपासण्यातून बाद, शब्द कसेही फिरवणे मंजूर, प्रतिमांची शक्याशक्यता बघणे बाद, असे सूट देत देत मग कविता वाचायची तरी कशाला ? मातीलाच अर्पण करावी !

वरच्या कवितेत “कमतायांची” असा शब्द छापल्या गेलाय तो “कमतरतांची” असा असावा एव्हढी सुधारणा मात्र आपण नक्कीच करू शकतो.  

कवियत्री जेव्हा म्हणते की श्रीशिल्लक राहील ती अपयशांचीच तेव्हा त्या शिलकेत “मीपण” कसे शक्य आहे ? मीपण म्हणजे काही तरी कांक्षा, यश, गर्व अपेक्षित आहे. ते ह्या शिलकीत कसे असणार ? कदाचित मीपण ऐवजी “माझी ओळख” रास्त राहिले असते. पण कवी कशाला कोणाचे ऐकेल ?

---------------------------- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा